1 उत्तर
1
answers
तहसीलदारांवर कोणती जबाबदारी असते?
3
Answer link
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक ‘तहसीलदार’ नेमते. तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही नाव प्रचलित आहे.
हे गट ‘अ’ प्रकारचे पद आहे. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो. त्यावर त्याने योग्य निर्णय घेतल्यावरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.
जमीन महसुलाशिवाय पिकांची आणेवारी काढणे ही महत्त्वाची जबाबदारी तहसीलदारावर असते. या आणेवारीच्या आधारेच दुष्काळाची स्थिती जाणून घेऊन त्याची घोषणा केली जाते. यानंतर सरकारने नियमांनुसार निश्चित केलेली नुकसानभरपाई तहसीलदाराच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो.
तालुक्यातून गौण खनिजांचे उत्खनन करायचे असेल (उदा. वाळू) तरी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते. ‘बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला गेल्यावर तहसीलदारावर हल्ला झाला,’ अशा बातम्या वर्तमानपत्रात नेहमी वाचायला मिळतात. त्यातून तहसीलदार पदाचे महत्त्व दिसते.
स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे ही कामेही तो करतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम करतो. कायद्याची पदवी न घेताही तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडतो. त्यात समन्स पाठवणे, प्रसंगी अटक वॉरण्ट काढणे, दंड करणे असे अधिकार येतात.
नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी आपल्या कार्याचा अहवालप्रांताधिकाऱ्यांकडे सादर करणे आणि तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यास त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित सादर करणे, ही कामे तहसीलदारास करावी लागतात.