सण हिंदु धर्म धर्म

चंपाषष्टी या सणाचे महत्व काय आहे?

1 उत्तर
1 answers

चंपाषष्टी या सणाचे महत्व काय आहे?

1
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणुन साजरी केली जाते. हा उत्सव सहा दिवसीय मल्हार मार्तंड खंडेराव / खंडोबा देवाचा नवरात्र म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जेजुरी गडावरील परंपरेनुसार देवाची पूजा बांधण्यात येते. यामध्ये समस्थ ग्रामस्थ, पुजारी, मानकरी, सेवेकरी, भाविक सहभागी होतात. मार्गशीर्ष महिन्यातील हा चंपाषष्ठी उत्सव जेजुरीसह कडेपठार येथे साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या या उत्सवास प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात. षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो. खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात.

चंपाषष्ठीच्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात या उत्सवात सामील होतात. भंडारा उधळत 'येळकोट, येळकोट जय मल्हार'च्या आवाजांनी जेजुरीचा परिसर दुमदुमून जातो. भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर म्हणूनच 'सोन्याची जेजुरी' म्हणून ओळखला जातो.

चंपाषष्ठीचा उत्सव हा राज्यात प्रामुख्याने जेजुरी, पाली, गुड- गुड्डापूर/ देवरह या ठिकाणी साजरा केला जातो. तसेच खंडोबा हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या उत्सवाबद्दल काही पौराणिक आख्यायिका आहेत.


खंडोबाने मणी आणि मल्ल यांच्या जाचातून लोकांना मुक्त केल्याने त्याच्या स्मरणार्थ चंपाषष्ठी दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या रूपातील खंडोबाची पूजा केली जाते.

मणी व मल्ल या दानवांसोबत भगवान शंकराने खंडोबाचे/ मार्तंड भैरवाचे रूप घेऊनसलग सहा दिवस घनघोर युद्ध केले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याचा खात्मा केला. त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन 'माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहूदे', अशी इच्छा व्यक्त केली. ती मान्य देखील झाली. तर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे, अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशिर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड, असे म्हटले जाऊ लागले.

उसवाड, ता. चांदवड, जि. नाशिक येथील बारा गाड्यांचा उत्सव.

या दिवशी घटाची स्थापना, नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे(एकभुक्त), शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे सहा दिवस केले जाते. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.खंडोबाची तळी भरून आरती करतात. बऱ्याच ठिकाणी खंडोबाची शक्ती म्हणून बारा गाड्यांची साखळी करून ती खंडोबा भक्तांकडुन ओढली जाते.

  येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट 🙏🙏
उत्तर लिहिले · 1/5/2022
कर्म · 50535

Related Questions

मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व का आहे?
दत्तात्रयांचे 24 गुरू कोणते होते?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
2 मुखी रुद्राक्ष माहिती मिळेल का?
रावणाचे वंशज कोण होते?
नवरात्र म्हणजे काय? तिला शारदीय नवरात्र का म्हणतात?