1 उत्तर
1 answers

राज तरंगिणी ग्रंथ कोणी लिहला?

3
राजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ काश्मिरी कवी कल्हण याने इसवी सन ११४७ ते ११५२ या काळात रचला. ... आठ तरंगांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेल्या या संस्कृत काव्यात ७,८२६ श्लोक आहेत.


 
‘राजतरंगिणी’ हा एक महाकाव्य स्वरूपाचा संस्कृत ग्रंथ. काश्मीरचा काव्यमय इतिहास. पंडित कल्हण हा या ग्रंथाचा कर्ता. याचे मूळ नाव कल्याण. अपभ्रंशाने तो ‘कल्हण’ झाला. याचे जन्मस्थान काश्मीर. काश्मीरचे राजे महाराज हर्ष यांचा विश्वासू महामंत्री ‘चंपक’ याचा कल्हण हा मुलगा. त्याला राजकारणात रस नव्हता. काश्मीरचा इतिहास लिहिणे हे त्याचे ध्येय होते. त्यासाठी प्राचीन ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, नाणी, मुद्रा (शिक्के) आणि प्राचीन स्थापत्यकला यांचा त्याने कसून अभ्यास केला.

काश्मीरची संपूर्ण भूमी त्याने पायांखाली घातली. प्रत्येक ठिकाणच्या परंपरा जाणून घेतल्या, ऐतिहासिक घटनांचा क्रम लावला आणि मग लेखनाला सुरुवात केली. इ. स. ११४८ ते ११५० या दोन वर्षांत त्याने आपला ग्रंथ लिहून पूर्ण केला. ‘राजतरंगिणी’ म्हणजे महाभारत काळापासून ते बाराव्या शतकापर्यंतचा विस्तृत आणि क्रमबद्ध असा काश्मीरचा प्रदीर्घ राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास. काश्मीरचा राजा जयसिंह (इ. स. ११२८-५०) याच्या कारकीर्दीत तो रचला गेला.

हा ग्रंथ संस्कृत भाषेतला श्लोकबद्ध ग्रंथ आहे. त्यात ७,८२६ श्लोक आहेत. त्याचे आठ विभाग म्हणजेच आठ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाला त्याने ‘तरंग’ म्हटले आहे. ‘तरंग’ म्हणजे लाटा आणि ‘तरंगिणी’ म्हणजे नदी. ही राजवंशरूपी नदी आहे. समस्त संस्कृत साहित्यात ‘महाभारत’ आणि ‘राजतरंगिणी’ हे दोनच खऱ्या अर्थाने इतिहास ग्रंथ आहेत.

‘राजतरंगिणी’ हा मूळ ग्रंथ ‘शारदा’ या लिपीत होता. मूरक्राफ्ट या अभ्यासकाने त्याची देवनागरी संहिता तयार केली, अशी प्रस्तावनेत नोंद आहे. हे काम पायाभूत आहे. त्याचे प्रथम संपादन आणि प्रकाशन केले ते ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ या संस्थेने. ही कोलकात्याची प्रतिष्ठित अशी संशोधनसंस्था आहे.

‘राजतरंगिणी’चा इंग्रजी अनुवाद रणजित पंडित या संस्कृत विद्वानाने केला. हे विजयालक्ष्मी पंडितांचे पती आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे मेहुणे. त्या इंग्रजी अनुवादाला पंडित नेहरूंनी एक छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे. नेहरू हे अंतर्बाह्य़ काश्मिरी. काश्मीरवर त्यांचे निरतिशय प्रेम. त्यामुळे पंडितांनी केलेल्या अनुवादाला त्यांनी फार प्रेमाने प्रस्तावना लिहिली आहे आणि ‘राजतरंगिणी’चा मराठी अनुवाद करणाऱ्या अरुणा ढेरे यांनी त्या प्रस्तावनेचा काही अंश आवर्जून भाषांतरित स्वरूपात आपल्या प्रस्तावनेत उद्धृत केला आहे. शिवाय रणजित पंडितांच्या कन्या प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांनीही या मराठी अनुवादाला मनोगताची लहानशी जोड दिली आहे आणि आपल्या वडिलांच्या आठवणी ‘राजतरंगिणी’च्या संदर्भात जागवल्या आहेत.

