आयोग
अॅॅॅॅॅॅरिस्टाॅटल यांना राज्यशास्त्राचे जनक का म्हणतात ?
1 उत्तर
1
answers
अॅॅॅॅॅॅरिस्टाॅटल यांना राज्यशास्त्राचे जनक का म्हणतात ?
0
Answer link
राज्यशास्त्राचा जनक - अॅरिस्टॉटल
अॅरिस्टॉटल हा राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ होता. अॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने कायद्याच्या राज्याचा विचार करताना, आजवर चालत आलेल्या रूढी-परंपरा-रितीरीवाज यांना प्राधान्य दिले. आज अॅरिस्टॉटल याला राज्यशास्त्राचा जनक मानले जाते.
ग्रीक संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक. इसवीसनाच्या पूर्वीपासून अनेक शतके ही संस्कृती स्वप्रभेने नांदत होती. ग्रीसमध्ये अनेक नगरराज्ये होती. एकही मध्यवर्ती बलवान असे सत्ताकेंद्र नव्हते. अर्थात त्याला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती. तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला डोंगररांगा असलेल्या या प्रदेशात अनेक लहान-मोठी बेटे होती. या बेटांवरील लोकांची जीवनपद्धती, धर्म संकल्पना, रितीरिवाज यात साम्य होते, परंतु ही नगरराज्ये राज्यव्यवस्था म्हणून वेगवेगळी होती. लोकशाही ही याच नगरराज्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. काही ठिकाणी राजेशाही असायची, परंतु त्यांच्या राजेशाहीमध्येदेखील राजाला प्रजा निवडून देत असे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण भूभाग. येथे अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ जन्माला आले. सगळ्या जगाला इथला इतिहास व संस्कृती याविषयी कुतूहल असते.
ग्रीसमधील स्टेगिरस या अशाच नगरराज्यात अॅरिस्टॉटलचा जन्म झाला. तो काळ होता इसवीसनपूर्व ३८४. त्याच्या वडिलांचे नाव निकोमार्क्स आणि आई फॅस्टिस. यांचे घराणे वैद्यकीचे. निकोमार्क्स हे जगज्जेता अलेक्झांडर म्हणून इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या राजाच्या आजोबांचे राजवैद्य होते. अॅरिस्टॉटलला आईवडिलांचे छत्र अल्पकाळ लाभले, परंतु घराणे श्रीमंत असल्याने त्याच्या शिक्षणात खंड पडला नाही. तत्कालीन प्रथेनुसार त्याने सुरुवातीला नीतिशास्त्र, काव्यशास्त्र, होमरचे काव्य यांचा अभ्यास केला, तसेच राजवैद्याच्या घराण्यातील असल्याने शरीरशास्त्र व वनस्पतिशास्त्र अभ्यासले. त्यात त्याला अत्यंत उत्तम गती होती. पुढे जाऊन हा मुलगा राज्यशास्त्राचा तत्त्वज्ञ होईल असे तेव्हा कोणालाही वाटले नसते. मात्र वयाच्या १७व्या वर्षी विद्येचे माहेरघर असलेल्या अथेन्समध्ये अॅरिस्टॉटलला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो याच्या विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला आणि त्याच्या नव्या जीवनाचा प्रारंभ झाला.
या गुरुशिष्यांच्या साखळीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. एकमेकांविषयी नितांत आदर ठेवून या तत्त्वज्ञांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपले विचार मांडले. गुरूचे सगळे विचार मान्य करण्याची आणि त्याच धर्तीवर तत्त्व मांडण्याची परंपरा त्यांनी बदलली.
अॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने कायद्याच्या राज्याचा विचार करताना, आजवर चालत आलेल्या रूढी-परंपरा-रितीरीवाज यांना प्राधान्य दिले. मानवाने आपली सामाजिक चौकट बांधत असताना जे अनुभवसिद्ध सामुदायिक ज्ञान जमा केले, ते प्लेटोने, सोफिस्ट विचारवंतांनी बऱ्याच अंशी नाकारले होते. मात्र अॅरिस्टॉटलने परंपरागत कायद्यांची पाठराखण केली.
