लेखनाचे महत्व
ज्ञान मिळविण्याच्या विविध पद्धतीद्वारे उदा. पाहणे, बोलणे, ऐकणे, वाचणे, इ. क्रियांमुळे मिळालेले ज्ञान आपण आपल्या भाषेत योजनाबद्ध रीतीने मांडत नाही, तोपर्यंत ते ज्ञान आत्मसात करता येत नाही. लेखन प्रक्रियेची सुरुवात माहितीच्या ग्रहणाने आकलनाने व्हावी लागते. आकलनासाठी अनेकदा वाचन, श्रवण, मनन व चिंतन आवश्यक असते. विशिष्ठ हेतूने आत्मविश्वासाने पुरेसे संदर्भ मनात तयार झाल्यावर व भाषिक तयारी असली कि लेखन सुलभ होते. माहिती दीर्घ काळ लक्षात राहावी म्हणून आपण ती लिहून ठेवतो. लिहिल्यामुळे विषयाची स्पष्टता कळते, विचारांची स्पष्टता व विश्वासाहर्ता वाढते.
दिसामाजी काहीतरी लिहावे |
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे |
समर्थ रामदासांच्या या उक्ती प्रमाणे प्रयत्न असले पाहिजेत चांगले लेख लिहिण्यासाठी प्रथम लेखनाचे महत्व जाणून घेतले पाहिजे. शुद्ध लेखनाची पुस्तके पाहून त्या अनुषंगाने चुकांची दुरुस्ती केली जावी. ऐकत असतांना लिहिण्याचा सराव केला पाहिजे. विषयाचा स्पष्ट हेतू ठेवून आराखडा तयार केला पाहिजे. त्यानंतर संदर्भ सामग्री जमविली पाहिजे. आकलनासाठी मार्गदर्शकांची मदत विनासंकोच घ्यायला विसरू नये. नेहमी लिहिल्याने नवनव्या युक्त्या सुचत जातात. वेळेचे बंधन असले तर लेखनास गती येते असे लेखन थोड्या कालावधी नंतर पुन्हा तपासले म्हणजे त्यात सुसूत्रता आणता येते.जास्तीत जास्त शब्द संग्रह असणे हे लेखकाची बँक असते. यासाठी विस्तुत चोखंदळ व चिकित्सक वाचनाची गरज असते. शब्द संग्रह वाढविण्यासाठी अन्य भाषकांशी संवाद ठेवावा. एखाद्या भाषेत लिहायचे असेल तर त्या भाषेचे क्याक्र्ण लेखकाने समजून घेतले पाहिजे. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन. अशुद्ध लेखन गैरसमज चुकीचा ग्रह होण्यास कारणीभूत ठरू शकते.
चांगले लेख लिहिण्यासाठी शब्दरचना योजना व स्थान यांचे फार महत्वाचे स्थान आहे. योग्य शब्दांचा वापर केलेला असेल तर लेखनावरील लेखकाचे प्रभुत्व स्पष्ट होते. सामान्य वाचक क्रमवार वाचन करीत असतो त्यामुळे प्रत्येक घटकात तार्किक संगती लेखकाला राखता आली पाहिजे. लेखनात मांडणीचे महत्व आधारबिंदू सारखे असते म्हणून लेखकाने आपल्या लेखातील मुद्यांची संख्या महत्व व क्रम ठरविताना अंधाराकडून उजेडाकडे, व्यापकतेकडून सूक्ष्मतेकडे, प्रश्नातून उत्तराकडे, संदिग्ध्तेक्डून स्पष्टतेकडे, अशी मुद्यांची दिशा असली पाहिजे.
लेखक आपल्या मनाचा भावनेचा अविष्कार मांडत असतो त्याचा परिणाम वाचकांवर होतो. परिणाम म्हणजे पटणे, भावणे, समजणे, अस्वस्थ होणे, विचारप्रवृत्त होणे तृप्त होणे, कृतीशील होणे अशा स्वरुपाची मानसिक स्थिती अनुभवणे होय. भाषेत एकच आशय व्यक्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. लेखकाने वापरलेले शब्द वापरलेली निवेदन पद्धती, वाक्यरचना, घेतलेले संदर्भ दृष्टांत, लेखन प्रकार मांडणी यातून त्याचे वेगळेपण व त्याच्या अभिव्यक्तीचे स्वरूप ठरते म्हणून लेखकाने परिणामांकडे योग्य लक्ष ठेवून लेखन केले पाहिजे. आपले लेखन गुणदोष चिकित्सेमुळे परिपूर्ण निर्दोष होते त्यामुळे लेखकाने आपणच आपल्या लेखनाची तपासणी करण्याची स्वताला सवय लावली पाहिजे म्हणूनच चांगले लेख लिहिण्यासाठी लेखकाने करील प्राथमिक कौशल्ले अवगत केली पाहिजेत हि कौशल्ये सततच्या प्रयत्नाने अवगत करता येतील.