अलंकार

अलंकार म्हणजे काय ते सांगुन अलंकाराचे प्रकार कोणते?

1 उत्तर
1 answers

अलंकार म्हणजे काय ते सांगुन अलंकाराचे प्रकार कोणते?

1




अलंकार म्हणजे काय ? अलंकार व त्याचे प्रकार



अलंकार म्हणजे दागिना , ज्याप्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्याची किंवा चांगल्या कपड्यांची गरज असते त्याप्रमाणे भाषेला सुद्धा शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो त्यास 'अलंकार' असे म्हणतात. 

कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून कधी विरोध दाखवून कधी नाद निर्मिती करून तर कधी शब्दांमध्ये विस्तार करून तर कधी कधी एखाद्या कल्पनेला विस्तारून अक्षररचनेत निर्माण होणाऱ्या नादामुळे भाषेला शोभा येते म्हणजेच आपण भाषेला अलंकार चढवतो.

अलंकार व त्याचे प्रकार, alankar v tyache prakar, marathi vyakaran alankar
अलंकार व त्याचे प्रकार
भाषेला शोभा आणण्यासाठी आपण जे काही भाषेचे गुणधर्म वापरतो त्या गुणधर्मामुळे अलंकाराचे २ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

१. शब्दालंकार

२. अर्थालंकार



१. शब्दालंकार
ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे गद्याला किंवा पद्या‌‌ला सौंदर्य प्राप्त होते त्यास 'शब्दालंकार' असे म्हणतात

शब्दालंकारचे आणखी ३ उपप्रकार पंडतात ते पुढीलप्रमाणे

(i) अनुप्रास अलंकार
जेंव्हा गद्यामध्ये किवा पद्यामध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती करून वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास 'अनुप्रास अलंकार' असे म्हणतात.

उदा १. कड्यावरुनी या उड्या प्रथम हकुनी त्या गड्या


 
          २. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझा घरी


 
 पहिल्या उदाहरणामध्ये ड्या ची पुनरावृत्ती करून वाक्यामध्ये शोभा वाढवली गेली त्याच प्रकारे दुसऱ्या वाक्यात देखील ज, रा, री या शब्दांची पुनरावृत्ती करून वाक्याची शोभा वाढवली गेली अशा अक्षरांची पुन्हा पुन्हा हाताळणी करून वाक्याला जे सौंदर्य आणले जाते त्या सौंदर्य निर्मितीला अनुप्रास अलंकार असे म्हणतात



(ii) यमक अलंकार
कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे दुसऱ्या चरणात पुन्हा त्याच क्रमाने परंतू भिन्न अर्थाने आल्यास त्यास 'यमक अलंकार' म्हणतात

उदा १. जाणावतो तो ज्ञानी पूर्ण समाधानी नि:सन्देह मनी सर्वकाळ ||
          २. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा घडो विषम सर्वता नावडो


 वरील उदाहरणांमध्ये पहिल्या उदाहरणात नी हे अक्षर पुन्हा पुन्हा आले असुन या अक्षरामुळे वक्यातील पंक्तीला अधिक सौंदर्य प्राप्त झाले. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये डो हे अक्षर वेगवेगळ्या अर्थाने यमक जोडून आणून यमक अलंकार तयार झाला आहे.



(iii) श्लेष अलंकार
एका वाक्यात किंवा चरणात एकच शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमककृती साधल्या जाते तेव्हा 'श्लेष अलंकार' होतो.

उदा १. हे मेघा तु सर्वांना जीवन देतोस.

           २. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही.

वरील दोन्ही उदाहरणे बघितले असता पहिल्या उदाहरणामध्ये जीवन हा शब्द पाणी व आयुष्य अशा दोन अर्थाने आला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये मित्राच्या या शब्दाला पण सूर्याच्या आणि स्नेहाच्या असे दोन अर्थ आहे. म्हणून हे दोन्ही उदाहरणे श्लेष अलंकारामध्ये मोडतात.



२. अर्थालंकार
ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा वाक्याला शोभा येते त्या गुणधर्माला 'अर्थालंकार' असे म्हणतात.

अर्थालांकारातील काही महत्वाच्या संकल्पना

(अ) उपमान - ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट.

