अध्यात्म उपवास

उपवास म्हणजे नेमकं काय ?

1 उत्तर
1 answers

उपवास म्हणजे नेमकं काय ?

2
​उपवास -खरा अर्थ काय ?
भारतीय आणि उपवास यांचे नाते आपण चांगलेच जाणून आहोत ,त्यातही इतर गोष्टींप्रमाणेच महाराष्ट्र यातही आघाडीवर आहे .अनेक देवदेवता ,त्यांची नवरात्रे ,शिवाय रामनवमी,हनुमानजयंती,जन्माष्टमी,गणेशजयंती असे अनेक उपास,याखेरीज महाशिवरात्र,आषाढी आणि कार्तिकी एकादशी ,मासिक नियमित उपासंमध्ये चतुर्थी ,दोन एकादश्या ,प्रदोष आणि शिवाय साप्ताहिक ज्याचा त्याचा सोमवार ते रविवार असा कोणताही वार ,अशी ही न संपणारी जंत्री आहे .

बर उपास का करता असं विचारलं तर त्याचं पटेल असं उत्तर कोणालाही सांगता येत नाही .आमच्या घरची पद्धत आहे ,लहानपणापासून करत आलो आहोत ,अहो देवाचं असं मधेच सोडता येतं का अशी उत्तरं मी अनेक वर्षं रुग्णांकडून ऐकत आले आहे .

उपवास म्हणजे जवळ बसणे म्हणजे काय तर शरीराची ,खाण्याची चिंता सोडून सगळे तनमन देवाशी एकाग्र करून देवाच्या जवळ बसणे .आपल्यापैकी किती जण असा उपवास करतात सांगा पाहू? उलट भजन ,कीर्तन करून येणाऱ्या बायकांची चर्चा ऐकली तर हसू येते .चला ,जाताजाता मला केळी,खजूर आणि राजगिरा लाडू घ्यायचे आहेत ,घरी जाऊन खिचडी परतायची आहे असे संवाद ऐकू येतात .काही विशेष उपवास म्हणजे जे सामान्यपणे सगळ्या कुटुंबाने करणे अपेक्षित असते ,तेव्हातर विचारूच नका ,बायकांचा पूर्ण दिवस स्वैपाकघरात जातो.उपासाला चालणारे असे म्हणून जेव्हढे काही पदार्थ असतील ते सगळे ताटात अवतीर्ण होतात .साबुदाणा ,शेंगदाणे ,भगर ,राजगिरा ,बटाटे ,रताळी काही काही बाकी ठेवलं जात नाही .त्यामुळे उलट नेहमीचं जेवण परवडल असं आपलं पोट म्हणत असेल .त्यामुळेच ” एकादशी आणि दुप्पट खाशी ” ही जी म्हण आपल्याकडे उपासाच्या बाबतीत वापरली जाते ती बरोबरच आहे .

उपवासाचे सगळे पदार्थ खाऊन पित्त वाढते ,बटाटे खाऊन पोट गुबारत ,गच्च होतं .मग दुसऱ्या दिवशी कोणाचं डोकं दुखत ,कोणाला उलट्या होतात, कोणाला जुलाब होतात तर कोणाला अजीर्ण नाहीतर मलबद्धता !! इतके त्रास करून उपास करा असं कोणता देव सांगतो सांगा बरं ?

खरं तर उपवास किंवा लंघन ही एक अतिशय उपयोगी अशी चिकित्सा म्हणून आयुर्वेदानेही वर्णन केली आहे .काही आजार असे असतात की ज्यात अन्न खाण्याने किंवा नियमित आहार घेण्यामुळे दोष आणि पर्यायाने तो आजारही वाढतो म्हणून मग पूर्ण उपास किंवा केवळ गरम पाणी ,फक्त दूध ,पेज ,पातळ भात किंवा कढण असा आहार वैद्याकडून सुचवला जातो, जो औषधाचा परिणाम अधिकच सुधारण्यास मदत करतो.अश्यावेळी मात्र रुग्ण ” अरे बापरे ! फक्त दूध प्यायचं ?पोट भरेल का ?” असे प्रश्न विचारतात .

एरवीही आपल्याकडे जास्तीतजास्त उपवास हे पावसाळ्यात करायला सांगितले आहेत ,म्हणजे एका वेळेचाउपास आणि रात्री जेवण किंवा नक्त ,कधी दोन्ही वेळेचे उपास असे अनेक प्रकारे केले जातात .याचे प्रमुख कारण असे की चातुर्मास सुरु होतो तो पावसाळ्याच्या सुरुवातीला !! जेव्हा पाऊस नुकताच सुरु होतो तेव्हा पाणी जड असते ,हवा गार असते आणि पचनशक्ती मंदावलेली असते ,त्यामुळे लंघन करून या पचन शक्तीला मदत करण्याच्या हेतूने उपवासाची योजना केलेली आहे .पावसाळ्यात तळलेले खाऊ नये ,जड खाऊ नये ,हलकाच आहार घ्यावा हे सगळे नियम आपल्या शरीराच्या भल्यासाठीच आहेत पण आपण ते सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्याला आवडतील ,जिभेचे चोचले पुरवतील असे पदार्थ शोधून शोधून खातो.साबुदाणा वडे काय ,बटाटा वेफर्स काय ,dryfruits काय ,पेढेबर्फी काय !!

त्यामुळे हल्ली जेव्हा मला काही पेशंट विचारतात की उपास करू का ?तेव्हा मी त्यांना उपवास असं नाव न घेता Diet Plan म्हणून काही नियम लिहून देते ,जे खास पावसाळ्यातील स्वास्थ्य रक्षणाचे आहेत आणि ही मात्रा बरोबर लागू पडते .हल्लीच्या पिढीला त्यांच्याच भाषेत सांगितलेलें बरं असा विचार करते .

आपण यापैकी काय काय करतोय आणि खरं काय करणं अपेक्षित आहे याचा आपणच विचार करूया झालं !!
उत्तर लिहिले · 26/11/2020
कर्म · 39105

Related Questions

व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
गुरू करणे का गरजेचे असते?
चक्रधर स्वामी महात्मा कोणाला म्हटले जाते?
शिवलिंगाचा खरा अर्थ काय आहे?
दगडू शेठ हलवाई कोणत्या शहरात आहे?
संत मीराबाईची भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात?
कोकणात जागेचा ब्राम्हण माहिती मिळेल का?