सामान्यज्ञान
जनावरांना हिवाळ्यात थंडी लागते का? उदा.बैलांना
1 उत्तर
1
answers
जनावरांना हिवाळ्यात थंडी लागते का? उदा.बैलांना
1
Answer link
हो, नक्कीच
वाढत्या थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात, त्यामुळे काही जनावरे लंगडतात. त्वचा खरबरीत होते. पोट गच्च होऊन रवंथ करण्याची प्रक्रिया कमी होते.
हिवाळी वातावरणातील (Cold Weather) तापमानाचा परिणाम हा त्यांच्या पचन संस्थेवर आणि आंतरस्राव किंवा संप्रेरक संस्थेवर दिसून येतो. थंडी (Cold) अचानक वाढली, तर रक्तातील कॉर्टिकोस्टिरॉइड ही संप्रेरके आणि रक्तातील नॉन फॅटी ॲसिडचे प्रमाण वाढते. जनावरांना हायपोथरमिया (कोल्ड स्ट्रेस) होतो. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते, स्वास्थ्य बिघडते. कोंबड्यांमध्ये प्रोइन्फ्लमेटोरी सायटोकाइन जीन एक्स्प्रेशन, तसेच इंटरल्यूकॅन एमआरएनए यांचे प्रमाण वाढते. थंडीचा परिणाम हा सर्व वयांतील जनावरांवर होतो.
जनावरांच्या मेंदूमध्ये (हायपोथॅलॅमस) तापमान नियमित किंवा नियंत्रित करण्यासाठी उष्ण लक्ष केंद्र आणि उष्माग्राही केंद्र असते. ही दोन्ही केंद्रे एकमेकांच्या सहकार्याने जनावरांतील तापमान नियमित करतात. संवेदनेनुसार तेथे प्रक्रिया होते. दोन्ही केंद्रांच्या सहकार्याने जनावराच्या शरीराचे तापमान एका विशिष्ट पातळीच्या आसपास अबाधित राखले जाते. जेव्हा वातावरणातील तापमान एका विशिष्ट पातळीत असते तेव्हा ते जनावरास अल्हाददायक असते.
हे तापमान जनावरांसाठी १६ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत असून, त्या जनावरांचे तापमान ३८.४ ते ३९.१ अंश सेल्सिअस राखले जाते. वातावरणाचे तापमान २५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत असताना जनावराच्या शरीरास उष्णता मिळते; परंतु त्याच्यानंतर उष्णता शरीराबाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. वातावरणाचे तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले, की शरीरातील ऊर्जा साठविण्याची क्षमता संपते आणि जनावराच्या शरीरावर किंवा अंगावर काटा येऊन निर्माण होणारी ऊर्जाही अपुरी पडते. त्यामुळे अंतस्रावी ग्रंथीचे स्रवण यांची स्निग्ध पदार्थावर प्रक्रिया होऊन ऊर्जा निर्मितीस सुरुवात होते.
हिवाळ्याचा काळात कधी कधी रात्रीचे तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झालेले आढळते. वातावरणातील तापमानाची पातळी जनावराच्या थर्मोन्यूट्रल झोनच्या खाली येते. त्या वेळी जनावरास ताण निर्माण होतो. अशा स्थितीत जनावर शरीरातील उष्णता शरीरात साठविण्याचा म्हणजेच बाहेर न पडू देण्याचा प्रयत्न करते. कातडीला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्या आकुंचित पावतात.
पर्यायाने कातडीस रक्तपुरवठा कमी होतो, ती थंड होते आणि उष्णता रोधक बनते. शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याचे प्रमाण कमी केले जाते. दुसरे म्हणजे थंडीमुळे अंगावर काटा येतो. केसांच्या मुळाशी असलेले स्नायू आकुंचित पावतात. केस उभे राहतात. ज्यामुळे देखील शरीरातील उष्णता बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते. अंगावर काटा येताना कातडीतील स्नायू थरथर कापतात, ज्यातून शरीरातील उष्णता वाढविण्याचा प्रयत्न होतो.
हिवाळ्यातील ताणाला प्रतिकार करण्यासाठी जनावरांमध्ये काही बदल घडून येतात. शुष्क घटकांचे ग्रहण वाढणे, शुष्क घटकांचे पचन कमी होणे, रवंथ करण्याची प्रक्रिया वाढणे, शरीरातील आतड्यांची हालचाल वाढणे, खाल्लेल्या घटकांचा पचनसंस्थेतून शेणाद्वारे बाहेर फेकण्याचा वेग जास्त होणे. प्राणवायू घेण्याचा वेग वाढतो.
वातावरणातील थंडीचा दर वाढत गेल्यास, म्हणजेच तापमान १६ ते १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास जनावराच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते. यामध्ये आहार घेण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम शरीर क्रियेस लागणाऱ्या ऊर्जानिर्मितीवर होऊन ऊर्जेची आवश्यकता वाढते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीराचे आतील तापमान योग्य त्या पातळीत ठेवण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो.
