कथा साहित्य भारत डॉक्टर स्वप्न

डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न थोडक्यात लिहा?

डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार:-
१)आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसत,तर  आपली झोप उडवत ते स्वप्नं असतं

२)देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गाच्या शेवटच्या बाकावर च सापडतात.

३)स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

४)यशाचा आनंद अनुभावण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणीचा सामना करावाच लागतो.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भाषणे प्रेरणादायी असत. यापैकी एक, कलाम यांच्या ‘इंडिया २०२०’ या पुस्तकाचा पाया ठरणारे हे भाषण.. स्वातंत्र, विकास आणि ‘जगासह-जगासाठी भारत’ अशी त्रिसूत्री देणारे.. कलाम यांचा आनंद कशात होता, हेही विस्ताराने सांगणारे..

आपला इतिहास ३००० वर्षांचा आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे आले, त्यांनी आपल्यावर राज्यही केले आणि केवळ आपली भूमी कब्जात घेण्यावर न थांबता, आपल्या मनांवरही त्यांनी ताबा मिळवला. आक्रमणांचा हा इतिहास अलेक्झांडरपासूनचा आहे. ग्रीक आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आणि फ्रेंच तसेच डचही येथे आले. या सर्वानी आपल्याला लुटले. जे आपले होते ते त्यांचे झाले. तरीही आपण मात्र कोणत्याही देशावर आक्रमण कधीच केलेले नाही. आपण जमिनीवर कब्जा केलेला नाही, आपण सांस्कृतिक अतिक्रमणे केली नाहीत, आपण कुणाची राष्ट्रे ध्वस्त केली नाहीत. असे का? मला वाटते, आपण इतरांच्याही स्वातंत्र्याचा आदर करणारे आहोत, म्हणून.

म्हणूनच, माझे पहिले स्वप्न आहे स्वातंत्र्याचे.

भारताला स्वातंत्र्याचे पहिले विराट दर्शन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातून झाले, असा माझा विश्वास आहे. हेच ते स्वातंत्र्य, जे आपण जोपासले पाहिजे, वाढवून बुलंद केले पाहिजे. आपण स्वतंत्र नसलो, तर कोणीही आपला मान राखणार नाही.

माझे दुसरे स्वप्न आहे, विकास.

जवळपास ५० वर्षे आपण ‘विकसनशील देश’ म्हणून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतकडे विकसित देश म्हणून पाहण्याची. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास आपला क्रमांक जगातील पहिल्या पाच देशांमध्ये लागतो. अनेक क्षेत्रांत आपल्या देशाचा वाढदर दहा टक्के आहे. आपल्याकडली गरिबीची पातळी कमी-कमी होते आहे आणि आपल्या यशाची दखल आता जगाकडूनही घेतली जाते आहे. तरीदेखील आपण स्वतला विकसित – स्वावलंबी आणि स्वतवर विश्वास असलेला देश मानण्यास कचरत असू, तर आपला आत्मविश्वास कमी पडतो आहे, हेच त्यामागचे कारण. खरे ना?

माझे तिसरे स्वप्न आहे..

भारताने जगासोबत आणि जगासाठी उभे राहावे, हे. आपण जगासाठी आणि जगासोबत उभे राहिलो नाही, तर आपल्याला मान मिळणार नाही, असेही मला वाटते. स्वतमध्ये शक्ती असेल, तरच शक्तींची साथ मिळते. आपली ही शक्ती म्हणजे केवळ लष्करी बळ नव्हे. आर्थिक सामथ्र्यसुद्धा आपण वाढवले पाहिजे.. हे दोन्ही बाहू सशक्त असले पाहिजेत.

माझे भाग्य असे की, मला तीन महान मनाच्या माणसांसह काम करायला मिळाले. अंतराळ विभागाचे डॉ. विक्रम साराभाई आणि त्यांच्यानंतर प्रोफेसर सतीश धवन, आणि तिसरे डॉ. ब्रह्म प्रकाश- म्हणजे भारताच्या अणुइंधनाचे शिल्पकार. मी या तिघांना अगदी जवळून पाहू शकलो, ही आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी संधी होती, त्या अर्थाने हा केवळ माझ्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल, म्हणून मी भाग्यवान.

