मुले
मुलाखत
आपण जेव्हा आपल्या लहान मुलांना गोड बोलून फसवतो आणि आपल्याला फसवले आहे हे जेव्हा त्यांना समजते, तेव्हा ती लहान मुले काय विचार करत असतील?
1 उत्तर
1
answers
आपण जेव्हा आपल्या लहान मुलांना गोड बोलून फसवतो आणि आपल्याला फसवले आहे हे जेव्हा त्यांना समजते, तेव्हा ती लहान मुले काय विचार करत असतील?
2
Answer link
किती सोपं असतं ना लहान मुलांना फसवणं, खूप निरागस मन असतं मुलांचं, लगेच विश्वास ठेवतात. काय वाटतं असेल त्या इवल्याश्या जिवाला जेव्हा तुम्ही सांगता, 'ते पहा तिथे गंम्मत आहे आणि पाहिलं तर काहीच नसतं'. आपण फक्त मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी म्हणतो आणि हळुच त्यांच्या हातातली एखादी वस्तू काढून घेतो. यात पालकांचा हेतू चांगलाच असतो पण जर तुम्ही लहान मुलांना सारखं फसवत असाल तर त्याचे परिणाम चांगले नसतात.
चला लहान मुलांच्या भावविश्वात एक फेरफटका मारुन येऊ या-चेल्सी हेज आणि लेस्ली कारव्हर यांनी लहान मुलांवर एक प्रयोग केला. या प्रयोगात ४६ लहान मुलांनी सहभाग घेतला होता. प्रयोगाचे दोन भाग होते.
भाग १- या भागात लहान मुलांना सांगण्यात आले की बाजूच्या खोलीत एक भांडं भरून चाॅकलेट आहे. तुम्हाला त्या खोलीत जायचं आहे? लहान मुलं लगेच खोलीत गेली. पण खोलीत चाॅकलेट नव्हतीच, लहान मुलांचा हिरमोड झाला. मग त्यांना सांगितले की, त्यांना खोटं सांगण्यात आलं होतं, चाॅकलेट तर नाही आहे पण त्या ऐवजी एक छान खेळ ते खेळू शकतात. मुलं खुश होतात आणि खेळ खेळायला तयार होतात.
भाग २- या भागात लहान मुलांशी खेळ खेळत असलेले काका अचानक उठतात आणि म्हणतात की मला एक फोन करायचा आहे. मी जाऊन येतो, तुमच्या मागे खेळणं ठेवलं आहे पण ते पाहू नका. मी परत आल्यावर खेळू. खोलीत एकटे असताना मुलांच्या हालचाली रेकॉर्ड करण्यात आल्या. काका परत आल्यावर विचारतात की मी खोलीत नसताना तुम्ही खेळण्याकडे पहिले का?
प्रयोगाच्या शेवटी असं लक्षात आलं की ज्या मुलांना फसवून (चाॅकलेट आहे असं सांगून) खोलीत आणलं होतं ती मुलं खोलीत एकटी असताना खेळण्याकडे पहतात पण ही गोष्ट कबूल करत नाहीत. ते खोटं सांगतात की त्यांनी खेळणं पाहीले नाही. या उलट ज्या मुलांची फसवणूक होत नाही ती मुलं कबूल करतात, खरं खरं सांगतात की त्यांनी खेळणं पाहीले होते.
आता मुळ प्रश्नांनाकडे वळू या—
आपण जेव्हा आपल्या लहान मुलांना गोड बोलून फसवतो आणि आपल्याला फसवले आहे हे जेव्हा त्यांना समजते, तेव्हा ती लहान मुले काय विचार करत असतील?
