दारू

दारू पिल्यावर चक्कर का येते?

1 उत्तर
1 answers

दारू पिल्यावर चक्कर का येते?

3
ज्याला आपण दारू म्हणतो तो एक प्रकारच्या पेयांचा गट आहे. त्यात बीअरपासून वाईन, रॉम्पेन, व्हिस्की, रम, जिन या प्रकारच्या विदेशी मद्यांबरोबरच संत्री, मोसंबी, फेणी, ताडी, माडी यांसारख्या देशी मद्यांचा समावेश होतो. काही प्रकारची गावठी दारू नवसागर किंवा फ्रेंच पॉलिश यांसारख्या द्रव्यांपासून बनवलेली असते. कोणताही प्रकार असला तरी तिच्यात मद्यार्काचा समावेश असतो. काही गावठी दारूमधला मद्यार्क मिथेनॉल या रसायनाचा असतो. तो अत्यंत विषारी असतो. त्याच्या सेवनामुळे आंधळेपणा येतो. जास्त प्रमाणात त्याचं सेवन झाल्यास मरणही ओढवू शकतं. कायद्यानं मान्यता दिलेल्या देशी किंवा विदेशी दारूमधला मद्यार्क इथेनॉलचा असतो. हे रसायनही तसं विषारी असलं तरी मिथेनॉलसारखं जहाल नाही. त्याचं विघटन करून त्यातला विखार नाहीसा करण्याची क्षमत आपल्या यकृतात असते; पण ही मर्यादित आहे. एका तासात जास्तीत जास्त तीस मिलिलिटर इथेनॉलचा निचरा यकृताकडून होत असतो. त्या संथ वेगानं दारू घेतल्यास ती सहसा चढत नाही. त्यामुळं दारू चढण्याचं प्रमाण हे त्या दारूत इथेनॉलचं प्रमाण किती आहे आणि तिचं सेवन कोणत्या वेगानं होत आहे, यावर अवलंबून असतं. बीअरमध्ये सहसा इथेनॉलचं प्रमाण सहा-सात टक्क्यांहून अधिक असत नाही. म्हणजेच अर्धा लिटर बीअरमध्ये इथेनॉलचं प्रमाण ३५ मिलिलिटर एवढं असतं. एका तासात त्याचा निचरा यकृताकडून होऊ शकतो. त्यापेक्षा अधिक वेगानं दारूचं सेवन केल्यास अतिरिक्त इथेनॉल रक्तात उतरतं. इथेनॉलचे रेणू लहान असल्यामुळं रक्त आणि मेंदू यांच्यामध्ये निसर्गानं जी एक संरक्षक फळी उभी केलेली आहे ती भेदून ते रेणू मेंदूमध्ये प्रवेश करू शकतात. तसं केल्यानं मेंदूतील मज्जापेशी एकमेकींमध्ये संवाद साधण्यासाठी ज्या एका रसायनाचा वापर करत असतात त्या 'गाबा' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रसायनाशी त्याची प्रक्रिया होऊन मेंदूच्या कामात अडथळा येऊ लागतो. त्याचं काम सैलावतं. खास करून आपल्या सामाजिक वागणुकीचं नियंत्रण करणाऱ्या केंद्राचा ताबा
सुटतो. त्यामुळे मग ती व्यक्ती आपल्यावरची बंधनं झुगारून स्वैर वागणुकीला प्रवृत्त होते. एरवी चारचौघात न केले जाणारे चाळे करण्याकडे त्याची प्रवृत्ती होते. मद्याचं सेवन केल्यापासून ३० सेकंदांतच त्यातला वीस टक्के मद्यार्क रक्तात उतरत असल्यामुळे मेंदूवर त्याचा प्रभाव पडण्यास लगेचच सुरुवात होत असते. मद्यार्काचं रक्तप्रवाहात उतरण्याचं प्रमाण आणि त्याचा यकृताकडून निचरा होण्याचं प्रमाण यांच्यातील समतोलावर, माणसाला दारू किती प्रमाणात चढते हे अवलंबून असतं. हा समतोल फारसा बिघडला नसल्यास दारू फारशी चढत नाही; पण तो जास्तीत जास्त बिघडत चालला तर मग मेंदूचं हालचालींवरचं, मानसिक संतुलनावरचं, वागणुकीवरचं नियंत्रण ढिलं पडायला सुरुवात होते. त्यामुळे वाहन चालवणं किंवा सभ्यतेच्या मर्यादा पाळणं अधिकाधिक अशक्य होऊ लागतं. दारू पिणं थांबवल्यानंतर रक्तात साचून राहिलेल्या मद्यार्काचा संपूर्ण निचरा झाला की माणूस पूर्वपदावर येतो..
उत्तर लिहिले · 18/12/2020
कर्म · 20065

Related Questions

माझे पती रोज दारू पिऊन माझा खुप राग राग करतात त्यावर उपाय काय?
सर माझा भाऊ खूप दिवसापासून दारू पितो कोणतही मेहनतीच काम करतो आणि पैसे लगेच उडवून टाकतो त्याला खुप बोललो काही फ़ार पडत नाही.?
मला माझे वडील खूप छळतात दारू पिवून मला पैसे दे म्हणून माझ्यावर त्यांना मारले म्हणून खोटे आरोप टाकतात, लोकांमध्ये नातेवाईकांमध्ये उगाच ओरडून सांगतात,खरं मी मुलगा म्हणून प्रेत्येक कार्य मी चांगल्या रीतीने पर पाडतोय काय करू आत्महत्या करू वाटते?
भारतातील मद्य(दारू) बनवणारी जात कोणती?
मला दारू पिणे बंद करण्यासाठी काय करावे लागले?
अल्कोहोल ( दारू ) का चढते ?
ओम नमः शिवाय मंत्र म्हणणे योग्य आहे का कारण शिवजीचे भक्त हे दारु किंवा इतर व्यसन करणारे असतात तर प्लिज सांगा योग्य राहील का?