‘राजतरंगिणी’ या काव्यरूप इतिहासग्रंथाचा कर्ता कल्हण हा महामात्य चंपक यांचा मुलगा असल्याचा निर्देश प्रत्येक तरंगाच्या शेवटी अगदी स्पष्टपणे आला आहे. १२ व्या शतकातला हा काव्यग्रंथ म्हणजे काश्मीरचा प्राचीनतम इतिहास आहे. त्याच्या साहाय्याने कल्हणाच्या पूर्वकालीन, समकालीन आणि उत्तरकालीन वाङ्मयकृतींच्या आणि तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांच्याही निर्मात्यांचे काळ ठरवण्यासाठी भक्कम आधार मिळतो.

महाभारतकालीन ‘गोनर्य’ राजापासून ते अकराव्या शतकातल्या ‘हर्ष’ राजापर्यंत सुमारे चार हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा काश्मीरचा इतिहास साक्षात करण्याचा कल्हणाचा प्रयत्न म्हणजे ‘राजतरंगिणी’ हे काव्य! या मूळ संस्कृत ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे श्रेय डॉ. अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांना आहे. ग्रंथाचे दर्शन नयनसुभग आहे. मुखपृष्ठावर काश्मिरी स्थापत्याचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या भव्य मरतड मंदिराचे देखणे छायाचित्र आहे. अनुवादकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ म्हणून हा सहाशे पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध झाला आहे. त्याला डॉ. अरुणा ढेरे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.

या ग्रंथाच्या मराठी अनुवादामुळे काश्मीरचा प्राचीन वारसा, काश्मीरचा निसर्ग, तिथल्या प्राचीन परंपरा, माणसे, त्यांची संस्कृती, राजवटी आणि तिथल्या भल्या-बुऱ्या सार्वजनिक व्यवस्था यांचा रोमहर्षक अनुभव मराठी मनांना यावा. काश्मीरच्या भूमीची स्वतंत्र अस्मितेची घडण हा हजारो वर्षांच्या इतिहासाचा परिपाक आहे. काश्मीर ही केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही. तिथे नांदणाऱ्या माणसांनी, त्यांच्या सुख-दु:खांनी, विचारधारांनी सनातन मानवी जीवनपटावर आपली जागा निर्माण केली आहे आणि आपल्या जगण्याचे मूलाधारही निर्माण केले आहेत. या साऱ्यांचा उलगडा होण्यासाठी, काश्मीरच्या जनतेची जडणघडण कशी झाली, हे समजून घेण्यासाठी हा मराठी अनुवाद उपयुक्त व्हावा अशी डॉ. अरुणा ढेरे यांची अपेक्षा आहे. तशी संधीच वाचकांना या अनुवादाने उपलब्ध करून दिली आहे.

काश्मीरमध्ये अनेक शतके शैव, वैष्णव आणि बौद्ध हे तीनही धर्मसंप्रदाय एकत्र नांदत होते. काश्मीरच्या राजांनी काश्मीरमध्ये अपार संपत्ती आणली. देवस्थानांना विपुल दाने दिली. उदारपणे शेकडो अग्रहार दिले. मात्र संपत्तीच्या विनियोगातून या प्रदेशात एक भक्कम अर्थव्यवस्था उभी राहिलेली दिसत नाही. विशेषत: दहाव्या शतकानंतर काश्मीरची व्यापार समृद्धी घटत गेल्याची नोंद कल्हणाने केली आहे. काश्मीरच्या राजांनी केवळ आपल्याच नव्हे, तर अन्य धर्माच्या पूजास्थानांचाही आदर केला आणि त्यांना उदार साहाय्य केले. अशी पुष्कळ उदाहरणे ‘राजतरंगिणी’त आहेत आणि एखाद्या लोभी आणि क्रूर राजाने अगणित संपत्तीने युक्त अशी देवस्थाने लुटल्याचीही नोंद आहे. तेव्हा त्याने स्वत:च्या श्रद्धाकेंद्रांनाही त्या लुटीतून वगळले नाही. त्याही बाबतीत जणू सर्वसमभावच दिसतो, असे उपहासाने म्हणावेसे वाटते.