पहीला विचार— वाईट वाटतं, हिरमोड होतो ()
दुसरा विचार— खोटं बोलणं वाईट नसतं, सगळी मोठी माणसे खोटं बोलतात (
तिसरा विचार— सांगितलेली गोष्ट खोटी असू शकते, पडताळणी करायला हवी (
चौथा विचार— मोठी माणसे विश्वास ठेवण्यासारखी नाहीत. सारखी खोटं बोलतात (
पाचवा विचार— मोठी माणसं काहीतरी प्रलोभन दाखवत आहेत म्हणजे नक्की खोटं बोलत असतील. त्यांचं एकू नये आपल्या हट्टवर कायम रहा. प्रसंगी आरडाओरडा करा, रडपड करा पण हट्ट सोडू नका.(
तुमच्या घरी एखादं लहान मुलं असेल आणि त्याच्या हातात खेळणं असेल तर ते त्याला सहज मागा, पहिल्यांदा मुलं खेळणं देऊन देतात कारण त्यांना वाटतं की मोठी माणसं आपलं खेळणं परत करतील.
आता ते खेळणं काऊ चिऊ नी नेलं असं सांगून लपवून ठेवा. मुलं जरा रडतील पण थोड्या वेळाने दुसरं काहीतरी करण्यात मग्न होऊन जातील. काही दिवसांनी परत त्या मुलाला त्याच्या हातातलं खेळणं मागा, ते मुलं खेळणं देणार नाही, घट्ट पकडून ठेवेल. काही मुलं तर तुम्ही दिसले की आपली खेळणी लपवतील, काही स्वतः लपतील जर परत परत फसवणूक झाली असेल तर नवीन मोठी माणसं घरी आली की मुलं रडू लागतात. दुर पळून जातात, संवाद साधत नाहीत.
माझी मैत्रीण तीच्या लहान मुलाला पाळणाघरात सोडून ऑफिसमध्ये गेली. जाताना सांगितलं की पिलू आई पटकन काम करून येते. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी मुलाला पाळणाघरातून घरी आणलं. दुसऱ्या दिवशी मुलगा पाळणाघराच्या दाराशी रडू लागला, परत सांगितलं की तू खेळून घे, आई लवकर येईल. तिसऱ्या दिवशी तर मुलगा घराच्या बाहेर निघताच रडत होता आणि एक महिन्यानंतर अशी परिस्थिती आली की आईचे ऑफिसचे कपडे पहूनच मुलगा रडायला सुरुवात करतो. पहिल्यांदा पालकांशिवाय रहाताना भिती आणि विरहामुळे लहान मुलं रडतात हे खरं आहे. पण मुद्दा फसवणूकाचा सुध्दा असतो. पाळणाघरी, शाळेत, बाहेर गावी जाताना, 'आई/बाबा पटकन येतील' असं गोड बोलणं किती सोपं आहे पण ती फसवणूक असते. यापेक्षा मुलांना छान सामजवून सांगा की किती उशीर होणार आहे, ऑफिसमध्ये काम किती आहे, शाळेत (पाळणाघरात) त्यांना नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील, खेळ खेळता येतील. त्यांची एकटं राहण्याची मानसिक तयारी करून घ्या.
आपण कायम गृहीत धरतो की लहान मुलांना काही कळत नाही, खरं कारण सांगितलं तर ते ऐकणार नाहीत आणि म्हणूनच त्यांना गोड बोलून फसवण्याचा मार्ग आपण निवडतो. खरंतर लहान मुलं खूप समजूतदार असतात, त्यांना सगळं कळतं, ते निरंतर निरिक्षण करत असतात. मोठ्या माणसांसारखेच लहान मुलांना पण मत असतं, ते निर्णय घेताता, निष्कर्ष काढतात आणि सगळं लक्षात ठेवतात.
खरं कारण लहान मुलांना पटवून सांगायला कदाचित तुम्हाला थोडं जास्त बोलावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील पण तोच बरोबर मार्ग आहे. मुलांच्या मनात हे ठासलं गेलं पाहिजे की माझे पालक मला फसवणार नाहीत तेव्हा कुठे मोठी झाल्यावर ही मुलं प्रामाणिक माणूस बनतील.