व्यसन

मोबाईल चे व्यसन?

1 उत्तर
1 answers

मोबाईल चे व्यसन?

0
मोबाईलचे व्यसन 

पूर्वी ट्रेनमध्ये माणसं पुस्तकात, वर्तमानपत्रात बुडालेली असायची. आता व्हॉट्सअॅपमध्ये गुंगलेली असतात. इयरफोन्स लावल्यावर तर आपण आसपासच्या जगाशी संबंध नसल्यासारखे वावरतो. मोबाइलने आपल्याला लांबच्या माणसांशीही जोडलं हे खरं आहे पण, आसपासच्या माणसांपासून तोडलंय हे नाकारता येणार नाही. या स्मार्टफोनच्या लाटेत वाहवत जायचं की, स्मार्टपणे त्याचा वापर करायचा हे आपलं आपणच ठरवायचंय.


मध्यंतरी कोणीतरी एक ‘एसएमएस’ पाठवला होता. तो वाचून हसायला तर आलंच; पण हसता हसता अंतर्मुखही झालो. पूर्वी एकमेकांना भेटल्यावर लोक विचारत, ‘कसे आहात?’ आजकाल विचारतात, ‘तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे?’

तुमच्यापैकीही बऱ्याच जणांनी हा मेसेज वाचला असेल. खरंच आपण तंत्रज्ञानाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत का? हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला आणि उत्तर ‘हो,’ असं आलं.

कोणतंही हॉटेल असो वा कॉफी शॉप! जिथं लोक एकत्र येतात, असं कोणतंही ठिकाण असलं तरी आपण प्रत्येकजण लोकांच्या घोळक्यात एकएकटे असतो. कारण आपण आपल्या फोनसोबत असतो.


तरुणाईमध्ये मोबाइल फोन हा तर ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. कोणाचा मोबाइल फोन किती मोठा, किती महाग, ‘अॅप’चं वैविध्य, यावर तुमचं, तुमच्या गटातलं स्थान ठरत असेल, तर थोडं थांबून विचार करायची गरज आहे.


पुनीत, समीर, अॅनी आणि जॉशुआ हे अगदी शाळेपासूनचे मित्र. यांचे आई-वडील पण एकमेकांच्या चांगल्या ‌परिचयाचे असल्यामुळं एकमेकांच्या घरी कधीही आणि कितीही वेळ जाऊन बसण्याबद्दल कोणाचाच आक्षेप नसतो. शाळेत असताना ही मुलं खूप अॅक्टिव्ह होती; पण कॉलेजात गेल्यापासून मात्र ही मुलं सारखी आपापल्या घरात बसून आपल्या मोबाइल फोनवर काहीतरी करत असतात. त्यांचे आई-वडीलही त्यांच्या या सवयीला कंटाळले होते. त्यांच्या या सवयीतून त्यांना बाहेर काढणं गरजेचं होतं. यासाठी चौघांना एकत्र बोलावून त्यांची भेट घेतली. सुरुवातीला या भेटीचं प्रयोजन त्यांना कळलंच नाही; कारण त्यांच्या मते ते मेसेजेसद्वारे ते सततच ‘कनेक्टेड’ असतात; पण ‘व्हर्च्युअली कनेक्टेड’ आणि खरंखुरं कनेक्शन यातला फरक समजावून देण्याची हीच वेळ होती. तरुण वर्गाची एक फार भारी गोष्ट असते. नीट पटवून दिलं, तर कोणताही बदल ते पटकन स्वीकारतात. ही चौघंही त्याला अपवाद नव्हती. बरेच दिवसांत एकमेकांबरोबर ‘क्वालिटी टाइम’ व्यतीत न केल्याचं त्यांच्या आईवडिलांनी निदर्शनास आणून दिलं आणि दुसऱ्याच दिवशीचं एक छोटसं आउटिंग त्यांच्यासाठी योजलं. अट फक्त एवढीच होती, की बाहेर जाताना आपल्या पालकांना फोन करण्याव्यतिरिक्त कोणीही मोबाइल फोन वापरणार नाही. या मोबाइलविनाच्या सहलीने त्यांची त्यांनाच चूक कळून आली. मोबाइलच्या अडथळ्याशिवाय आज कितीतरी ‌महिन्यांनी त्यांनी एकमेकांशी भरभरून संवाद साधला होता. इतक्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला चाललेल्यापैकी ८० टक्के गोष्टींचा आपल्याला पत्ताही नाहीये, हे त्यांना कळलं. शेवटी ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉट्स अॅप’ प्रत्यक्ष भेटीची जागा कशी घेऊ शकणार? मोबाइल फोनमुळे आपण लांब असलेल्यांशी ‘कनेक्टेड’ असतो; पण शेजारी बसलेल्यापासून खूप लांब तर जात नाही ना, हे पाहण्याची हीच ती वेळ.