(ब) उपमेय - ज्याची कवी तुलना करतो तो

(क) साधर्म्य - दोन गोष्टीतील सारखेपणा

(ड) साम्यवाचक शब्द - दोन गोष्टीतील सारखेपणा दाखविणारा शब्द

उदा तिचे मुख चंद्रासारखे होते.

        मुख - उपमेय

        चंद्रा - उपमान

        सारखे - साम्यवाचक शब्द 



(i) उपमा अलंकार
ज्या वस्तूविषयी बोलायचे असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या दोन गोष्टीत साम्य पहिले जाते व ते सुंदर रीतीने दर्शविले जाते त्यास आपण 'उपमा अलंकार' असे म्हणतो.

उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात.

उदा. (१) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे. 

         (२) कविताचे डोळे हरणासारखे सुंदर आहेत.

वरील दोन्ही उदाहरणामध्ये आभाळा एवढी माया आणि डोळा हा हरणाच्या डोल्यासारखा अशी तुलना करून दाखवली आहे; अर्थातच एका शब्दाला दुसऱ्या शब्दासारखी उपमा दिलेली आहे म्हणून याला आपण उपमा अलंकार असे म्हणू .  


(ii) रूपक अलंकार 
जिथे उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे ते वेगवेगळे नाही असे वर्णन जिथे केलेले असते तेव्हा त्याला आपण 'रूपक अलंकार' असे म्हणतो.

उदा. (१) लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
        (२) देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर

वरील दोन्ही उदाहरणामध्ये लहान मुलगा व मातीची मूर्ती या मध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये मानवी देह हे देवाचे मंदिर यामध्ये साम्यता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.


(iii) अतिशयोक्ती
अलंकारात एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप बढवून चढवून किंवा ते व्याक्य फुगवून सांगितली जाते त्यास आपण 'अतिशयोक्ती अलंकार' असे म्हणतो.

उदा. (१) अरे राहुल तुला शोधायला सारा गांव पालथा घातला.
        (२) एक तीळ होता सात झणांनी खाल्ला.

वरील उदाहरणामध्ये बघितले असता राहुलला शोधण्यासाठी सर्व गाव पालथा घालणे असे म्हणजेच अतिशयोक्ती स्वरूपाचे आहे; त्याच प्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये एक तीळ हा सात झनांनी खाल्ला अशी अतिशयोक्ती दाखवली आहे.


(iv) स्वभावोक्ती अलंकार
एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे किंवा कुठल्याही घटकाच्या हालचालीचे किवा कृतीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते त्यावेळी त्या अलंकाराला 'स्वभावोक्ती अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) मातीत ते पसरले अति रम्य पंख |
             केले वरी उदर पांडूर निष्कलंक ||
             चंचू तशीच उघडी पद लांबविले |
             निष्प्राण देह पडला श्रम ही निघाले ||

        (२) गणपत वाणी विडी पितांना चावायची नुसतीच कडी अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी.

वरील पहिल्या उदाहरणामध्ये गतप्राण झालेल्या पक्ष्याचे वर्णन हुबेहूब सांगितले आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्ये कवीने गणपत वाण्याचे एक वेधक चित्र आपल्या काव्यात जसेच्या तसे रेखाटले आहे. म्हणून ही उदाहरणे स्वभावोक्ती अलंकारात मोडतात. 


(v) अन्योक्ती अलंकार
कोणत्याही व्यक्तीविषयी सरळ न बोलता त्या व्यक्तीविषयी दुसऱ्याला उद्देशून बोलून बोलणारा आपले मनोगत व्यक्त करतो तेव्हा त्या अलंकारास 'अन्योक्ती अलंकार किवा अप्रस्तुत अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

वरील उदाहरणामध्ये बोलणाऱ्याने समोरच्या व्यक्तीला बोलले आहे पण त्यात सरड्याचा उल्लेख केला आहे म्हणून हे उदाहरण अन्योक्ती अलंकारात मोडले जाते


(vi) उत्प्रेक्षा अलंकार
जेव्हा आपण २ वस्तूंची तुलना करतो तेव्हा त्या वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास 'उत्प्रेक्षा अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) तिचे मुख जणू चंद्रच |
        (२) त्याचे अक्षर जणू मोतीच.
        (३) अर्धपायी पांढरेशी विजार गम, विहगांतील बडा फौजदार.

