1 उत्तर
1 answers

सोरायसिस कसा बरा होतो ?

4
त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन त्या ठिकणी खाज सुटणं, त्वचेतून चंदेरी रंगाचे माशांच्या खवल्यांप्रमाणे खवले पडणं ही ‘सोरायसिस’ या त्वचाविकारातील प्रमुख महत्त्वाची लक्षणं. या विकाराची सुरुवात डोक्याच्या टाळूपासून झाल्यास ‘कोंडा’ झालाय, असं समजून या त्वचाविकाराकडे दुर्लक्ष करू नये. या रोगाची सुरुवात ही प्रामुख्याने डोक्याच्या टाळूवरून, कानांमागून, कोपरं आणि ढोपरांच्या त्वचेवरून होते. हा रोग संसर्गजन्य नसला तरी वेळीच योग्य ते उपचार करून घेणं गरजेचं असतं.

रोगप्रतिकारशक्तीत बिघाड झाल्यामुळे ‘सोरायसिस’ हा त्वचाविकार डोकं वर काढतो. प्रतिकारशक्तीतील बिघाड हा रक्तातील पांढ-या पेशींत जनुकीय गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे होतो. या आजारात त्वचेच्या एका भागावर जास्त त्वचेचे थर निर्माण होतात. त्यामुळे त्वचा जाडसर होते. ती दिसायला खराब दिसते. सोरायसिसचा आजार जडलेली व्यक्ती ही सार्वजनिक जीवनाला मुकते. घरचेही या व्यक्तीपासून दूर पळतात. या आजाराचा उपचार आयुर्वेदात आहे का, तर नक्कीच आहे.

आयुर्वेदात त्वचाविकारांना ‘कुष्ठ’ असं म्हणतात. आयुर्वेदात सांगितलेल्या कुष्ठविकाराचा एक प्रकार म्हणजेच महारोग. मात्र सर्वच कुष्ठ रोगाचे प्रकार महारोगात मोडणारे नाहीत. कारणं या रोगाची कारणं निश्चित नाहीत. या रोगाला वयाचं बंधन नाही. पाच ते पंधरा वयोगटातल्यांना हा विकार जडण्याची जास्त शक्यता असते. हा जंतुसंसर्गाने होणारा विकार नाही. कधी कधी हा रोग अनुवांशिक असू शकतो. आई-वडील, काका-आत्या, मामा-मावशी, आजी-आजोबा यांपैकी एखाद्याला जरी हा विकार असला तर तो पुढच्या पिढीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे सोरायसिसचा त्रास असणा-या ३० टक्के रुग्णांमध्ये आजार हा कौटुंबिक असू शकतो. स्त्री-पुरुष दोघांनाही हा विकार होऊ शकतो. थंड प्रदेशात, तसंच हिवाळय़ात हा विकार होण्याची किंवा वाढण्याची दाट शक्यता असते. मानसिक चिंतांमुळे हा रोग वाढतो, असंही संशोधनातून लक्षात आलं आहे. वारंवार होणारा जंतुसंसर्गही हा विकार वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. सतत एकाच जागी मार लागत असेल तर त्याजागी या विकाराचा त्रास निर्माण होऊ शकतो. हाताच्या मागच्या बाजूला, हाता-पायांच्या बोटांच्या पृष्ठभागावर, तर पायाच्या पुढल्या बाजूस तसेच सांधे यांच्यावर हा रोग डोकं वर काढतो. गुडघे आणि कोपराच्या सांध्यावर वारंवार घर्षण होत असल्याने तिथे बऱ्याचदा सोरायसिसची चक्रंदळं (गोलकार चकत्या, चट्टे) निर्माण झालेल्या पाहण्यास मिळतात.