या पहाडी प्रदेशात शेतीयोग्य जमीन कमी. त्यामुळे उपजीविकेचे विविध व्यवसाय वाढीला लागले नाहीत. एक विशेष नोंद राजा अवंति वर्मा याची. त्याने मात्र आपल्या कर्तबगार मंत्र्याच्या मदतीने धरणे, कालवे, मातीची परीक्षा, पाणीपुरवठय़ाचे नियोजन अशा उपायांनी राज्याच्या व्यावसायिक उत्कर्षांसाठी यशस्वी प्रयत्न केलेले दिसतात.

काश्मीरमधले स्त्रीजीवन बहुपेडी आहे. संस्कृत, प्राकृत अशा दोन्ही भाषा बोलणाऱ्या सुशिक्षित स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रातही पुष्कळ होत्या. राजस्त्रियांचे स्वतंत्र सल्लागार असत. त्यांची व्यक्तिगत स्वतंत्र धनसंपत्ती असे. स्वतंत्र खजिनदार असत. त्या राजकारणात सक्रिय भाग घेत आणि कुठेही कमी पडत नसत. सुगंधा, दिशा, सूर्यमती या राण्यांची उदाहरणे नजरेत भरणारी आहेत. सत्ताधारी राजांच्या चरित्रांप्रमाणेच विलासी आणि चैनी राजस्त्रियांची उदाहरणेही कल्हणाने प्रसंगोपात्त रंगवली आहेत.

काश्मीरची राजगादी जशी वंशपरंपरागत अनेकांना मिळत गेली, तशीच ती अगदी सामान्य, अतिसामान्यांनाही मिळत गेल्याची नोंद कल्हणाने केली आहे. जादूटोणा, मंत्र-तंत्राचा प्रभाव जनतेवर आणि काही राजांवरही त्याला दिसून आला. सत्प्रवृत्त आणि असत्प्रवृत्त, कर्तबगार आणि कपटी अशा राजांचे आणि राण्यांचे वर्णन कल्हणाने मार्मिकपणे केले आहे. काही राजांचे शेवट उदात्त, तर काहींचे विषण्ण करणारे झाले. कल्हणाने साक्षीभावाने हा इतिहास उभा केला आहे.

मानवी जीवनातले सुख-दु:खांचे प्रसंग त्याने चलत् चित्रपटासारखे वर्णन केले आहेत. वीर, करुण, भयानक असे अनेक रस या काव्यात भरून वाहतात. वाचकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची कल्हणाची शैली आहे.

‘राजतरंगिणी’सारखा प्रचंड ग्रंथ तोही मूळ संस्कृतमधून वाचणे आणि त्यातून काश्मीरचा इतिहास समजून घेणे कठीण आहे. संस्कृतचे अभ्यासकही त्या वाटेला फिरकणे कठीण. अशा परिस्थितीत या ग्रंथाचा मराठी अनुवाद वाचकांच्या हाती देणाऱ्यांचे कौतुक वाटते. पुढच्या आवृत्तीत जर तरंगांच्या पृष्ठ क्रमांकांसह अनुक्रमणिका देता आली, प्रत्येक नव्या राजाची राजवट त्याच्या नावाने ठळक अक्षरांत छापून स्पष्ट करता आली. अखेरीला सर्व राजांची त्यांच्या काळाच्या नोंदीसह सूची देता आली, नद्यांची वा देवतांची नावे आजच्या नामनिर्देशासह स्वतंत्र यादीने ग्रंथाच्या अखेरी देता आली, तर मोठाच उपयोग होईल. पुढच्या पिढीतल्या अभ्यासकांनी हे जिकिरीचे काम दुसऱ्या आवृत्तीसाठी पार पाडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.




 

उत्तर लिहिले · 5/1/2022
कर्म · 121725

Related Questions

मानवी हक्काची घोषणा म्हणजे काय?
राज्यशास्त्राचा अर्थ कसा विशद कराल?
भारतीय घटनेतील मुलभुत तत्वे कोणती आहेत?
भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे?
उपराष्ट्रपती कोण आहेत?
विषय इतिहास राज्यशास्त्र प्रश्न पहिला उगवत्या सूर्याचा टिंब टिंब या राज्याला संबोधण्यात येते?
तुलनात्मक राज्यशास्त्राचा अर्थ व व्याप्ती स्पष्ट करा?