1 उत्तर
1
answers
बटाटा वापरून कोणकोणते पदार्थ बनवता येतात?
4
Answer link
बटाट्याला चॅलेंज नाही राव ! हा असा पदार्थ आहे ज्यापासून तर्रीबाज तिखट ते गोड पदार्थांपर्यंत काहीही बनवता येतं. कशातही हा ॲडजस्ट होतो.
सकाळच्या नाश्त्यासाठी कमी वेळात बनवले जाऊ शकतील असे पदार्थ 👇
१:- बटाट्याचा चीला
आपण एखादं पीठ वगेरे वापरून धिरडे बनवतो ना त्याच प्रकारे हा बटाट्याचा चिला म्हणजेच धिरडे बनवता येईल.
कृती :-
दोन कच्चे मोठे बटाटे घेऊन त्यांची साल काढून घ्या. आणि बारीक किसनीने दोन्ही बटाटे किसून घ्या. किसलेले बटाटे एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाका आणि तो किस व्यवस्थित धुवून घ्या ज्यामुळे एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल. नंतर तो किस एका भांड्यात घेऊन त्यात एक मोठा चमचा बेसन पीठ आणि दोन मोठे चमचे कॉर्न स्टार्च टाका. मग अर्धा चम्मच जिरा , अर्धा चमचा मीठ , अर्धा चमचा हळद , अर्धा चमचा लाल तिखट , किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. आमचूर पावडर किंवा चाट मसाला असल्यास तोही घालू शकता. त्याच चमच्याने एकदोन चमचे पाणी टाका. मिश्रण ओलसर हवंय पण पातळ नाही.
तवा गरम झाल्यावर त्यावर पाणी शिंपडून ते पाणी कापडाने पुसून घ्या. ही छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट आहे. याने तव्याचं तापमान नियंत्रणात राहतं. आता तव्यावर थोडसं तेल टाका आणि त्यावर आपलं बटाट्याचं मिश्रण टाका आणि त्याला थोडसं गोलाकार पसरवा. झाकण ठेऊन पाच मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. नंतर झाकण काढून बाजूने थोडंसं तेल टाका आणि दोन मिनिटे उघड्यावर शिजू द्या. लालसर रंग आला की झालं !!!!

२:- स्टीमड आलू टिक्की
साधारणतः आलू टिक्की तळून बनवली जाते पण ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायची असल्याने सकाळीच एखादा तळलेला पदार्थ खाणे तितकेसे योग्य नाही म्हणून वेगळ्या प्रकारे बनवता येईल.
बटाटे आधी उकडून घ्यावे लागतील. त्यानंतर एका किसनिने किसून घ्यायचे आणि त्यात कोथिंबीर , हिरवी मिरची , जिरेपूड , धणेपूड , मीठ आणि चाट मसाला घालून ते मिश्रण मिसळून घ्यायचं , मिश्रणाचा एक गोळा तयार होईल.
आता त्यातून छोटे छोटे गोळे काढायचे आणि तळहाताला तेल , तूप किंवा सोप्यात सोपं पाणी लाऊन त्या छोट्या गोळ्याला थोडासा चपटा आकार द्यायचा. टिक्की सारखा. आता इडली पात्राला थोडा वेळ गरम करायला ठेवा , प्रि हीट ज्याला आपण म्हणतो. मग त्यात एका ताटात या सर्व टिक्की ठेवा आणि पंधरा मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करून एकदोन मिनिटे तापमान थोडंसं कमी झालं की टिक्की काढून घ्यायच्या आणि आवडत्या सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करायच्या.
बरं ही पद्धत जर नको असेल आणि तळूनही नको असतील तर शॅलो फ्राय करू शकता. म्हणजेच तव्यावर थोड्याशा तेलात फ्राय करता येतील. ही पद्धत सुद्धा सोपी आहे.

