1 उत्तर
1
answers
जीवन सुंदर आहे मराठी भाषण?
2
Answer link
जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे ,जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे
जीवनात बरेच कही करण्यासारखे आहे , करता करता बरेच काही शिकण्या सारखे आहे
जीवनात बरच काही देण्यासारखे आहे , देता देता बरेच काही घेण्यासारखे आहे
जीवनात बरेच काही फुलवता येते , इथे बरेच काही चांगले पेरन्या सारखे आहे
जीवन मोहक फुलासारखे असते , पवित्र प्रेमाने मन मोहवणारे असते
जरी सुकले तरी ते , आठवनिंच्या पुस्तकात जपण्यासाठी असते
जीवन ही एक शाळा आहे , मन होई फळा इथे
आयुष्यातील क्लिष्ट प्रमेय सोडवता येतात तिथे
आयुष्य हे जिवंत अध्यात्म , याच्या तत्वासमोर वेदही थिटे
मौनात अनुभवता दोन क्षण , इथे ईश्वर ही भेटे
जीवन हे सुंदर आहे , नसतात इथे फक्त दुःखाचे क्षण ,
डोळसपणे पाहता बाजूला , सुखाचे गवसती अनेक क्षण
जीवन खरेच सुंदर आहे , पाहण्या एक नजर हवी
निसटनारे गोड क्षण टिपन्यास, ती तिथे हजर हवी
************************************
"हे जीवन सुंदर आहे." असं एक गीत ऐकायला मिळालं, खरंच जीवनाइतकं तऱ्हेतर्हेचं रंगीबेरंगी, मनाला मोहवून टाकणारं आणि सतत हवहवसं वाटणारं दुसरं तिसरं असं काहीच सापडत नाही. उबदार आणि ऐटदार असं फिलींग देणारी केवळ वस्त्रंच असतात असं नाही. तर जीवनात ऐटदार आणि उबदार बोलणारी आणि मनापासून तसं वागणारी माणसं ही असतात. ती आनंद, उत्साह आणि सुरक्षितता देऊन जातात. जणू दैनंदिन वातावरणात अशी माणसं उत्तेजक पेयच देतात. मी बागेत किंवा मैदानात फिरायला जातो, तेंव्हा वय विसरून वयस्कर मंडळी एकमेकांची थट्टा मस्करी करताना, विनोद करतांना, खळाळून हसतांना दिसतात, तेव्हा मला मनस्वी आनंद होतो आणि या वयस्कर मंडळींविषयी अनाहूत अभिमान ही वाटायला लागतो; अशी हसत खेळत, एकमेकांविषयी आदर ठेवून थट्टा मस्करी करणारी वयस्कर मंडळी प्रत्येक गल्ली बोळात दिसायला हवीत, त्यामुळे कीती बहार येईल नै का? जीवन किती बहारदार होईल? वाढत्या वयाबरोबर असणार्या आरोग्याच्या समस्या आणि व्याधी कुठल्या कुठे पळून जातील नै का?
तसं पहायला गेलं तर, कुणीतरी आपल्या पाठीवर थाप मारली, किंवा शाबासकी दिली तर आपली अंतर्गत उर्जा दुप्पट होते, आणखी दुप्पट उत्साहाने आपण कामाला लागतो, यश आपल्या नजरेच्या टप्प्यात आले आहे, असं आपल्याला वाटू लागतं, "पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा" या कुसुमाग्रज यांच्या कवितेनंही हेच सांगितलं आहे. केवळ पाठीवर किंवा अंगावर पडलेल्या हाताचा आणि प्रेमळ स्पर्शाचा तो चमत्कार असतो, एवढं कशाला लहान मुलांच्या पाठीवर थोपटलं की कीतीही खट्याळ मुलं असो ते क्षणार्धात झोपी जातं, ‘दृष्ट काढणे’, ‘मीठ मोहरी उतरवून टाकणे’ या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी अंधश्रध्देला खतपाणी घातल असल्याचे वरकरणी वाटत असले तरी, त्यातील भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा महत्वाचा मानायलाच हवा. कारण अशा घरगुती उपायाने अनेकांना बरे वाटायला लागण्याची किमान सुरूवात तरी होते, अर्थात गेल्या हजारो वर्षापासून घरगूती परंपरा टिकून आहेत, यातच त्या त्या गोष्टींची ताकद आपल्या लक्षात यायला हवी, कारण एखाद्या गोष्टीपासून कुणालाच व कुठलाच फायदा नसेल तर ती गोष्ट कालबाह्य होते व पुढे तीचे अस्तित्वही संपुष्टात येते, पण या गोष्टी आजच्या संगणक युगातही टिकून आहेत.
माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे, तो समाजशील असून समुहाने रहायला त्याला आवडते, आपल्या आवडीची माणसे बरोबर आहेत म्हंटल्यावर त्याच्यात ताकद निर्माण होते, त्याच्या अंगात बळ येते, पाठीवर हात पडला की तो उत्तेजित होतो, त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास व आनंद विलसतो, अवतीभवती असलेल्या माणसांची व संवादांची परस्पर क्रिया घडून, एक वेगळीच अद्भूत क्षमता त्यांच्यात उत्पन्न होते. परस्पर भावनीक निखळ नाते मनातील अनेक निगरगाठी सोडवतात.
दुसऱ्यानं आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्या कार्याचं कौतुक करावं असं यच्ययावत सर्वच मनुष्य प्राण्याला मनापासून वाटत असतं. अहो, एवढं कशाला ईश्वराला देखील त्याचं कौतुक आवडतं. सर्व धार्मिक साहित्यामधून ईश्वराचं कौतुकच केलेले असते, असे कोडकौतुक जर ईश्वराला आवडत असेल तर जित्याजागत्या माणसाला आपले कौतुक ऐकायला आवडणे हे नैसर्गिकच नाही का? असो.
असं प्रेमळ, उल्हासी आणि आपल्याला कोणीतरी मनापासून जपत आहे,आपली काळजी घेत आहे, ही भावनाच तुमचं वय वाढवायला कारणीभूत होत असते. यापुढे जावून एका प्रार्थनेत असे म्हंटले आहे की, “प्राणशक्ती माझ्या ठिकाणी सदैव जागृत व कायमपणे स्पंदमान असो... मला उल्हासित करणारी तसेच स्फुरणारी असो... अगदी प्राणार्पण करून कार्य करण्याची मला उमेद दे!” अशी प्रखर इच्छाशक्ती लाभल्यावर म्हातारपण आपल्या वाऱ्यालाही थांबणार नाही, कारण प्राणपणाने एवढी गोष्ट करण्याची जिद्द निर्माण झाली की, ती जिद्द आणि तो उत्साह वृध्दत्वाला आसपास फिरकू ही देत नाही.
जरा आजूबाजूला सूक्ष्मपणाने, जागरूकपणाने आणि जिज्ञासू वृत्तीने पाहिले की, अनेक अशी वयस्कर मंडळी आपल्याला दिसून येतात, त्यांनी आपल्या जवळही वृध्दत्व फिरकू दिलेले नाही; हे प्रत्कर्षाने अनुभवास येते, आणि अशी माणसं आपल्या अवतीभवती असली की, “हे जीवन सुंदर आहे!” याचा हरघडी प्रत्यय होतो. आभाळाएवढ्या दु:खाला कवटाळून न बसता, त्याला थोडे बाजूला ठेवून जवाएवढ्या सुखाला डोक्यावर घेणारी अशी माणसं नक्कीच समाजात आनंदाची, सौख्याची, उत्साहाची आणि उल्हासाची कारंजी फुलवत असतात; त्यांच्या संपर्कात राहीलं की, नक्कीच वाटू लागतं, “हे जीवन सुंदर आहे!”
-