त्याच्यावर सर्वाधिक टीका होते ती त्याने गुलामगिरीचे समर्थन केले म्हणून. पण अॅरिस्टॉटल हा सावकाश सुधारणा कराव्यात अशा मताचा होता. त्याच्या मते सर्व माणसे समान नसतात, त्यामुळे काही श्रम करण्यासाठी व काही बौद्धिक कार्य करण्यासाठी जन्मलेली असतात. त्यातही त्याने सर्वत्र असणारी गुलामगिरी, त्यावर अवलंबून असलेल्या सामाजिक व आर्थिक व्यवस्था यांचा सर्वंकष विचार केला होता. गुलामांना अचानक मुक्त केले, तर आहे ती व्यवस्थात्मक चौकट उद्ध्वस्त होईल, याची त्याला भीती होती. पुन्हा त्यांना राजकीय अधिकार नव्हते, त्यांचाही वेगळा विचार करावा लागला असता, म्हणून तो मालकांच्या दयाबुद्धीला आवाहन करतो. विशेष क्षमतांच्या गुलामांना मुक्त करावे असेही आग्रहाने म्हणतो. परंतु सरसकट क्रांतिकारक विचार त्याला अमान्य होता.
प्लेटोबद्दल अत्यंत आदर बाळगून, परंतु त्याच्या तत्त्वज्ञ राजाच्या कल्पनेला आणि संपत्तीच्या दृष्टीकोनाला त्याने विरोध केला आहे. त्याने १५८ नगरराज्यांच्या घटनांचे नीट अध्ययन केले आणि तौलनिक अभ्यासावरून तो म्हणतो की कायद्याचे राज्य हेच मानवाला सामाजिक न्याय, सुख व विकास यासाठी मोकळीक देऊ शकते. अलेक्झांडर दि ग्रेट याला आठ वर्षे त्याने शिक्षण दिले. अर्थात हा शिष्य बौद्धिक प्रांतात काम न करता राज्यविस्ताराच्या मागे लागला. मात्र त्याला शिकवताना, अॅरिस्टॉटलने अनेकपदरी अनुभव जमा केले.
मनुष्याकडे व्यक्तिगत संपत्ती असेल, तरच मनुष्याला जीवनात रस निर्माण होतो. मालकी हक्क असेल तर मनुष्य त्याचा विनियोग करताना सद्गुण जोपासून इतरांच्या प्रगतीला साहाय्यक होतो. कायद्यासमोर सगळे समान असतील व सर्व नागरिकांना समान अधिकार, स्वातंत्र्य असेल (गुलाम, युद्धकैदी हे त्या काळी नागरिकांमध्ये मोडत नसत) असे सुधारणावादी विचार त्याने मांडले. मात्र अधिकांश रूढीप्रिय, गुलामगिरीच्या प्रथेचे सर्मथन करणारा या कारणांमुळे त्याला आधुनिक युगात क्रांतिवाद्यांनी नाकारले. राज्यशास्त्राला तौलनिक अध्ययन करून स्वतंत्र शास्त्र म्हणून या शाखेला अधिष्ठान देणारा अॅरिस्टॉटल तत्त्वज्ञांमध्ये मात्र नेहमीच अग्रणी राहील.
इसवीसनपूर्व ३२२मध्ये अॅरिस्टॉटलचे निधन झाले. एकाच वेळी काव्य, राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा हा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ म्हणाला होता, "आपली आंतरिक गोष्ट सिद्ध करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ती आपल्या चरित्रातून दृग्गचर होणे होय." पश्चात्ताप हा दुर्गुणी व्यक्तीचा परिचायक गुण आहे, असेही म्हणाला होता. त्याला सुखी, समाधानी लोक, ज्यांच्या जीवनात फार खळबळ न माजवणारे कायद्याने चालणारे राज्य अपेक्षित होते. त्यासाठीच त्यानेही आपले विद्यापीठ स्थापन केले. त्यातून आपले विचार मांडले. आज अॅरिस्टॉटल राज्यशास्त्राचा जनक मानला जातो.