जनावरांवर होणार परिणाम
अति थंडीमुळे स्नायू आखडतात. त्यामुळे काही जनावरे लंगडतात. त्वचा खरबरीत होते. पोट गच्च होऊन रवंथ करण्याची प्रक्रिया कमी होते. सडावर भेगा पडून त्यातून रक्त येते, त्यामुळे जनावर दूध काढू देत नाही, ते अस्वस्थ होते. जनावर व्यवस्थित पान्हावत नाही ज्यामुळे दूध उत्पादन, दुधाची प्रत घटते. दुधावर असणारी वासरे आणि करडे यांचा मृत्यू होऊ शकतो.
वासरांवर होणारा परिणाम
वातावरणातील तापमान कमी झाल्यानंतर वासराला शरीराचे तापमान नियमनासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. म्हणजेच प्रत्येक अंश कमी तापमानाला एक टक्का ऊर्जेची गरज असते. अशा परिस्थितीत वासरे आपल्या शरीरातील उपलब्ध असलेली ऊर्जा उपयोगात आणतात. अशा ऊर्जेचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास वासराचे वजन घटते. त्यांची प्रतिकार क्षमतादेखील कमी होते.
थंडीमध्ये वासरांना दिवसातून तीन वेळा खाद्य देणे गरजेचे असते. दोन वेळा खाद्य देत असल्यास सायंकाळी जास्तीचे दूध वासरास पाजावे. यामुळे रात्रीच्या वेळी जास्तीची ऊर्जा मिळेल. या काळात २०० ग्रॅम काफ स्टार्टर किंवा खुराक वाढवावा. थंडीमुळे वासरे पाणी कमी पितात, त्यामुळे रक्तातील पाण्याची पातळी कमी होते. त्यासाठी थंडीमध्ये त्यांना कोमट म्हणजेच १०१ ते १०२ अंश फॅरानहाइट इतक्या तापमानाचे पाणी पाजावे. जेणेकरून ते भरपूर पाणी पितात.
वासरांचा गोठा
नवजात वासरांना कोरडे करावे, जेणेकरून शारीरिक ऊर्जेचा ऱ्हास होणार नाही. वासरांना थंडीचे शहारे किंवा शरीराचे केस टवकारतात का, याकडे बारकाईने लक्ष ठेवावे.
Animal Care
Farmer Life :
जनावरांच्या गोठ्यात जास्तीचा कोरडा चारा, वाळलेला कडब्याचा किंवा मक्याचा चारा टाकावा. जेणेकरून त्यांच्या शरीराला ऊर्जा मिळेल. रात्रीच्या वेळी वासरांच्या अंगावर गोणपाट बांधून ठेवावे. वाळलेल्या पेंढ्यांचा बिछाना हा थंडीसाठी अतिशय उत्तम असतो.
थंडीपासून वाचविण्यासाठी उपाययोजना
गोठ्यात बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी उघड्या गोठ्याच्या चारही बाजूने खिडक्यांना गोणपाटाचे पडदे बांधावेत. पडदे फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त उघडे ठेवावेत. गोठा उबदार राहण्यासाठी जास्त वॉटचे बल्ब किंवा हीटरचा वापर करावा. गोठ्यातील जमीन उबदार आणि कोरडी राहावी यासाठी भात किंवा गव्हाचे तूस किंवा कडबा बिछान्यासाठी वापर करावा.
जनावरांना दुपारच्या वेळी उन्हात बांधावे. गरम किंवा कोमट पाण्याने धुवावे. सडाची त्वचा फाटू नये यासाठी ग्लिसरीन लावावे. कास धुण्यासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे. आहारात कडबा मुरघास आणि दाणा मिश्रणाचे प्रमाण वाढवावे.
संध्याकाळचा जनावराचा आहार सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान द्यावा कारण दिलेल्या आहाराचे चयापचन होऊन ऊर्जा निर्मितीसाठी कमीत कमी सहा ते आठ तास लागतात. म्हणजेच तयार होणारी ऊर्जा त्यांच्या तापमान नियमानासाठी रात्री थंडीच्या काळात दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान वापरता येईल, कारण या वेळी थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो. हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात अधिक ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित ठेवले जाते.
थंड वातावरणाचा परिणाम
कमी थंडीचा घात ः शरीराचे तापमान ३० अंश ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहते. (८६ अंश ते ८९ अंश फॅरानहाइट) मध्यम थंडीचा घात ः शरीराचे तापमान २२ अंश ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत राहते.( ७१ अंश ते ८५ अंश फॅरानहाइट)
तीव्र थंडीचा घात ः शरीराचे तापमान १६ ते १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.(६८ अंश फॅरानहाइट) जेव्हा शरीराचे तापमान ८५ अंश फॅरानहाइटपेक्षा कमी होते, तेव्हा जनावरांची शारीरिक क्रिया तसेच चयापचय क्रिया मंदावते. शरीरातील रक्ताचा प्रवाह त्वचेकडून आतील अवयव वाचविण्याकडे जातो. अशा स्थितीत जनावरांचे सड, कान आणि अंडाशय हे थंडीच्या घाताने बाधित होतात. जनावरांचा श्वासोच्छ्वास वाढतो, हृदयाचे ठोके कमी कमी होत जातात.
- डॉ. व्ही. एम. सरदार
सौजन्य - ऑग्रोवन