1 उत्तर
1
answers
काजवे कसे चमकतात?
4
Answer link
सरत्या मे महिन्यात पावसाची चाहूल लागली, की खंडाळ्याच्या घाटातून जाताना तिथली झाडे रोषणाई केल्यासारखी उजळून निघालेली दिसतात. तो प्रकाश पानांचा नसतो, तर त्यांच्यावर वस्तीला आलेल्या काजव्यांचा असतो. काजवे हेही खरं तर प्राणीच. मग ते कसे काय असे चमकू शकतात, कसे काय प्रकाशित होऊ शकतात, हे कोडं आपल्याला डोक्यावर गुंजारव करण्याच्या भुंग्यासारखं सतावत राहतं. काजव्यांच्या शेपटात एक विशिष्ट अवयव असतो. त्यात ल्युसिफेरिन नावाचं एक रसायन असतं. या रसायनाची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की त्यातून प्रकाश बाहेर पडतो. ती विक्रिया होण्यासाठी ऑक्सिजनबरोबरच कॅल्शियम, ऊर्जा देणारा एटीपी हा रेणु आणि ल्युसिफरेज नावाचं विकर तिथं हजर असणंही गरजेचं असतं, कारण त्या अवयवातला ऑक्सिजनचा रेणू बंदिस्त असतो. त्याला मोकळं करण्याची कामगिरी ल्युसिफरेजची असते. ते मोकळं झालं की मग पुढची सारी प्रक्रिया बिनबोभाट पार पडून काजव्याचं अंग उजळून निघतं. हा प्रकाश विजेच्या दिव्यातून मिळणाऱ्या प्रकाशासारखाच असला तरी एक महत्त्वाचा फरकही त्यात असतो. विजेच्या दिवा उजळून निघताना मोठ्या प्रमाणात उष्णताही निर्माण होते. त्यामुळे तो गरम प्रकाश असतो; पण ल्युसिफेरिनपासून बायोल्युमिनिसन्सच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या प्रकाशात उष्णता निर्माण होत नाही. त्यामुळे तो थंड प्रकाश असतो. हे तसं गरजेचंही आहे. कारण प्रकाश निर्माण करण्याच्या प्रत्येक प्रक्रियेबरोबर विजेच्या दिव्याइतकीच उष्णता निर्माण झाली तर त्यापायी तो काजवा भाजून निघून त्याचा कोळसा व्हायचा! याशिवाय नायट्रिक ऑक्साइड चा रेणूही या साऱ्या प्रक्रियेत कळीची भूमिका पार पाडत असतो. बंदिस्त ऑक्सिजनला सुटं करण्याची कामगिरी त्याची असते. या नायट्रिक ऑक्साईडच्या उपलब्धतेवर काजव्याचं नियंत्रण असतं. तो उपलब्ध असेल तर ऑक्सिजन सुटा होतो; पण नसेल तर ऑक्सिजन परत आपल्या कोषात जातो आणि प्रकाश नाहीसा होतो. याचाच वापर करत तो काजवा मग बटन दाबल्यासारखा प्रकाश निर्माण करतो किंवा त्याची निर्मिती बंद करून टाकतो. ही प्रक्रिया झटपट होत असल्यामुळे दिव्याची उघडझाप झाल्यासारखा काजवा चमकू लागतो. आपल्याला ती चमक मोहित करत असली तरी त्याचे खरं प्रयोजन वेगळंच आहे. आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी नर आणि मादी दोघेही या चमचमणाऱ्या प्रकाशाचा वापर करत असतात.