माझ्या आयुष्यात चार  महत्त्वाचे टप्पे आले :

पहिला :-  ‘इस्रो’ मधली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतली माझी २० वर्षे. ‘एसएलव्ही-३’ या भारतीय बनावटीच्या पहिल्याच उपग्रह-वाहक यानाच्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून- म्हणजे प्रकल्प संचालक म्हणून करण्याची संधी मला मिळाली. याच यानाने ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा सोडला. ही दोन दशके माझ्या वैज्ञानिक आयुष्यात महत्त्वाची होती.

दुसरा :-  ‘इस्रो’नंतर मी ‘डीआरडीओ’मध्ये (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत) गेलो आणि तेथेही, क्षेपणास्त्र वाहकांवर काम करण्याची संधी मला मिळाली. ‘अग्नी’चे परीक्षण १९९४ मध्ये सफल झाले, तेव्हा मला जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता.

तिसरा:-   अणुऊर्जा विभाग आणि डीआरडीओ यांनी अणुचाचणीसाठी अत्यंत मोलाची भागीदारी केली, तेव्हाचा टप्पा. ११ आणि १३ मे १९९८ या दिवशी मी स्वर्गसुख तिसऱ्यांदा अनुभवले. माझ्या पथकासह माझा सहभाग या चाचणीमध्ये असल्यामुळे,  भारत काय करू शकतो हे जगापुढे सिद्ध करून दाखवण्याची संधी मला मिळाली होती. आम्ही यापुढे ‘विकसनशील’ देश नसून विकसित देशांपैकी आहोत, हे भारताने सप्रमाण दाखवून दिले होते. भारतीय असल्याचा अभिमान ओसंडत होता माझ्यातून. ‘अग्नी’ क्षेपणास्त्र नुसते पुन्हा वापरता येण्याजोगे करून आम्ही थांबलो नव्हतो. त्यासाठी नवे साहित्यही आम्ही वापरले होते. हे साहित्य म्हणजे कर्ब- कार्बन, वजनाला अत्यंत हलके.

चौथा :-   टप्पा जरा निराळा आहे. एके दिवशी हैदराबादच्या निझाम इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून अस्थिरोगतज्ज्ञ असलेले एक डॉक्टर माझ्याकडे आले. त्यांनीही, आम्ही ‘अग्नी’ साठी वापरलेले कार्बनआधारित साहित्य उचलून पाहिले, तेव्हा त्याच्या हलकेपणाने ते अचंबित झाले. तेवढय़ावर न थांबता, मला रुग्णालयात नेऊन त्यांनी काही रुग्णांशी माझी गाठ मुद्दाम घालून दिली. कितीतरी लहानलहान मुले होती तिथे. त्यांच्या पायांत धातूंच्या कॅलिपर होत्या. वजनाला या कॅलिपर तीनतीन किलो, म्हणजे मुलांसाठी जडच. पाय ओढावे लागत होते या मुलांना. डॉक्टर मला म्हणाले : या मुलांच्या वेदना हलक्या होण्यासाठी काही तरी करा. तीन आठवडय़ांत आम्ही अवघ्या ३०० ग्रॅम वजनाची नवी साधने बनवली आणि रुग्णालयात घेऊन गेलो. मुलांचा तर स्वतच्या डोळय़ांवर विश्वासच बसेना. हरखून पाहातच राहिली ती. आता तीन किलो वजन वागवावे न लागता, त्यांना चालता येणार होते. या मुलांच्या डोळय़ांमध्ये अश्रू तरळले, तेव्हा मला चौथ्यांदा स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता.

इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे गेलो असता मी तेथील एक इंग्रजी वृत्तपत्र वाचत होतो. आदल्याच दिवशी जोरदार बॉम्बहल्ले आणि जीवितहानी झाली होती. परंतु या इस्रायली वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मोठे छायाचित्र होते, ते वाळवंटात अवघ्या पाच वर्षांत ‘धान्याचे कोठार’ पिकवून दाखवणाऱ्या एका ज्यू शेतकऱ्याचे. हे चित्र प्रेरणादायी खरेच. हे चित्र पाहून आदल्या दिवशीच्या संहाराचा, बॉम्बहल्ल्याचा आणि बळींचा विसर पडावा, अशी स्फूर्तिदायी शक्ती या चित्रात नक्कीच होती. अर्थात, या बातम्याही त्या दैनिकात होत्याच. आपल्याकडे मात्र याच बातम्यांना प्राधान्य असते.. मृत्यू, आजार, दहशतवाद, गुन्हे..  असे का? आपण इतके नकारात्मक का आहोत?