कसा होतो हा रोग?
या विकारात कफ आणि वात हे दोष बिघडलेले असतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात त्वचेचे दोन स्तर सांगितले असले तरी आयुर्वेदात त्वचेचे सहा ते सात स्तर सांगितले आहेत. त्या प्रत्येक त्वचेत निर्माण होणा-या रोगांचंही वर्णन केलं आहे. सर्वसाधारणत: चौथ्या किंवा पाचव्या थरात कुष्ठ म्हणता येईल, असे विकार होत असतात. त्वचेतील हे स्तर पेशीविभाजनाने निर्माण होतात. हे विभाजन अवयवांचा स्वभाव तसंच वायूंमुळे होत असते. त्वचा हा मांसधातूचा उपधातू आहे. मांसधातू तयार होतांना त्वचेला उपयुक्त होईल, असा भाग त्वचेच्या निर्मितीत वापरला जात असतो. एकेक स्तर निर्माण होत होत बाह्यत्वाचा निर्माण व्हायला सुमोर २७ दिवस लागतात.

परंतु बिघडलेल्या वातामुळे त्वचेतल्या थरांतील पेशी लवकर तयार होतात. त्यामुळे त्यांची बेसुमार वाढ होते. परिणामी सफेद कांद्याची अगदी बाहेरची साल असावी तसा चंदेरी रंगाचा चामडीचा थर तयार होतो. कफामुळे या पेशींचे थर पूर्णपणे न सुटता चिकटून राहतात. त्वचेतल्या केशवाहिन्या विस्कटून जातात. त्यात अधिक रक्त राहतं. त्यामुळे त्वचा लाल व जाडी होते. जाड झालेल्या त्वचेवर अर्धवट सुटलेले पापुद्रे असल्याने त्वचेचं स्वरूप माशांच्या खवल्यांसारखं होतं. म्हणून त्या पापुद्रयांना शकल (खवले) असं म्हणतात. काही पापुद्रे हे अर्भकाच्या पत्र्यांप्रमाणे दिसतात. सोरायसिसच्या जखमांमधून जर रक्त जास्त वाहत असेल तर सोरायसिसचे चट्टे लाल रंगचे दिसतात. नाहीतर चट्टयांचा रंग काळ्या किंवा करड्या रंगाचा असतो, असे चट्टे शरीराच्या ज्या भागावर असतात तिथे घाम येत नाही. हाता-पायांच्या तळव्यांवर हा रोग झाल्यास तिथली त्वचा कडक होऊन फाटते.

या विकारात त्वचेवर येणा-या चट्टय़ांना निश्चित आकार नसतो. कधी कधी आकार लहान-मोठा असतो. डोकं (scalp), कोपर, गुढघे, कंबर, माकडहाड, पोट, पाठ, हातापायाचे तळवे या ठिकाणी या विकाराचे चट्टे मोठ्या प्रमाणावर दिसतात. कधी कधी खाकेत किंवा शरीरातील नाजूक भागांवरही अशा चकत्या निर्माण होतात. या चकत्यांवर पापुद्रे सुटत नाही. मात्र वारंवार खाज येते. मध्यम वयाच्या स्थूल पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या अशा चट्टय़ांचं प्रमाण अधिक असतं. त्याला flexural type of psoriasis असं म्हणतात. काही व्यक्तींच्या नखांवरही बारीक खड्डे पडलेले दिसतात. नखं कुरतडल्यासारखी, खरखरीत आणि जाड होतात. काही रोग्यांचे सांधे आमवातासारखे सुजतात.


खाण्याचे कोणते प्रकार टाळावेत? 
योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीचे पदार्थ न खाल्ल्यास सोरायसिस हा आजार डोकं वर काढतो. जसं की,
आहारात जास्त खारट (लोणचं, पापड, चिवडा, वेफर्स, फरसाण, खारेदाणे, खारवलेला सुकामेवा इ.), आंबट (चिंच, टॉमेटो, लिंबू, आमचूर, कैरी, दही, आंबट ताक, आंबट पेय, आंबवलेले पदार्थ इ.), अतिशय गोड चवीचे पदार्थ असणं. खाण्याचा सोडा किंवा इतर क्षार.
शिळे पदार्थ खाणं.
चहात बिस्किटं किंवा पोळी-चपाती बुडवून खाणं.
दूध आणि फळं एकत्र करून केलेले पदार्थ.
दूध आणि माशांचे पदार्थ एकाच वेळी खाणं.
शरद +तूत विरेचन घेऊन शरीर स्वच्छ केले पाहिजे. असं न केल्यास काही व्यक्तींना मंडलकुष्ठासारखा सोरायसिसचा एक विकार जडू शकतो.
रात्री जागरण करणं आणि दिवसा झोपणं. तेही जेवल्यावर लगेच.
जेवल्यावर लगेच व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीची कामं करणं.
उन्हातून एकदम एसीत जाणं किंवा एसीतून एकदम उन्हात जाणं.

