ग्रंथ आणि ग्रंथालय
परमानंद यांनी कोणता काव्य ग्रंथ लिहिला?
2 उत्तरे
2
answers
परमानंद यांनी कोणता काव्य ग्रंथ लिहिला?
1
Answer link
शिवरायांचे समकालीन कविंद्र परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून लिहिलेले हे संस्कृत काव्य म्हणजे जणू महाभारताच आहे. इतके ते विस्तृत आणि मर्मबंधयुक्त आहे. त्यात एकूण ३२ अध्याय आहेत. ... शिवचरित्राची संस्कृत साधने आणि शकावल्या.
काय आहे शिवभारत?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अस्सल माहिती देणारा कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला जगप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे 'अणुपुराण उर्फ शिवभारत.'
हा ग्रंथ आपण शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहिला असे कवींद्र परमानंद त्यांच्या शिवभारतात सांगतात.
पण हा ग्रंथ नेमका सापडला तरी कसा? आणि ह्या ग्रंथाला शोधलं तरी कोणी?
ह्याची अत्यंत मनोरंजक माहिती आहे.
चला तर मग शोध घेऊया.
हा ग्रंथ शोधणाऱ्या व्यक्तीच्या ऋणातून हा महाराष्ट्र कधीही उतराई होऊच शकत नाही.
ह्या व्यक्तीचे नाव आहे प्रसिद्ध इतिहास संशोधक सदाशिव महादेव दिवेकर.
प्रथम आपण ह्या शिवभारताविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला ह्या विषयाचे महत्व लक्षात येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अस्सल माहिती देणारी फारच थोडी ऐतिहासिक साधने आज उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात विश्वसनीय आणि अस्सल माहिती देणारे साधन म्हणजे कवींद्र परमानंद लिखित ' अणुपुराण उर्फ शिवभारत.'
शिवाजी महाराज प्रत्यक्ष राज्य करत असतानाच हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे.
पुराव्यांवरून असे दिसते कि कवींद्र परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर वावरताना आढळतात. प्रतापगडच्या युद्धात कवींद्र परमानंद हे स्वतः प्रतापगड किल्यावर उपस्थित होते. शिवाय आग्रा भेटीच्या वेळीही ते शिवाजी महाराजांच्या बरोबर गेल्याचे दाखले आहेत.
कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारताच्या पाच हस्तलिखित प्रति उपलब्ध असून त्यातील पहिल्या चार हस्तलिखित प्रति ह्या तंजावरच्या 'सरस्वती महल' ह्या
लायब्ररीत आहेत. ह्या ग्रंथाची पाचवी हस्तलिखित प्रत हि कोल्हापूरच्या राजोपाध्ये घराण्याच्या कागदपत्रांत सापडली. आता हि पाचवी हस्तलिखित प्रत पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे.
हे पद्यमय शिवकाव्य आहे. ह्याचे ३१ पूर्ण अध्याय असून बत्तिसाव्या अध्यायाचे पहिले नऊ श्लोक उपलब्ध आहेत. ह्या शिवभारताचे एकूण २२६२ श्लोक आज आपल्याकडे
उपलब्ध आहेत.
शहाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांचा शृंगारपुरात प्रवेश येथपर्यंतचा भाग यात आलेला आहे. म्हणजे इ.स. १६६१ पर्यंतचे शिवचरित्र यात आलेले आहे.
इ.स. १६६१ ला शिवाजी महाराजांचे वय ३१ होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वय वर्षे ३१ पर्यंतचाच इतिहास या शिवभारतात आलेला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १६३०चा आणि मृत्यू १६८० चा आहे. म्हणजे इ.स. १६६१ ते १६८० या १९ वर्षांचा
शिवाजी महाराजांचा इतिहास या शिवभारतात आलेला नाही. यात तानाजी मालुसरेंचा उल्लेख आहे. दादोजी कोंडदेवाचा साधा नामोल्लेखही ह्या शिवभारतात नाही.
इ.स. १६६१ पर्यंतचाच भाग यात आलेला आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक व शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे त्यात वर्णन नाही. हा ग्रंथ अपूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे.
ह्याच्या अजूनही हस्तलिखित प्रति असतील पण त्या कोठे, कोणाजवळ आहेत हे समजण्यास मार्ग नाही.
आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळू आणि तो विषय म्हणजे सदाशिव महादेव दिवेकर यांनी हा शिवभारत ग्रंथ शोधला कसा.
मुळातच बालपणापासून सदाशिव महादेव दिवेकर यांना इतिहासाची फार आवड होती.
दिवेकरांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुल आणि उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन कॉलेज येथे पूर्ण केले.
साल होते १९२७.
विद्यार्थी वयातच दिवेकर यांना त्या वेळेसच्या प्रथापित लेखकांनी शिवाजी महाराजांच्या विषयी केलेला पक्षपात स्पष्ट दिसू लागला. मुसलमानी बादशहांनी पर-धर्मभ्रष्ट करून आणि अगणित लोकांच्या हत्या करूनही त्यांची मात्र स्तुती, आणि धर्म रक्षिण्यासाठी प्राण हातावर घेतलेल्या माझ्या शिवाजी राजाची निंदा नालस्ती ह्यातील पक्षपातीपणाची दिवेकर यांना प्रचंड चीड आली. त्यामुळे दिवेकर यांनी शिवाजी महाराज ह्या विषयाचा शोध घेण्यास सुरवात केली.
एका हलवायाच्या दुकानात रद्दीत गेलेल्या शिवाजी महाराजांच्या काव्येइतिहास संग्रहाच्या सर्व पुस्तकांचे खंड विद्यार्थी दशेतील दिवेकर यांनी दहा बारा रुपयांत मोठ्या कष्टाने विकत घेतले आणि त्याचा अभ्यास सुरु केला.
( लक्षात घ्या साल १९२७ साली ह्याच दहा बारा रुपयांची किंमत फार मोठी होती.)
बखरी, ऐतिहासिक पत्रे, याद्या वगैरेंचा त्यांनी अत्यंत मन लावून अभ्यास सुरु केला. अभ्यास करत असता 'माझ्या शिवाजी राजाचा इतिहास पक्षपाती बुद्धीने कसा लिहिला गेला' याचे कोडे सुटायला सुरवात झाली.
रोजचे व्यवहार सांभाळून दिवेकर यांनी आता ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करावयास सुरवात केली. त्यासाठी दिवेकर यांना परगावी, पर मुलखात प्रचंड प्रवास करावा लागला.
स्वतःजवळील असतील तेव्हढे पैसे खर्च करून ऐतिहासिक साधन सामुग्री संपादित करण्याची मोठी खटपट दिवेकर यांनी केली.
पहिल्या चार वर्षांत दिवेकर यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव ग्रंथावर लिहिलेली बरीच मोठी विस्तृत टीका व इतर ऐतिहासिक पत्रे आणि काही ग्रन्थ सापडले.
पुढे आजून शोध घेत असता शिवाजी महाराजांच्या विषयी फार मोठे ऐतिहासिक रेकॉर्ड तंजावर येथील सरस्वती पॅलेस ह्या लायब्ररीत असू शकते हे कळाल्यावर दिवेकर हे तंजावर येथील सरस्वती पॅलेस लायब्ररी येथे गेले.
तेथे गेल्यावर तंजावरच्या सरस्वती पॅलेस लायब्ररीची दयनीय अवस्था पाहून दिवेकर यांना खूप दुःख झाले. शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शोधासाठी रोज चार पाच हेलपाटे ते ह्या लायब्ररीत मारत असत. परंतु लायब्ररीतील कोणाही लहान-मोठ्या अधिकाऱ्यांकडून त्यांना निश्चित असे उत्तर मिळत नसे.
तरीही चिकाटी धरून आणि वीस पंचवीस दिवस त्या लायब्ररीत घालवून दिवेकर यांनी त्या लायब्ररीच्या व्यवस्थपकास प्रसन्न करून घेतला व तिथून जोरदार संशोधनास सुरवात झाली.
ह्या प्रचंड अश्या ग्रंथालयाचे मंथन करून संशोधन करावयाचे म्हणजे तुम्हाला कानडी, तामिळ, तेलगू, संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, इंग्रजी वगैरे भाषांचे पक्के
ज्ञान असले पाहिजे ह्याचा साक्षत्कार दिवेकर यांना झाला.
आश्चर्य म्हणजे ग्रंथालयाने लायब्ररीत कुठल्याही पुस्तकांचे, हस्तलिखित ग्रंथांचे, ताम्रपटांचे, पोथ्यांचे, ऐतिहासिक पत्रांची कुठलीही सूची, वर्गवारी, कॅटलॉग
केलेलेच नव्हते.
या ग्रंथालयात सुमारे पंचवीस हजार ताडपत्रांवर आणि कागदांवर लिहिलेले निरनिराळ्या भाषेंतील हस्तलिखित ग्रंथ दिवेकर यांना पहावयास मिळाले. हे सर्व अभ्यासताना एका मोठ्या अंधाऱ्या खोलीत हरवल्यासारखी स्थिती दिवेकर ह्यांची झाली. तरीही दिवेकर यांनी अत्यंत चिकाटीने तपशीलवार माहिती गोळा करण्याचा आपला प्रयत्न चालूच ठेवला.