आणखी एक प्रश्न :

एक राष्ट्र म्हणून आपल्याला, परदेशी बनावटीच्या वस्तूंचे इतके आकर्षण कसे काय? आपल्याला चित्रवाणी संच ‘फॉरेनचे’ हवे असतात, शर्टसुद्धा ‘इम्पोर्टेड’ हवा असतो.. परकीय तंत्रज्ञान आपल्याला हवेसे वाटते. जे जे आयात केलेले ते ते चांगले, हे कोठले आकर्षण? आत्मसन्मानाची भावना विकसित होऊन सार्थकी लागण्यासाठी आधी स्वावलंबित्व हवे, हे आपल्याला लक्षातच कसे येत नाही? हैदराबादेतील या भाषणाला येत असताना एका १४ वर्षांच्या मुलीने माझी स्वाक्षरी मागितली. मी तिला विचारले : तुझे ध्येय काय? स्वप्न काय? ती म्हणाली- मला माझा देश विकसित झालेला पाहायचा आहे. तिच्यासाठी आपल्याला- तुम्हाला आणि मला- विकसित भारताची उभारणी करायची आहे.

चला उद्घोष करू.. भारत हा काही विकसनशील देश नाही. आपले राष्ट्र विकसित राष्ट्र आहे.. भले ते आज घसरणीच्याच विकसित टप्प्यावर का असेना!

राष्ट्रपती असताना फाशीची शिक्षा हे आपल्यापुढील अत्यंत कठीण काम होते. न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर निर्णय घेणे कठीण होते, कारण बहुसंख्य प्रकरणे सामाजिक आणि आíथक विषमतेशी निगडित होती.  व्यक्तीचे वैमनस्य नसते आणि गुन्हा करण्याचा त्याचा हेतू नसतो, अशा व्यक्तीला आपण शिक्षा देत आहोत, अशी त्या वेळी माझी धारणा होत होती. तथापि, एका प्रकरणात उदवाहन चालकाने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्या प्रकरणात मात्र मी त्याची फाशीची शिक्षा कायम केली.

मी शिक्षक आहे व अमेरिकेत प्राध्यापक म्हणून शिकवले आहे, त्यामुळे जिथे ज्ञान आहे तिथे मी जातोच. मुख्यत्वेकरून तरुण पिढीला भेटण्यास मला आवडते. त्यांच्या ज्ञानात सहभागी होणेही मला आवडते.

                      🙏धन्यवाद 🙏

1 उत्तर
1 answers

डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न थोडक्यात लिहा?

0
भारताचे माजी राष्ट्रपती आणि 'मिसाइल मॅन ऑफ इंडिया' अशी ओळख असलेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला होता.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते वैज्ञानिक बनले. डीआरडीओ, इस्रो अशा संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केलं. भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आणि उपग्रह त्यांच्याच नेतृत्वात बनले. ते संरक्षण मंत्र्यांचे सल्लागारही होते. 1999 ते 2001 भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार बनले.

पुढील काळात ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभे राहिले आणि भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 30 हून अधिक पुस्तकं लिहिली.

अब्दुल कलाम यांनी आपल्या कारकीर्दीत वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. त्यांना सर्वांत अधिक आवडायचं ते तरुणांमध्ये मिसळणं. त्यांचे विचार ऐकून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं. भविष्यातला भारत कसा असेल यांचं एक 'व्हिजन' त्यांच्याकडे होतं आणि हे व्हिजन तरुणाईने आत्मसात करावं असं त्यांना वाटायचं.

तरुणाईच्या जोरावर 2020 मध्ये भारत हा केवळ प्रगतीशील देश राहणार नाही तर एक विकसित देश होईल असं त्यांचा दृष्टिकोन होता. 2020मधला भारत कसा असेल याबाबतचे त्यांचे विचार त्यांनी आपल्या 'इंडिया 2020: व्हिजन फॉर न्यू मिलेनियम' या पुस्तकात मांडले आहेत.

अब्दुल कलाम यांनी ज्या गोष्टींचा अंदाज वर्तवला होता त्यापैकी अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत पण त्याच बरोबर आणखी भारताला विकसित देशांच्या यादीत झळकण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे हे देखील तितकेच खरे आहे.

