सव्वा सहा म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटे ( 6:15 )
सव्वा, साडे, पावणे : आता आपण सव्वा, साडे, पावणे या शब्दांचा उपयोग वेळ सांगण्यासाठी केव्हा करायचा ते पाहू. तुम्हाला माहीतच आहे की, १ तास म्हणजे ६० मिनिटे. मग अर्धा तास म्हणजे किती मिनिटे असतील? तर ६० च्या अर्धी म्हणजे ३० मिनिटे. ३० मिनिटे म्हणजे अर्धा तास. पहा १ तास म्हणजे ६० मिनिटे, अर्धा तास म्हणजे ३० मिनिटे, पाव तास म्हणजे १५ मिनिटे, आणि पाऊण तास म्हणजे ४५ मिनिटे असतात. १२ ताशी घडयाळात १२ नंतर पुन्हा १ पासून वेळ मोजायला सुरुवात करतात. आता या घडयाळात पहा, यामध्ये तास काटा १ व २ च्या मध्ये आहे. आणि मिनिट काटा ३ वर आहे. म्हणजेच या घडयाळात १ वाजून १५ मि झाली आहेत. म्हणजेच एक तास आणि पाव तास झाला आहे. म्हणून आपण याठिकाणी सव्वा वाजले असेही म्हणतो. मुलांनो लक्षात ठेवा की जर मिनिट काटा ३ वर असेल तेव्हा त्याचे वाचन ‘’सव्वा’’ असे करतात. याचप्रमाणे सव्वातीन, सव्वा चार, सव्वा पाच, सव्वा सहा, सव्वा सात, सव्वा आठ, सव्वा नऊ, सव्वा दहा, सव्वा अकरा, सव्वा बारा असे वाचन करतात. घडयाळात तास काटा ३ व ४ च्या दरम्यान आहे व मिनिट काटा ३० वर आहे, म्हणजेच या घडयाळात ३ वाजून ३० मिनिटे झाली आहेत. यातील मिनिट काटा ६ वर आहे म्हणून या घडयाळाचे वाचन करताना साडे तीन वाजले असे म्हणतात.