शहाजी महाराजांनी विजापूर आणि दक्षिण भारतात मोठा काळ व्यतीत केलेला होता. तसेच शिवाजी महाराजांनीही दक्षिण भारतात मोठं मोठ्या मोहिमा काढलेल्या असल्याने ह्या विषयी तामिळ आणि तेलगू भाषेतील उपलब्ध हस्तलिखित साहित्य अभ्यासायला दिवेकर यांनी आता सुरवात केली.
दोन तीन दिवस बरेच ग्रंथ धुंडाळल्यावर तामिळ भाषेत’ शिवभारत’ नावाचा ग्रंथ अंदाजे दोन अडीच बोटे रुंदीच्या व सुमारे दोन वीत लांबीच्या ताडपत्रांवर दोन्ही बाजूस लिहिलेला ग्रंथ त्यांना सापडला.
या ग्रंथातील काही पानांचा सारांश तेथील ग्रंथालयाच्या व्यवस्थापकांकडून त्यांनी समजावून घेतल्यावर ' हा ग्रंथ शिवाजी महाराजांची अत्यंत महत्वाची माहिती देणारा असल्यामुळे ह्या ग्रंथाचे अत्यंत बारकाईने भाषांतर करून संशोधन झाले पाहिजे ह्या निष्कर्षावर दिवेकर येऊन पोहोचले.
हा ग्रंथ सापडल्यावर दिवेकर यांना प्रचंड आनंद झाला. पहिल्या चार हस्तलिखित प्रतींचा आता शोध लागला होता.
दिवेकर यांनी तातडीने ह्या तामिळ भाषेतील शिवभारताची नक्कल करून घ्यायला सुरवात केली. (त्या वेळी आजच्या सारखे झेरॉक्स मशीन नव्हते. त्यामुळे असलेल्या ग्रंथाची पाहून जशीच्या तशी लिखित कॉपी बनवावी लागत असे. )
पुढे सहा महिने थांबून आणि मागे लागून दिवेकर यांनी ग्रंथालयाकडून तामिळ लिपीत लिहिलेली शिववभारताची नक्कल मिळविली.
पण खरी अडचण तर पुढे होती.
ह्याचे भाषांतर करावे कसे?
दोन महिन्यांच्या खटपटीनंतर दिवेकर यांना तिथंच तंजावरला एक सद्गृहस्थ सापडले. हे सद्गृहस्थ शहाजी महाराजांचे वेळी जी महाराष्ट्रातून घराणी दक्षिणेत गेलेली
होती त्यातीलच एका घराण्यांपैकी होते. त्यांचे नाव हणमंतराव डोळे.
हे डोळे जि. आय. पी रेल्वेत (Great Indian Peninsula Railway) मोठे अधिकारी होते. दिवेकर यांनी ह्या डोळे यांच्या मदतीने ह्या ग्रंथाचे भाषांतर करण्यास सुरवात केली. पण डोळे हे अत्यंत व्यस्त असल्यामुळे त्यांना ह्या भाषांतराच्या कार्यास पुरेसा वेळ देता येईना. त्यामळे हे भाषांतर काही तंजावरास राहून शेवटास गेले नाही.
शेवटी महाराष्ट्रात परत येऊन दिवेकर ह्यांनी मुंबईत मिलिट्रीतील अकौन्टन्ट ह्या पदावर असलेल्या त्रिंबक रामकृष्ण सिधये यांची ह्या कामी मदत घेतली.
ह्या सिधये यांचे मिलिट्रीत काही तामिळ मित्र होते. त्यांच्या मदतीने दिवेकर ह्यांनी ह्या ग्रंथाचे राहिलेलं इंग्रजी भाषांतर पूर्ण करून घेतले.
शेवटी बराच कालावधी लोटल्यावर दिवेकर ह्यांना अत्यंत कष्टाने आणि चिकाटीने ह्या चार हस्तलिखित प्रतींचे नीट भाषांतर मिळाले.
ताबडतोब दिवेकर यांनी ह्या भाषांतराचे एक संक्षिप्त टाचण पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळापुढे वाचले.
ह्या वाचनानंतर दिवाकर जेंव्हा ह्या भाषांतराचा अभ्यास करू लागले तेंव्हा त्यांना आजून एक मोठा धक्का बसला आणि तो धक्का म्हणजे ‘हा तामिळ ग्रंथ एखाद्या संस्कृत अगर महाराष्ट्रीय ग्रंथकाराने लिहिलेल्या एखाद्या काव्य ग्रंथाचे भाषांतर असावे’ अशी त्यांच्या मनाची खात्री झाली.
