भ्रष्टाचार समस्या निबंध लिखाण

भ्रष्टाचार एक समस्या निबंध ?

1 उत्तर
1 answers

भ्रष्टाचार एक समस्या निबंध ?

4
भारत दिवसेंदिवस विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे परंतु आपल्या समोर आजही अनेक अतिशय गंभीर समस्या आहेत. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी या सोबतच भ्रष्टाचार ही आपल्या देशासमोरील गहन समस्या आहे. अगदी सरकारी शिपायापासून ते मोठ-मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. आज भारतात कोणतेही छोटेमोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार चहापाणी द्यावेच लागते, कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही पण कळत नकळत आपणही भ्रष्टाचाराला बढावा देत असतो.

भ्रष्टाचाराची सुरवात झाली कशी व कुठून ह्याबद्दल कोणीही फारशी माहिती सांगू शकत नाही, पण हे खर आहे कि जस जसा माणसांकडे पैसा येऊ लागला तस तसा माणूस चैनीच्या व दिखाव्याच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला. पूर्वी जेव्हा माणसांकडे जास्त पैसा नव्हता तेव्हा त्यांच्या साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू महत्वाच्या होत्या. त्यांची अपेक्षा फक्त दोन वेळेचे पुरेसे जेवण आणि जीवनावश्यक वस्तू मिळविणे एवढेच होते. त्यामुळे पूर्वीचे बहुतेक लोक मेहनती आणि निर्मळ मनाचे होते. जसजशी सुधारणा होत गेली तश्या अनेक चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. गरज नसतानाही त्या हव्याहव्याश्या वाटू लागल्या. माणसांना लोभ वाटू लागला. जास्त मेहनत न करता अधिकाधिक संपन्न जीवन जगण्याची हाव वाढू लागली. ही हावच मूळ आहे भ्रष्टाचाराचे.

आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरफायदा घेऊन कमीतकमी मेहनत करून जास्तीत जास्त नफा करून घेणे हा भ्रष्टाचारा मागचा उद्देश्य असतो. पण सामान्य माणूस सुद्धा तेवढाच गुन्हेगार जेवढा लाच मागणारा माणूस. सामान्य माणूस लाच देतो म्हणून समोरचा माणूस लाच घेतो. किती सहजपणे आपण नकळतच गुन्हा करत असतो. कितीवेळा बघतो आपण नाक्यावर पोलिसांनी पकडले कि सर्वजण पोलिसाच्या हातावर पन्नास – शंभर रुपये टेकवून पुढे निघून जातात. सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखांची लाच दिली जाते. शाळेत- कॉलेजात अॅडमिशन घेताना कोण-कोणाला पैसे चारले जातात. इतकच नव्हे तर देवळाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण १०००- ५०० रुपये देऊन लवकर दर्शन घेतो. का? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असताना आपण मात्र पैशाच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो. पटत असेल का हे देवाला? आपल्या मनाला तरी पटते का?

किती वेळा लोक दुसऱ्यांना पैसे देऊन नोकरी किंवा उच्च पद मिळवतात. निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केली जातात. नंतर जेव्हा अश्या लोकांना अधिकार प्राप्त होतात तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात. आपली प्रत्येक काम करताना आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. का हे आपल्याला आधी कळत नाही कि जे लोक चांगली काम करून निवडून येण्याऐवजी मतदाराला पैसे चारून निवडून येतात ते लोक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणार नाही. तेव्हा आपण डोळ्यावर बक्षिसांची पट्टी बांधून कोणालाही निवडून देतो आणि मग भारतातील सिस्टीमला नाव ठेवत बसतो. पण आपली चूक कबूल करत नाही.

काही दिवसापूर्वी मी एक लघुपट पहिला होता. त्यात एक भ्रष्ट अधिकारी असतो जो पैसे घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचे अॅडमिशन करून देत असतो. त्यामुळे चांगली बुद्धीमत्ता असलेली मुले पुढे येऊ शकत नाही याउलट कमकुवत बुद्धिमत्ता असलेली मुले पैशांच्या जोरावर डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवतात. पुढे हि मुले पैसे चारून पेपर विकत घेऊन पास होतात. काही काळानंतर त्या अधिकाराच्या मुलाला भयंकर रोग होतो आणि त्याचे ऑपरेशन करायचे असते. तो मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो तर तिथे त्याला पैसे देऊन डॉक्टर बनलेला मुलगा आढळतो. हा काय आपल्या मुलाचे ऑपरेशन करणार म्हणून तो दुसरीकडे जातो पण तिथे सुद्धा हीच परिस्थिती. तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे सर्वत्र पैशाच्या जोरावर बनलेले डॉक्टर असतात. त्याला आपली चूक उमगते पण आता वेळ निघून गेलेली असते.

आपणा सर्वाना समजायला पाहिजे कि भ्रष्टाचार करून प्रगती करण्यापेक्षा मेहनत करून प्रगती करायला पाहिजे. थोडा त्रास झाला तरी चालेल पण पैसे देऊन आपण आपले काम करून घेतले नाही पाहिजे. कदाचित आपल्या सर्वाना हे पटत असत, पण पटल तरी आपण कळत नकळत भ्रष्टाचार करत जातो. आणि जेव्हा दुसरे आपल्या पेक्षा जास्त पैसे देवून आपल्या पुढे जातात तेव्हा मात्र आपण त्यांच्या नावाने शंख करत बसतो. कधी कधी तर असे होते कि आपण पैसे देऊन काम करवून घेतो आणि आपल्या ह्या वृत्तीमुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लागते, मग तो माणूस एखाद्या गरिबाचे सहज काम करत नाही कारण त्यात त्याला नफा नसतो. किती त्रास होत असेल गरिबांना या भ्रष्टाचाराचा हा आपण विचारच नाही करत. माझ काम पटकन झालं पाहिजे, पाहिजे तर थोडे पैसे घ्या पण काम करा हि अनेकांची वृत्ती असते.

का नाही आपण आपल्याला सुधारत? हे सर्व तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ह्या देशातील प्रत्येक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही. थोडे कष्ट पडले तरी चालतील पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक माणसात येत नाही तोपर्यंत आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. आपल्या भारताची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आजपासून सर्वांनी प्रतिज्ञा करावी कि मला कितीही त्रास पडला, कामाला कितीही वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही.
उत्तर लिहिले · 14/12/2019
कर्म · 19320

Related Questions

लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे नक्षीदार?
शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत कसा लिहाल?
लेखन विषयक नियम म्हणजे काय हे सांगुन मराठी लेखणाचा आढावा घ्या?
पुस्तपालन म्हणजे काय?
मंगल अष्टका कोणी लिहिल्या?
लग्नाचा बायोडेटा कसा असावा?
शिलालेख म्हणजे काय?