औषधोपचार 
काही जणांच्या मते समुद्रस्नान (समुद्रात आंघोळ करणे) किंवा सूर्यरश्मी चिकित्सा (उन्हात बसणं) केल्याने हा रोग कमी होतो. याचा निश्चित उपयोग होतो की नाही, माहीत नाही. कारण या विकारात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तेल लावून त्वचा तेलकट ठेवणं महत्त्वाचं असतं. कफ आणि वात दोष बिघडून हा विकार झाला असल्यास कोवळ्या उन्हात सकाळी बसल्याने हा विकार बरा होण्यास मदत होते. परंतु ज्या प्रकारात त्वचा लाल होऊन त्यावर पापुद्रे असतात, तेव्हा मात्र समुद्रस्नान किंवा सूर्यरश्मी चिकित्सा त्रासदायक ठरू शकते.

सोरायसिसच्या आजारात तेलाचं मालिश अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तेलामुळे कफ तर वाढत नाही. पुन्हा वाताचं शमन होतं. शिवाय त्वचेवर तेलाचा थर आल्यामुळे तिला भेगा पडत नाही. पापुद्रे सहज सुटतात. तेलामुळे त्वचा नरम पडल्यामुळे खाज येत नाही. खोबरेल तेलाचा वापर केल्यास चालते. परंतु वैद्यांच्या सल्ल्याने विशिष्ट तेलाचा वापर केल्यास ते अधिक उपयुक्त ठरतं. ‘महातिक्तघृत’, ‘यष्टीमधुघृत’ यांसारखी तुपात बनवलेली औषधं घेण्याचा सल्ला वैद्यराज देतात.

आरोग्यवर्धिनी, महागंधक रसायन, चोपचिन्यादी चूर्ण, सु. सूतशेखर, मौक्तिक कामदुधा, गुळवेल, ज्येष्ठमध, सारिवा, मंजिष्ठा यांसारखी औषधंही या आजारात उपयुक्तअसतात. पण कोणती औषधं वापरावीत यासाठी निश्चितच तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

पथ्यपालन
‘कॉर्टिकोस्टेरॉइड’सारख्या औषधाने या आजारात गुण येतो. परंतु यांचा उपयोग जाणकार डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. कारण या औषधाचा चुकीचा किंवा अतिप्रमाणात वापर धोकादायक असतो. त्यांचा वैद्यकीय निरीक्षणाखाली वापर करून व्याधी आटोक्यात आणणं उत्तम. परंतु काही वैद्य पैशांच्या लोभापायी चूर्णात या औषधाच्या गोळ्या कुटून एकजीव करून रोग्यांना देतात. अशा भामटय़ांपासून सावध राहावं.




उत्तर लिहिले · 14/2/2019
कर्म · 55350

Related Questions

'त्व' प्रत्यय लावून तयार होणारे दोन शब्द कोणते?
फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?
मनगटावर लहान लहान पांढरे डाग आहेत, ही कोड असू शकतात काय ?
गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्से पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?
तोंडावर पिंपल्स खूप आलेत आणि चेहरा काळवंडला आहे तर कोणती क्रिम वापरावी लवकरात लवकर फरक पाडण्यासाठी?
गजकर्णावर कोणत औषध आहे जे 2-3 दिवसात गजकर्ण बरे करेल?
मी फंगल इन्फेक्शनसाठी होमीओपॅथी टॅबलेट घेतो पण कमीच होत नाही?