शिवभारत हे नाव ह्या ग्रंथास देण्याची कल्पना महाभारतावरून सुचली असावी असे वाटल्यावरून हा 'काव्य ग्रंथ' असला पाहिजे असे दिवाकर यांना वाटले. ह्या ग्रंथाचे भाषांतर वाचत असता दिवेकर यांना ह्या ग्रंथकाराचे नाव गोविंदभट्टाचा मुलगा परमानंद असे ठीक ठिकाणी लिहिलेले आढळले.
या सर्व गोष्टींवरून हा मूळ ग्रंथ तामिळ भाषेत रचलेला नसून ते भाषांतर आहे, त्याचा कर्ता परमानंद हा महाराष्ट्रीय आहे व तो ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला
असावा अशी अनुमाने निश्चित झाली. त्यामुळे दिवेकर यांनी आता त्या मूळ संस्कृत ग्रंथाच्या दिशेने संशोधनाचा प्रयत्न चालविला.
या प्रमाणे शिवभारत हा ग्रंथ संस्कृत आहे अशी खात्री पटल्यावर दिवेकर यांनी प्रथम तंजावर येथील सरस्वती महालातील ग्रंथसंग्रहाच्या व्यवस्थापकांस पत्राद्वारे “तुमच्या लायब्ररीत ह्या तामिळ शिवभारताविषयी मूळ कवींद्र परमानंद लिखित संस्कृत भाषेत लिहिलेला एखादा ग्रंथ आहे का?” अशी विचारणा केली. पण
ग्रंथालयाच्या व्यवस्थापकांकडून “आमच्याकडे असा कुठलाही कवींद्र परमानंद लिखित संस्कृत ग्रंथ नाही” असे उत्तर मिळाले.
खूप शोध घेऊनही दिवेकर ह्यांना ह्या परमानंदांच्या खऱ्या संस्कृत शिवभारताचा काही शोध लागेना. तंजावरला ज्या चार हस्तलिखितांच्या प्रती सापडल्या त्या तामिळ भाषांतरित होत्या.
दिवेकर आता अत्यंत चिकाटीने पुढील प्रतींच्या शोधासाठी दिवसरात्र एक करू लागले.
शोध घेत असता आता दिवेकर यांना आजून एक महत्वाचा शोध लागला तो म्हणजे 'इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी, डचांनी हिंदुस्तानातील बरेचशे ग्रंथ, हस्तलिखिते त्यांच्या देशात नेलेली आहेत.'
जर आपण युरोप देशांत शोध घेतला तर ह्या संदर्भात काहीतरी सापडेल अश्या आशेने आता दिवेकर यूरोपांतील लायब्ररींना पत्र पाठवून ह्या कवींद्र परमानंद लिखित शिवभारताच्या संस्कृत हस्तलिखित प्रतींचा शोध घेऊ लागले.
हि पत्र दिवेकर यांनी, जर्मनी, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल या देशांतील वेगवेगळ्या असंख्य ग्रंथालयांना लिहिली.
खुप सारा पत्रव्यवहार केल्यावर जर्मनीतील 'जर्मन ओरिएंटल सोसायटी, लिपझीग' (The German Oriental Society, Leipzig) या संस्थेने एक पत्र दिवेकर यांना पाठविले.
हे पत्र दिवेकर यांच्यासाठी साक्षात ' मरणासन्न लक्ष्मणाला जिवंत करणाऱ्या संजीवनी' सारखेच होते.
जर्मनीतल्या ह्या संग्रहालयाने दिवेकर यांना पत्राद्वारे कळविले कि, 'Catalogues Catalogorum by Theodor Aufrecht’ या नावाने सर्व युरोपीय देशांनी
उपलब्ध असलेल्या ह्या कवींद्र परमानंद लिखित शिवभारताच्या संस्कृत हस्तलिखितांची मोठी सूची प्रसिद्ध केलेली आहे. या हस्तलिखित सूचीचे काही भाग हे
पुण्याच्या आनंदाश्रम संग्रहालयात आहेत. तुम्ही तेथे ह्याचा पुढील शोध घ्यावा.’
पत्रात त्यांनी पुढे असेही लिहिले कि ‘बर्नेल (A.C.Burnell) ह्या इंग्रज लेखकाने इसवीसन १८७९ मध्ये लंडन येथे प्रसिद्ध केलेल्या तंजावरच्या सरस्वती महल लायब्ररीतील ह्या संस्कृत हस्तलिखितांच्या सूचीवरूनच आमच्या जर्मनीच्या सूचिकाराने आपल्या जर्मन सूचित ह्या शिवभारत ग्रंथाचे नाव समाविष्ट केले होते.’