याविषयी आणखीही काही इंटरेस्टिंग माहिती आहे, ती Nomophobia बद्दल (No mobile phobia अशी या शब्दाची फोड आहे.)


Hydrophobia (पाण्याची भीती), Acrophobia (उंचीची भिती), Claustrophobia (बंद जागांची भीती) याप्रमाणेच Nomophobia ही म्हणे मोबाइल फोनपासून दूर जाण्याची भीती होय.


या Phobia बद्दल मानसशास्त्रीय माहिती अजून पडताळून पाहायची आहे; पण या Nomophobia ची जी लक्षणं सांगितली, ती आपल्याला स्वतःत आढळतात का, हे पाहायला हवं. आढळल्यास आपण मोबाइल फोनचं व्यसन थोडं कमी करायचं, बस्स!


मोबाईल खिशात नसतानाही ‘व्हायब्रेट’ झाल्याचा भास होणं.


रात्री झोपेतून जाग आल्यावर उशाशी ठेवलेला मोबाइल फोन चाचपून पाहणं.


मोबाइल हाताला न लागल्यास, पटकन उठून तो शोधणं.


मोबाइल आपल्या दृष्टीक्षेपापलिकडे जाऊ न देणं.


मोबाइलचा रिंगर आणि मेसेज अलर्ट वाजला नसला, तरीही दर काही मिनिटांनी मोबाइल पाहणं.


अगदी शास्त्रीय किंवा वैद्यकीय बाजूंनी खोलात शिरलं नाही, तरी ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे जाणून आपल्या मोबाइल फोनशी संबंधित सवयींमध्ये बदल घडवण्यात तोटा नक्कीच नाही.


मोबाइल फोन ही एक क्रांती आहे, ज्यामुळे आपली खूप मोठी सोय झाली आहे; पण या सोयीचं गरजेत आणि गरजेचं व्यसनात रुपांतर होऊ न देण्यातच हुशारी आहे. मग देऊया का थोडं लक्ष आपल्याही सवयींकडे? विनाअडथळा जेवायला काय हरकत आहे? मित्रांबरोबर कॉफी पिताना गप्पा आणि कॉफीचाच आस्वाद घेऊ या. त्यात मोबाइलची लुडबुड हवी कशाला? घरच्यांना भेटल्यावर मोबाइल थोडे बाजूला ठेऊ ना. एकमेकांच्या फोन्सविषयी माहिती घेण्यापेक्षा आयुष्याविषयी जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही!

उत्तर लिहिले · 20/2/2024
कर्म · 48425

Related Questions

राजाला कोणते व्यसन असू नये?
मोबाईल चे वेड लागले आहे काय करू?
शेती नाही पण कटलरी, स्टेशनरी शॉपी आहे. दिसायला देखील बरा आहे , 3 खोल्यांचे स्वतः चे घर आहे, व्यसनही करत नाही पण तरीही लग्न होईना काय करावे ?
माझे तोंड पूर्ण उघडत नाही आहे. मी गुटखा वगैरे काहीही खात नाही. तोंड जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न केला तर कानाखाली एकीकडून खूप ञास होत आहे. नेमकं काय आहे हे यावर उपाय?
जर एखाद्या मुलीला आई नाही. वडील सोबत नाहीत(व्यसनी)आहेत तर तिला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का?
सिगारेट ओढल्याने सर्दी जाते का?
मला गुटखा सोडायचा आहे कसा सोडायचा ?