वरील उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान यांचे परस्पर वर्णन केलेले दिसत आहे.
 
मुख-चंद्र , अक्षर- मोती, विजार-फौजदार अश्याप्रकारे म्हणून हे सर्व वाक्य उत्प्रेक्षा अलंकारात मोडतात.
 

(vii) अपन्हुती अलंकार
या अलंकारात एखादी वस्तू ही उपमेय नसून उपमानच आहे असा आरोप केला जातो तेव्हा त्यास 'अपन्हुती अलंकार' असे म्हणतात.

उदा (१) हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले ।
            ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे ।।
       (२) ते डोळे, नत्र छे ! विलासगृह की माहेर वीच्छक्तिचे

वरील पहिल्या उदाहरणामध्ये हृदय मूळ रूप नावावरून देठाशी फुललेल्या पारिजातकाचा आरोप झाला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये डोळे हे मुळ रूपावरून त्यावरती विलासगृहाचा वीच्छक्तिच्या माहेराचा काव्यात्मक आरोप झालेला दिसून येत आहे.


(viii) अनन्वय अलंकार
जेव्हा उपमेय आणि उपमान एकच असतात म्हणजेच जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही फक्त उपमानाची च उपमा द्यावी लगते तेव्हा त्यास 'अनन्वय अलंकार' असे म्हणतात.
        
उदा. (१) अर्जुनासारखा वीर अर्जुनच.
        (२) आई सारखी प्रेमळ आईच.

वरील दोन्ही उदाहरणामध्ये लक्षात येते की उपमेय आणि उपमान एक आणि एकच आहे त्याचे कोणाशीही तुलना न करता त्याची स्वतःच तुलना केली आहे म्हणून ही दोन्ही वाक्ये अनन्वय अलंकारात मोडतात.


(ix) व्यतिरेक अलंकार
जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास 'व्यतिरेक अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) सांज खुले सोन्याहून पिवळे, हे उन पडे.
        (२) अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.

वरील पहिल्या उदाहरणामध्ये उन हे उपमेय असुन तुलना सोन्याहून पिवळी अशी केली आहे तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये परमेश्वराचे नाम हे उपमेय असुन अमृताच्या गोडीशी त्याची तुलना केली गेली आहे.


(x) अर्थान्तरन्यास अलंकार
जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगून त्या गोष्टीचे समर्थन सामान्य गोष्टीने केलेले असते किंवा सामान्य गोष्ट सांगून त्या गोष्टीचे वर्णन महत्वाच्या गोष्टीने स्नागीतले गेले असते तेव्हा त्यास 'अर्थान्तरन्यास अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) एका हाते कधीतरी मुली वाजतेय काय टाळी ?
        (२) कठिण समय येता कोण कामास येतो ?


(xi) चेतन गुणोक्ती अलंकार
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन केले जाते त्यास 'चेतन गुणोक्ती अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करीना, काही केल्या फुलेना
 

वरील उदाहरणामध्ये निर्जीव वस्तूवर ती सजीव असल्याचे वर्णन केले आहे चाफा हा बोलत नसतो, चालत नसतो तरी देखील त्याची एका व्यक्ती प्रमाणे तुलना केलेली दिसत आहे. म्हणून हे उदाहरण चेतन गुणोक्ती अलंकारात मोडते.


(xii) दृष्टांत अलंकार
विशिष्ट विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्यास 'दृष्टांत अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा |

वरील उदाहरणामध्ये लहानपण किती चांगले असते हे पटवून देताना मुंगीला राखारेचा रवा खायला मिळतो हे उदाहरण देऊन लहानपणाचे श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


(xiii) सार अलंकार 
एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या विशिष्टतेचे आणि आकर्षणाचे क्रमाक्रमाने चढत जाणारे वर्णन जेव्हा केलेले असते तेव्हा त्या अलंकारास 'सार अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) विदयेविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तवीना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविदयेने केले.