व्हिजन 2020 कसं तयार झालं?
टेक्नोलॉजी इन्फर्मेशन, फोरकास्टिंग अॅंड असेसमेंट काऊन्सिल (TIFAC) ही सरकारची संस्था काही ठराविक कालावधीनंतर संपूर्ण देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत असते. येणाऱ्या काळात देशासमोरील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण आज तंत्रज्ञानाच्या दृष्टीने काय पावलं उचलली गेली पाहिजे हे सांगण्याचं काम ही संस्था करते.

अब्दुल कलाम 1996 मध्ये या संस्थेचे अध्यक्ष होते. 1996-97 साली अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली व्हिजन 2020 डॉक्युमेंट तयार करण्यात आलं होतं.

2020मध्ये या भारतासमोर नेमकं कोणतं उद्दिष्ट असायला हवं याचा अहवाल त्यांनी सादर केला होता.

त्या अहवालाला आधारभूत धरून अब्दुल कलाम यांनी तंत्रज्ञान, विज्ञान, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रासाठी भारताचं व्हिजन काय असायला हवं आणि त्यादृष्टीने सामान्य माणसाने कोणती पावले उचलली पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन केले आहे.

हे पुस्तक तयार करण्यासाठी अब्दुल कलाम आणि त्यांचे सहकारी वाय. एस. राजन यांनी शेकडो तज्ज्ञांचे इंटरव्यू घेतले. लक्षावधी पानांचे संदर्भ तपासले आणि 'India 2020 - Vision for new millenium' हे पुस्तक प्रसिद्ध केलं.

व्हिजन 2020 काय आहे?
अब्दुल कलाम म्हणतात, "आपल्या देशात दरवर्षी 2 कोटी बालकं जन्माला येतात. या बालकांचं भविष्य काय असेल? त्यांच्या समोर काय उद्दिष्ट असलं पाहिजे? त्यांच्यासाठी आपण काही पावलं उचलावीत की त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून फक्त उच्च वर्गाचंच कसं भलं होईल हे पाहावं."

मार्केट ड्रिव्हन स्ट्रॅटेजी किंवा स्पर्धेचं युग असे शब्द वापरून त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं की पुढील दोन दशकांसाठी एखादी योजना आखून ती राबवायची?" असा सवाल ते करतात.

1998 साली लिहिलेल्या या पुस्तकात अब्दुल कलाम सांगतात, "1998 शेकडो तज्ज्ञांशी बोलल्यावर आणि अनेक अहवालांचा अभ्यास केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपण 2020 मध्ये विकसित राष्ट्र होऊ शकतो.

"भारताचे लोक गरिबीवर मात करतील, देशाच्या प्रगतीसाठी अधिक कार्यक्षमतेने काम करतील आपली आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था बळकट होईल. हे केवळ स्वप्नच नाही तर आपल्या सर्वांसाठी उद्दिष्टच आहे,"असं अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं.

व्हिजन डॉक्युमेंटमध्ये असलेली भाकितं...
भारत 2020 मध्ये जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये असेल आणि भारताचं दरडोई उत्पन्न हे 1540 डॉलर्स इतकं असेल भारताची, लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी असेल, तसेच पूर्ण जगातल्या जीडीपीच्या 4.07 टक्के हिस्सा भारताचा असेल, असं भाकित त्यांनी केलं होतं. भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.
2019 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न हे 2000 डॉलर्सहून अधिक होतं. वर्ल्ड बॅंकेनुसार भारताची लोकसंख्या 1.35 अब्ज इतकी आहे आणि भारताचा जागतिक जीडीपीतील एकूण हिस्सा 3.3 टक्के इतका आहे.

1991 च्या जनगणनेनुसार भारताचं साक्षरतेचं प्रमाण 52 टक्के आहे. तंत्रज्ञान आणि भारतीय लोकांचे प्रयत्न यामुळे वर्षांत भारताचं साक्षरतेचं प्रमाण 2020मध्ये 80 टक्के होईल, असं कलाम यांनी म्हटलं होतं. नॅशनल स्टॅटेस्टिकल ऑफिसनुसार सध्या भारतातलं साक्षरतेचं प्रमाण हे 77.7 टक्के इतकं आहे.

सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक
TIFAC च्या अहवालाचा भर प्रामुख्याने हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आहे. असं असलं तरी अब्दुल कलाम यांनी कुठलाही समाजघटक बाहेर राहणार नाही या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे नवीन संधी उपलब्ध होतील पण त्या केवळ एकाच वर्गाला मिळता कामा नये. अन्यथा त्यामुळे संघर्ष आणि भेदभावाला थारा मिळेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गरजेचं आहे," असं कलामांनी म्हटलं आहे.

जीडीपी, फॉरेन एक्सचेंज, आयात-निर्यात, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि आहाराकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे असं त्यांनी अधोरेखित केलं आहे.

2020 नंतर काय करायचं?
2015 साली अब्दुल कलाम यांनी 'Beyond 2020' हे पुस्तक लिहिलं. 2020 ला पाच वर्षं बाकी असताना व्हिजन 2020 नुसार आपण कुठे आहोत हे सांगितलं होतं. आर्थिक उदारीकरणानंतर व्हिजन 2020 मध्ये निर्धारित करण्यात आलेली उद्दिष्टे आपण पूर्ण करू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं.

पण व्हिजन 2020 मध्ये जो जीडीपीबाबतचा केला होता त्या आकड्यांचा आणि सध्याच्या परिस्थितीचा मेळ बसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्याच बरोबर कृषी आणि उत्पादन क्षेत्राबाबत त्यांनी चिंता पण व्यक्त केली होती.

1995 च्या तुलनेत 2015 मध्ये कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे पण याहून आधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते आणि शेतमजूर-शेतकरी जास्त उत्पन्न मिळवून श्रीमंत होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं.

'उद्दिष्ट गाठलं तरी थांबायचं नाही'
उद्दिष्ट गाठलं तरी आपण थांबायची गरज नाही असं कलाम म्हणायचे.

"देशातील लोकांचं भलं व्हावं हे अनंत काळासाठी आपलं ध्येय असावं. ज्या तरुणांकडे ज्ञान, कौशल्य आणि प्रज्वलित मन आहे तेच लोक केवळ दीर्घकालीन ध्येय ठेऊन त्याचा पाठलाग करू शकतात.

"अशा अवस्थेला पोहोचण्यासाठी आपण एकमेकांचं सहाय्य करू शकतो. त्यासाठी आपण आपल्या उद्दिष्टांवरून ढळता कामा नये तसेच वेळोवेळी होणाऱ्या परिवर्तनाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे याकडेही लक्ष पुरवायला हवं," असं कलाम यांना म्हटलंय.

देशाला विकसित बनवण्यासाठी मी एकटाच काय करू शकतो असा विचार कधीही करू नका. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुमची कार्यक्षमता वाढवा सर्वांच्याच प्रयत्नांनी भारत विकसित देश होईल, असा विश्वास कलामांना होता.

विकसित भारत म्हणजे आपण जगभरातल्या पाच सर्वांत मोठ्या अर्थसत्तांपैकी एक असू, संरक्षणाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असू, कृषी, उत्पादन, सेवा क्षेत्रात या आघाड्यांवर भारत सक्षम असेल त्याच बरोबर विकसित कौशल्य असलेला रोजगार आपण निर्माण करू शकू या सर्व गोष्टी विकसित राष्ट्रात अंतर्भूत असायला हव्यात.
भारत स्वतंत्र होण्याआधी भारताचे लोक ज्या तत्परतेनी आणि समर्पणभावाने झटले अगदी त्याच प्रमाणे आपण आपला देश विकसित करायचा आहे हे उद्दिष्ट ठेवलं तर ते नक्कीच आपण गाठू शकतो असं कलाम यांनी आपल्या व्हिजन 2020 मध्ये म्हटलं आहे.

उत्तर लिहिले · 9/2/2023
कर्म · 9415

Related Questions

हिरकणी कथे संदर्भात माहिती मिळेल का?
जेव्हा मी जात चोरली होती त्या कथेचे कथानक कसे स्पष्ट कराल?
चित्रकथा सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर का आहेत?
कथा या साहित्याची संकल्पना स्वरूप कसे स्पष्ट कराल?
कथेचे विविध घटक आणि प्रकार सविस्तर कसे स्पष्ट कराल?
दोस्ती या विषयावर कथा मिळेल का?
नवकथेचे स्वरुप कसे स्पष्ट कराल?