जर्मनीवरून आलेल्या पत्राच्या आधारे शोध घेत असताना दिवेकर यांना पुण्याच्या आनंदाश्रम संग्रहालयात सापडलेल्या संस्कृत हस्तलिखित प्रतीत कवींद्र
परमानंदांचे आजून उल्लेख सापडले.
दिवेकर यांनी आता जर्मनीवरून आलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या बर्नेल याची सूची तपासायला सुरवात केली. सूची पाहता या शिवभारत ग्रंथाचे नाव मिळाले व त्याच्या
हस्तलिखितांचा क्रमांक B. No. 1409 असा दिलेला आढळला.
दिवेकर यांनी बर्नेलच्या सूचित सापडलेला B. No. 1409 हा नंबर तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयास पाठविला आणि चौकशी करण्याबद्दल लिहिले.
शोध घेतला असता सदर क्रमांकाचा संस्कृत हस्तलिखित ग्रंथ संग्रहालयास सापडला. त्यांनी दिवेकर यांना पत्र पाठवून संस्कृत हस्तलिखित सापडल्याचे कळविले.
दिवेकर यांनी तंजावर येथील परिचयातील एका व्यक्तीस सांगून ह्या सापडलेल्या कवींद्र परमानंदाचे संस्कृतमधून लिहिलेले अस्सल शिवभारत हस्तलिखिताची शुद्ध
नक्कल मागवून घेतली.
हि नक्कल येण्यास सुमारे आठ नऊ महिने लागले.
हि नक्कल हाती येताच दिवेकर यांनी त्या तामिळ हस्तलिखितांच्या चार प्रतींशी सापडलेल्या कवींद्र परमानंदाचे संस्कृतमधून लिहिलेल्या अस्सल संस्कृत
हस्तलिखिताची प्रत तपासून पहिली.
तामिळ भाषांतरात दिलेली माहिती शिवाजी महाराजांनी शृंगारपूर हस्तगत केले येथवरच आहे. व बर्नलच्या सूचीच्या आधारे सापडलेल्या संस्कृत कवींद्र परमानंदाच्या हस्तलिखितातही दिलेल्या वर्णनाच्या क्रमाशी तपासून पाहता दोन्ही अगदी एकच आहेत
असे आढळून आले.
तेंव्हा तामिळ भाषांतरकाराने भाषांतराकरिता घेतलेली मूळ संस्कृत प्रत ती हीच होती या शोधापर्यंत दिवेकर येऊन थांबले.
ह्या तामिळ भाषांतरकाराने ह्या शिवभारताचे भाषांतर ज्या कवींद्र परमानंदाच्या संस्कृत हस्तलिखितांवरून केले होते ते संस्कृत हस्तलिखित सरस्वती महाल लायब्ररीतच होते.पण लायब्ररीच्या व्यवस्थापकांस ह्याची पुसटशीही कल्पना नव्हती.
ह्या कवींद्र परमानंदाच्या संस्कृत ग्रंथाची हि बहुमूल्य माहिती दिवेकर यांनी जर्मनीहून आलेल्या पत्राच्या आधारे सापडलेल्या बर्नेलच्या सुचिंचा अभ्यास करून
त्यातून शोधून ग्रंथालयास कळविली. त्यामुळे कवींद्र परमानंदाचे संस्कृतमधून लिहिलेले अस्सल शिवभारत सापडले. हे शोधाचे मोठे कार्य दिवेकर ह्यांनी केले.
अर्थात कवींद्र परमानंदाने हे शिवभारत अपूर्ण का ठेवले? त्यांचा काही घात झाला का?
कि त्यांच्यावर काही संकट आले म्हणून त्यांनी पुढील शिवभारत लिहिले नाही?
की तंजावरच्या ग्रंथालयात असणाऱ्या कवींद्र परमानंदाचे संस्कृतमधून लिहिलेले अस्सल शिवभारत हस्तलिखिताची पुढील पानेच गहाळ झाली असावीत?
ह्या श्यक्यतांचा शोध घ्यावा लागेल.
दिवेकरांनी शोधलेल्या ह्या कवींद्र परमानंदांच्या संस्कृत शिवभारतामुळेच आज शिवाजी महाराजांचा अस्सल इतिहास आपल्यासमोर आहे. दिवेकरांचे हे उपकार हा
महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
0
Answer link
परमानंद यांनी 'शिवभारत' हा काव्य ग्रंथ लिहिला.
शिवभारत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महाकाव्य आहे.