तत्वज्ञान
ज्ञानेश्वराचे तत्वज्ञान हे कोणत्या नावाने ओळखले जाते?
2 उत्तरे
2
answers
ज्ञानेश्वराचे तत्वज्ञान हे कोणत्या नावाने ओळखले जाते?
3
Answer link
ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान ⇨ चिद्विलासवाद ह्या नावाने ओळखले जाते आणि विश्वातील नाना पदार्थांच्या रूपाने एकच चैतन्य विनटलेले आहे, हा त्या तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती विचार आहे. हे तत्त्वज्ञान अद्वैती आहे तथापि शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाहून फारच भिन्न किंबहुना विरोधी आहे, असे मत मुख्यतः पंडित बाळाचार्य खुपेरकर ह्यांनी प्रतिपादिले आहे. ज्ञानेश्वरांनी जगास शंकरार्चांप्रमाणे मिथ्या मानले नाही. जग ही सद्वस्तूची प्रभा, आत्म्याचे स्फुरण, चैतन्याचा विलास आहे. शंकराचार्यांचे अद्वैत हे द्वितीय पदार्थांचा निरास करते ज्ञानेश्वरांचे अद्वैत हे द्वितीय पदार्थाच्या सामरस्याने निर्माण होते, असे त्यांचे म्हणणे आहे. हा फरक पडतो, कारण ज्ञानेश्वर हे नाथपंथीय होते आणि नाथपंथाचे तत्त्वज्ञान काश्मीर शैव संप्रदायाशी जुळणारे आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या मते, ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद हा शंकराचार्यांपेक्षा अधिक प्रगत झालेली दृष्टी आहे. मोक्षपुरुषार्थाच्या साधनेत संन्यासाला अग्रस्थान देण्याचा आग्रह ज्ञानेश्वरांनी बाजूला ठेवला. अंतिम दृष्टिकोणातून अविद्याखंडन वा अज्ञानखंडन शंकराचार्यांपासूनअनेक अद्वैत वेदान्त्यांनी केले आहे. परंतु अज्ञानखंडनाच्या आधारावरच ज्ञानेश्वरांचे परतत्त्वदर्शन शंकराचार्यांच्या व इतर अद्वैत वेदान्तांच्या पुढे गेले आहे. ब्रह्म परमार्थ सत्य होय, ह्या मूळ सिद्धान्ताला बाधा न येता किंवा मर्यादा न पडता, ज्ञानेश्वर विचारक्षेत्रातला नवीन विजय मिळवीत आहेत. चिद्विलासवाद हाच तो विजय होय.
ज्ञानेश्वरीच्या भाषेचा विचार केला, तर गीतेसारख्या तात्त्विक ग्रंथावरील ही काव्यरूप मराठी टीका आहे पण येथे काव्य आणि तत्त्वज्ञान यांचे विलक्षण ऐक्य प्रत्ययास येते. मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठीचे स्पष्ट भान ठेवले आहे. मराठीबद्दलचा अभिमान ठसठशीतपणे व्यक्त केला आहे. मराठीच्या आविष्कारक्षमतेविषयी त्यांना विश्वास होता. संस्कृतातील अनेक संदर्भ ज्ञानेश्वरीत आले असले, तरी भाषेच्या बाबतीतला तिचा खणखणीत देशीपणा टिकून राहिलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी नुकतीच वाङ्मयत्व पावली होती. तथापि ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेचे सुंदर रूप पाहिले, की भाषेचे वैभव काय असते, ह्याचा आनंददायक प्रत्यय येतो. ज्ञानेश्वरांनी अनेकदा श्रोत्यांपुढे आपली नम्रता प्रकट केली आहे तथापित्या नम्रतेमागे त्यांच्या कवित्वशक्तीचा भक्कम अभिमानही आहे.
ज्ञानेश्वरीचा इंग्रजी अनुवाद व्ही. जी. प्रधान ह्यांनी दोन भागांतकेला आहे. (ज्ञानेश्वरी : ए साँग सर्मन ऑन द भगवद्गीता, भाग १ संपा. एच्. एम्. लॅबर्ट, १९६९, पहिले भारतीय पुनर्मुद्रण १९७८ भाग२, १९६९).
ज्ञानेश्वरीतील पसायदान ही एक अत्युत्कट प्रार्थना आहे. विश्वात्मक देवाला म्हणजेच श्रीविश्वेश्वरावाला ज्ञानेश्वरांनी पसायदान देण्याची विनवणी केलेली आहे. पसायदान म्हणजे कृपाप्रसादाचे दान. हे दान ज्याच्याकडून अपेक्षित आहे तो विश्वात्मक देव वा श्रीविश्वेश्वराव म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरू प्रत्यक्ष निवृत्तिनाथ होत.
ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान असून ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ह्या पसायदानात विश्वात्मक देव, श्रीविश्वेश्वराव ह्या शब्दांनी ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुरू निवृत्तिनाथ ह्यांचा निर्देश केला आहे, असे दिसते. ह्या पसायदानात ज्ञानेश्वरांनी व्यक्तिशः स्वतःसाठी म्हणून काहीच मागितलेले नाही. त्यांची प्रार्थना प्राणिजातांसाठी आहे. जे खलप्रवृत्तीचे असतील त्यांना सत्कर्मांत रस निर्माण व्हावा सर्वांमध्ये जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी, जो जे वांछिल ते त्यालामिळावे जे चंद्रासारखे आहेत, पण ज्यांच्यावर चंद्रावर असतो तसा कलंक नाही जे सूर्य आहेत, पण ज्यांचा ताप जगाला होत नाही, त्यांच्याशीसर्वांचे नाते जडावे, अशी विनवणी त्यांनी केली आहे. विश्वकल्याणासाठी केलेली ही प्रार्थना विश्वेश्वरावाने मान्य केल्याचे म्हटल्यामुळे ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ असे त्यांनी म्हटले आहे.
ज्ञानेश्वरांचे हे पसायदान म्हणजे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे.