प्रवास

प्रवास वर्णन म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

प्रवास वर्णन म्हणजे काय?

0

प्रवासवर्णन

प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते लेखनरूपाने मांडणे म्हणजे प्रवासवर्णन, असे स्थूलमानाने म्हणता येईल. सामान्यतः वर्णनाची पातळी हकीकतीची किंवा वृत्तांतकथनाची राहते. देश, काल,परिस्थिती ह्यांचे वर्णन, प्रवासातील हालअपेष्टा, मौजमजा वगैरेंच्या हकीकती वस्तुनिष्ठपणे सांगणे, असेच त्यांचे परंपरगत स्वरूप असते. अशी प्रवासवर्णने त्या त्या काळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी म्हणून अभ्यासाची साधने होऊ शकतात. असे प्रवासवृत्तांत बरेच आढळतात. फाहियानचे (चौथे शतक) इंग्रजीत भाषांतरित झालेले प्रवासवर्णन अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंग्डम्सया नावाचे आहे. फाहियानप्रमाणेच भारताचा प्रवास करणारा दुसरा प्रसिद्ध चिनी प्रवासी म्हणजे ह्यूएनत्संग (सु. ६००–६६४) होय. त्याच्या प्रवासाचा वृत्तांत रेकॉर्ड्‌स ऑफ वेस्टर्न रिजन्स ऑफ द ग्रेट तेंग डिनॅस्टी ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. भारतात आलेला व तत्संबधी प्रवासवर्णन लिहिणारा आणखी एक चिनी प्रवासी म्हणजे इत्सिंग (६३४–७१३) हा होय.

इंग्रज प्रवाशांनी केलेल्या प्रवासाचे वृत्तांतही विपुल आहेत. व्यापारासाठी स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन जलपर्यटकांवर मात करण्याच्या ईर्षेने भारलेल्या व नवनव्या प्रदेशांचे शोध घेणाऱ्या इंग्लिश दर्यावर्दीनी जलपर्यटने करताकरता त्या त्या प्रदेशांची, तेथल्या रहिवाशांची, भूवैशिष्ट्यांची वर्णने लिहून ठेवली. रिचर्ड हॅक्लूटने ह्या वर्णनांचे संकलन करून त्यांना व्यवस्थित रुप दिले. प्रिन्सिपल नॅव्हीगेशन्स (१५८९) हे त्याचे सुप्रसिद्ध संकलन. तत्पूर्वीचे त्याचे पहिले संकलन डायव्हर्स व्हॉयेजिस टचिंग द डिस्कव्हरी ऑफ अमेरिका (१५८२) हे होय. सॅम्युएल पर्चस हाही आणखी एक महत्वाचा संकलक होय. त्याची पर्चस हिज पिलग्रिमेज (१६१३), पर्चस हिज पिलग्रिम : मायक्रॉकॉसमॉस, ऑर द हिस्टरी ऑफ मॅन (१६१९), हॅक्लूट्‌स पॉस्ट्यूमस ऑर पर्चस हिज पिलग्रिम्स (४ खंड, १६२५) ही संकलने जगप्रवाशांच्या इतिहासाची साधने ठरली. ह्या संकलनांत वेस्ट इंडीजकडील भ्रमणे, स्पॅनिश दर्यावर्दीचे जलप्रवास, ड्रेक, कॅव्हॅडिश वगैरेंच्या मोहिमा इत्यादीची वर्णने आहेत. कॅरिअट, विल्यम हॉकिन्झ, रॉबर्ट हारकोर्ट हे प्रवासी व प्रवासवृत्तकार होत. सर वॉल्टर रॅली ह्या व्यासंगी जलपर्यटकाचे गियानाच्या प्रवासातील साहसांचे रोमहर्षक वृत्तकथन वाचकाला मोहून टाकणारे आहे. रॅलीने पहिल्या एलिझाबेथच्या काळातील आरमार व त्याच्या सुधारणा यांवरही लिहिले आहे.

उपरोक्त प्रवासवर्णनांकडे वाङ्‌मयीन आविष्कार म्हणून कोणी पाहत नव्हते, पण ललित प्रवासवर्णनाकडे झुकणारी प्रवासवृत्ते विल्यम डॅम्पिअर, कॅ. वुड्झ रॉजर्झ, जॉन बायरन, जेम्स कुक इत्यादींनी लिहिली. मात्र अलेक्झांडर फॉन हंबोल्टच्या दक्षिण अमेरिकेच्या प्रवासवर्णनाच्या इंग्रजी भाषांतराने प्रवासवर्णन हा ललित वाङ्‌मयाचा प्रकार होऊ शकतो, अशी दिशा दाखविली. चार्ल्स वॉटरटनने विनोदी प्रवासवर्णने लिहिली, तर रिचर्ड फोडेने स्पेनच्या प्रवासवर्णनाने वाचकाला बसल्याबसल्या स्पेनचे दर्शन घडविले.

प्रवासवर्णन प्रवासवृत्ताचे रूप टाकून ललितरूप केव्हा घेते, कसे घेते, ह्याचा विचार करू लागल्यावर काही गोष्टी स्पष्टपणे जाणवू लागतात. प्रवासवर्णन हा कथा या कादंबरीसारखा वाङ्‌मयप्रकार नाही, हे उघडच आहे. त्याची जवळीक आत्मचरित्राशी होऊ शकते. प्रवासवर्णनात प्रवासवर्णनकाराच्या प्रवासातील अनुभवांचे कथन येते. ते करताना कल्पनेने पुन्हा सगळा प्रवास अनुभवावा लागतो. प्रवासातील अनुभवांचा पुनर्शोध व शब्दांवाटे त्यांची करावयाची असलेली पुर्नरचना ही प्रक्रिया प्रवासवर्णनाला लालित्याच्या दिशेने नेते. ह्या प्रक्रियेत प्रवासवर्णनकाराच्या संवेदनशील व्यक्तीमत्वाला अपरिहार्य महत्त्व असते. प्रत्यक्ष प्रवासाचा काळ व प्रवासवर्णनलेखनाचा काळ ह्यांच्या दरम्यान कित्येकदा दीर्घ कालावधी लोटलेला असतो. अशा वेळची प्रक्रिया निराळ्या पातळीवरची असते. स्थळ, प्रसंग याचा अनुभव दीर्घ काळ मनात रेंगाळलेला असतो. स्मृतीरूपाने तो अनुभव आस्वादला जातो. स्थळ, प्रवासी ह्यांच्यातले दूरत्व नाहीसे होते. स्थळ कसे भावले, ह्याला महत्व येते. स्थळालाही व्यक्तिमत्व असते. प्रवासवर्णनकाराच्या व्यक्तिमत्त्वामागे जसे पिढ्यापिढ्यांचे संचित उभे असते, तसे स्थळामागेहीपरंपरा, संस्कृती, इतिहास ह्यांचे संचित उभे असते. भूरचनात्मक वैशिष्ट्यांमुळेही स्थळाला व्यक्तिमत्त्व लाभते. स्थळच प्रवासवर्णनकाराच्या मनात संवेदनलहरी निर्माण करते. भिन्नभिन्न पातळ्यांवर एकच अनुभव घेणे, ही ललितलेखनातील प्रक्रिया घडून प्रवासवर्णनाला वाङ्‌मयीन घाट लाभू शकतो.

प्रवासवर्णनात स्वानुभवाला प्राधान्य असल्याने लेखकाच्या व्यक्तीमत्त्वानुसार निवेदनाची पद्धती ठरते. जसा प्रवास केला त्याप्रमाणे सरळ सांगणे, पत्रांतून वा दैनंदिनीतून तसेच स्मृतिरूपाने प्रवासवर्णन लिहिणे इ. पद्धती स्वीकारल्या जातात.

प्रवासवर्णन ललितरूप केव्हा व कसे घेते हे लक्षात घेऊन प्रवासवर्णनांचा परामर्श घेऊ लागले, की किंगलेकचे ओथेन (१८४४) नजरेत भरते. पूर्व यूरोप, मध्य पूर्व आणि ईजिप्त ह्या प्रदेशांच्या ह्या प्रवासवर्णनात प्लेगच्या थैमानाचे वर्णन, पाशा व इंग्रज प्रवासी ह्यांचा काल्पनिक संवाद, पॅलेस्टाइनचे वाळवंट पार करतानाचा अनुभव इत्यादींबद्दल तो संवेदनशील वृत्तीने आणि क्वचित सूक्ष्म उपरोधाने व विनोदाने लिहितो. मन मागे ईटनमध्ये रेंगाळलेले, आईच्या स्मृतीने भारलेले अशा मनःस्थितीतली त्याची आर्त हुरहूर वाचकाला भिडते. किंगलेकबरोबरच सर रिचर्ड बर्टनच्या प्रवासवर्णनांचा उल्लेख अपरिहार्य आहे. सैनिक, कवी, भाषाशास्त्रज्ञ, उत्तम अनुवादक, तसेच मानवशास्त्र, वनस्पतिविज्ञान आणि भूविज्ञान यांतील तज्ञ अशा अनेकविध नात्यांनी त्याची कारकीर्द संस्मरणीय ठरली. अरेबिक, हिंदी, मराठी, सिंधी, पंजाबी, तेलुगू, पुश्तू, मुलतानी अशा अनेक भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. भारतात तो लष्करी अधिकारी म्हणून आला. त्याने नोकरीच्या निमित्ताने व इतर कारणांनी विपुल प्रवास केला आणि त्यामधील आपले अनुभव मोठ्या रसिकपणे प्रवासवर्णनांतून रेखाटले. ह्या वर्णनांतून त्याच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय सतत येत राहतो. त्याची सिंध अँड द रेसिस दॅट इनहॅबिट द व्हॅली ऑफ द इडंस (१८५१), पिल्‌ग्रिमेज टू अल्‌-मदिना अँड मक्का (१८५५-५६), फर्स्ट फुट्‌स्टेप्स इन ईस्ट आफ्रिका (१८५६), लेक रीजन्स ऑफ सेंट्रल आफ्रिका (१८६०), सॉल्ट लेक सिटीचे वर्णन असलेले सिटी ऑफ द सेंट्‌स (१८६१) ही प्रवासवर्णने या प्रकारास नवीन वळण देणारी अशी आहेत.

डब्ल्यू, एच्. हडसन. आर्. बी कनिंगहॅम ग्राअम, हिलरी बेलॉक (द पाथ टू रोम,१९०२), टी. ई. लॉरेन्स (सेव्हन पिलर्स ऑफ बिज्डम, १९२६), डी. एच. लॉरेन्स (ट्‌वायलाइट इन इटली, १९१६), ऑल्डस हक्सली (जेस्टिंग पायलट; बियाँड द मेक्सिक बे, १९३४), जेरल्ड ड्युरेल (द ओव्हरलोडेड आर्क, १९५३; द ड्रंकन फॉरेस्ट, १९५६) ह्यांची प्रवासवर्णने ह्या वाङ्‌मयप्रकारात सकस भर टाकणारी आहेत. स्व्हेन हेडीनचे मानससरोवराचे वर्णन करणारे ट्रान्स हिमालयाज हे प्रवासवर्णनही उल्लेखीय आहे. मिस्कील, विनोदी अशी प्रवासवर्णने लिहिणारा जॉर्ज मिकेश (हाउ टू स्केप स्काइज, १९४८) ह्याचाही उल्लेख करायला हवा. आधुनिक युगात अंतराळयानांचे वृत्तांतही लिहिले जात आहेत. तांत्रिक, शास्त्रीय परिभाषेने युक्त पण मनोरंजक असे ते आहेत (उदा; रिचर्ड एस्. लूइसचे द व्हॉयेजिस ऑफ अपोलो, १९७४)

इंग्रजी वाङ्‌मयाच्या प्रभावाने नवे वाङ्‌मयप्रकार मराठीत निर्माण झाले. प्रवासवर्णन त्यांपैकीच एक होय. सुरुवातीला मराठीतले असे लेखन परिचयपर, गोषवारा सांगणारे असे होते. उदा; महादेव गोविंदशास्त्री कोल्हटकरांचे कोलम्बसचा वृत्तांत (१८४९). आपण राहतो तेथले वर्णनही काहींनी लिहिले. उदा.,गोविंद नारायण माडगावकरांचे मुंबईचे वर्णन (१८६३) व नारायण विष्णू जोशी यांचे पुणे शहराचे वर्णन (१८६८), दोन मित्रांच्या संभाषणप्रसंगातून गोकर्णमहाबळेश्वर यात्रेप्रकरणी वृत्तांत (१८६३) हे प्रवासवर्णन जगन्नाथ विठोबा क्षत्रींनी लिहिले. पंडिता रमाबाईचा इंग्लंडचा प्रवास (१८८३) पत्ररूप असून तो समाजसुधारणेसाठी लिहिला गेला. गोडसे भटजीचे माझा प्रवास (१८८७, प्रथम प्रकाशित १९०७) हे मात्र खरे प्रवासवर्णन ठरले. १८५७ च्या बंडात वणवणताना झाशीच्या युद्धात व नंतरच्या विजनवासात मृत्यूने केलेल्या पाठपुराव्याचा जो अनुभव त्यांना आला, त्याची पुनर्निर्मिती ह्या वर्णनात केलेली आहे. बंडाचे सावट पुस्तकभर आहे. रावजी भवानराव पावगी (विलायतेचा प्रवास– २ भाग, १८८९ ते १८९२), नरसिंह चिंतामण केळकर (सिमलावर्णन, १९२४), गोविंद चिमणाजी भाटे (माझी विलायतची यात्रा, १९३४) यांनीही प्रवासवर्णात भर घातली. तथापि काणेकरांच्या धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९४०) या प्रवासवर्णनाने मराठी प्रवासवर्णनांना वाङ्‌मयीन गुणवत्ता प्राप्त करून दिली. जेम्स एगाटची दैनंदिनी पद्धत त्यांनी प्रवासवर्णनात स्वीकारली. लेखकाचे व्यक्तिमत्व, संस्कार, संवेदनशीलता, स्थळाविषयी व तेथील लोकांविषयीचे कुतूहल, परिस्थितीचे मार्मिक आकलन, सहप्रवाशांचे चित्रण इ. वैशिष्ट्यांनी त्यांची इतरही प्रवासवर्णने संपन्न आहेत. प्रवासवर्णनाचे आणखी नवे रूप गंगाधर गाडगीळ (गोपुरांच्या प्रदेशात, १८५२ आणि साता समुद्रापलीकडे, १९५९); शशिकांत पुनर्वसू (उब आणि गारठा, १९५७); प्रभाकर पाध्ये (तोकोनोमा, १९५९); दि. बा. मोकाशी (अठरा लक्ष पावले, १९७१) ह्यांच्या प्रवासवर्णनांतून दिसते. जयवंत दळवींचे मिस्कील असे लोक आणि लौकिक (१९५८) आणि पु. ल. देशपांडेंची अपूर्वाई (१९६०), पूर्वरंग (१९६३) ही प्रवासवर्णने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आचार्य काका कालेलकरांच्या प्रवासवर्णनांतून (लोककथा, १९३८) त्यांचे प्रगल्भ, समृद्ध व सुसंस्कृत व्यक्तिमत्व व काव्यात्म वृत्ती यांचा प्रत्यय येतो.

रा. भि. जोशींच्या वाटचाल (१९५३), मजल दरमजल (१९६१) इ. प्रवासवर्णनांना विशेष मोल आहे. देशभर हिंडताना जे स्मृतिधन गोळा झाले, त्याचा आठव ह्या प्रवासवर्णनांमध्ये वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींतून झालेला आहे. एक आर्त हुरहूर त्यातून जाणवते.

प्रवासवर्णन एक साहित्यप्रकार म्हणून अधिकाधिक विकसित होत चालला आहे.

लेखक: चंद्रकांतवर्तक
उत्तर लिहिले · 30/1/2023
कर्म · 9415

Related Questions

आपल्या एखाद्या स्मरणीय प्रवासाचे चाळीस ओळीत प्रवास वर्णन लिहा?
आम्हाला येत्या मार्चमध्ये गिरणार , द्वारका , सोरटी सोमनाथ यात्रा स्वतःच्या वाहनाने करायची आहे आम्ही पुणे परिसरात राहतो तर प्रवास कसा करावा लागेल, मुक्काम कोठे करावा लागेल तसेच या ठिकाणांचा क्रम कसा असावा कृपया याबाबत कुणाला काही माहिती असेल तर सांगा ही विनंती?
मुंबई ते पोलिस मुख्यालय नाशिक ग्रामीण कसे जायचे?
76% दोन्ही कानाने बहिऱ्यांना ST प्रवासात सवलत आहे काय?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
108 हि ॲम्बुलन्स सेवा परतीच्या प्रवासासाठी म्हणजे रुग्णालयातून रुग्णाला घरी पोचविण्यासाठी उपलब्ध असते का?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?