३:- आलू सुजी स्नॅक्स !!
बटाटे , शिमला मिरची , कांदा आणि गाजर अश्या इतरही काही भाज्या घेऊन बटाटे आणि गाजर किसून घ्या आणि शिमला आणि कांदा बारीक कापून घ्या. सर्व एकत्र करा त्यात एक टेबलस्पून मीठ टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या. हे महत्त्वाचं आहे कारण मीठ टाकल्याने भाज्यांना पाणी सुटेल. आता त्यात हळद , लाल तिखट , चाट मसाला , आमचूर पावडर , धणेपूड , जिरेपूड घाला. आता थोडा थोडा करत त्यात रवा टाका. आधी एक चमचा टाका व्यवस्थित मिसळा , मग पुन्हा एक चमचा टाका तोही व्यवस्थित मिसळून घ्या. असं करत करत एक वाटी पूर्ण रवा त्यात टाका. आधी हे मिश्रण खूप सुकं सुकं वाटेल म्हणून लगेच त्यात पाणी टाकू नका. याला तसच १० मिनिट झाकून ठेवा. जेणेकरून भाज्यांच्या पाण्यातच रवा चांगला मिक्स होईल.
१० मिनिटांनंतर एकदा बघा की रवा नीट एकजीव झाला आहे का , नसेल झाला तर एकदोन चम्मच पाणी टाका आणि मग एकजीव करा. गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तोवर पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
गरम तव्यावर थोडसं तेल टाका आणि मिश्रण पसरवा. हातानेच त्याला थोडं थोपटा आणि आकाराने मोठं करा. मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजू द्या. मग दुसऱ्या बाजूनेही ५ मिनिटे चांगलं भाजून घ्या. लालसर झालं आणि थोडसं फुगून आलं की तयार.

४ :- raw potato fries
ही एकदम सोपी रेसिपी आहे. पुन्हा कच्चे बटाटे लागतील आणि त्यांना किसून घ्यावं लागेल. किसलेल्या बटाट्याना स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यात मिरपूड , जिरेपूड, मीठ आणि लाल तिखट घालयचं फक्त. त्यात एक टेबलस्पून कॉर्न स्टार्च आणि दोन टेबलस्पून मैदा घालायचा आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं. इथे मिक्स करताना पाणी अजिबात घालू नका. घट्टसर मिश्रण हवंय.
बटाटे असेही आपण धुवून घेतलेच आहेत. शिवाय मीठ घातल्याने पाणी आपोआप सुटेल. त्यामुळे अतिरिक्त पाणी घालावं लागणार नाही. उलट जर मिश्रण पातळ वाटत असेल तर आणखी मैदा त्यात घालता येईल.
तेल गरम करायला ठेवा. इथे डीप फ्राय कराव लागेल. तेही एकदा नाही दोनदा. आधी हाताने किंवा चमच्याने हे मिश्रण तेलात टाका २ ते अडीच मिनिटे मध्यम आचेवर तळा आणि काढून घ्या. होय. ही पद्धत खूप असरदार ठरते. असेच सर्व फ्राईज अर्धे तळून घ्या. अर्ध्या तासाने पुन्हा तेल गरम करायला ठेवा आणि कडक तपू द्या. तेल चांगलं गरम झालं की मग हे फ्राईज त्यात सोडा. दीड ते दोन मिनिटे रंग येईपर्यंत तळा. आणि काढून घ्या. हे खूप म्हणजे खूप कुरकुरीत होतात. मजा येते खायला. 😋

५:- आलू कटलेट
हा पदार्थ तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. आणि पावसाळा येतोय राव. असले पदार्थ तर हवेच हवे चहाबरोबर.
बटाटे उकडून घ्या आणि त्यांना कुस्करून घ्या. एक कप पोहे लागतील. पोह्याना मिक्सरमधून बारीक पावडर प्रमाणे बनवा आणि बटाट्याच्या मिश्रणात टाका. आता त्यात मिठ , चाट मसाला , लाल तिखट , जिरेपूड घाला आणि मिसळून घ्या.
मग या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे काढा आणि त्यांना असा लांबुळका आकार द्या. दिसायला भारी दिसतात. मग डीप फ्राय करा. नेहमी करतो तसे न करता डबल फ्राय करा. रिझल्ट आणखी भारी येतील. चहाबरोबर हा पदार्थ म्हणजे स्वर्गच जणु 😋