वरील उदाहरणामध्ये कवींच्या विचारातून शिक्षणाच्या अभावामुळे कशी नितीमत्ता, गती, वित्त यामुळे शुद्र खचून गेलेले आहेत; हे शिक्षणाचे महत्व सांगतांना उत्कर्ष व उपकर्ष मांडलेले आहे.


(xiv) व्याजोक्ती अलंकार
जेव्हा एखाद्या व्याक्यामध्ये एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला 'व्याजोक्ती अलंकार' असे म्हणतात. (व्याज + उक्ती = खोटे बोलणे) 
 
उदा. (१) येता क्षेण विभोणाचा, पाणी नेत्रामध्ये दिसेल, डोळ्यात काय गेले ?

वरील उदाहरणामध्ये डोळ्यात पाणी का आले याचे खरे कारण न सांगता डोळ्यात काही तरी गेले काय असे दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून हे वाक्य व्याजोक्ती अलंकारात मोडले जाते.


(xv) व्याजस्तुती अलंकार
जेव्हा एखाद्या वाक्यात बाहेरून स्तुती पण आतून निंदा केली जाते किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती केली गेली असे वर्णन होते तेव्हा त्यास 'व्याजस्तुती अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडो असा बरवा, सुगरन तु खरी 
 

वरील उदाहरण बघितले असता या व्याक्यात काही प्रमाणात स्तुती तर काही प्रमाणात निदा झाल्यासारखी वाटते म्हणून हे उदाहरण व्याजस्तुती अलंकारात मोडते.


(xvi) असंगती अलंकार
ज्या वाक्यामध्ये कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन केलेले असते तेव्हा त्याला 'असंगती अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) गुलाब माझ्या हृदयाशी फुलला , रंग तुझ्या गाली खुलला.

वरील उदाहरणामध्ये गुलाब हा एकाच्या हृदयाशी फुललेला असताना त्याचा रंग मात्र दुसऱ्याच्याच गाली उमटलेला दिसतो आहे म्हणून हे वाक्य असंगती अलंकारात मोडले जात आहे.


(xvii) ससंदेह अलंकार
जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशी व्दिधा अवस्था निर्माण होते तेव्हा त्यास 'ससंदेह अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) गालावरल्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जि विलसतसे गाली.

वरील उदाहरणामध्ये गालावरल्या कुसुमी आहे की कुसुमांच्या गाली आहे हे स्पष्ट न समजता २ पैकी १ उपमेय आणि १ उपमान आहे असे वाटत आहे म्हणून हे वाक्य ससंदेह अलंकारात मोडते


(xviii) विभावना अलंकार
जेव्हा योग्य कारणावाचून कर्त्याची उत्पत्ती झाली असे दिसते किंवा असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास 'विभावना अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) न ताप निवला, तृष्णा न शमली, रजे माखले शरीर, अजुनी नसे कमळ एकही चाखले.

वरील उदाहरणामध्ये वेगवेगळ्या वर्णानातून किंवा करणातून कर्त्याची भूमिका निर्माण झालेली दिसून येते व त्यातून कर्त्याची उत्पत्ती झाली असा अंदाज येतो म्हणून हे वाक्य विभावना अलंकारात मोडते.


(xix) विरोधाभास अलंकार
एखाद्या वाक्यामध्ये वर वर पहिले असता विरोध झालेला दिसतो परंतु वास्तविक पाहता तशा प्रकारचा विरोध हा नसून तो केवळ त्या ठिकाणी विरोध झाल्याचा भास असतो त्यास आपण 'विरोधाभास अलंकार' असे म्हणतो.

उदा. (१) मरणात खरोखरच जग जगते.
        (२) सर्वच लोक बोलू लागले की, कोणीच ऐकत नाही.

वरील उदाहरणामध्ये पहिल्या वाक्यात मारणे आणि जगणे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने विरोधाचा आभास होतो तर दुसऱ्या उदाहरणामध्ये बोलणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टीत विरोधाचा आभास होतो म्हणून हे दोन्ही उदाहरणे विरोधाभास अलंकारात मोडले जातात.


(xx) भ्रांतीमान अलंकार
जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती बघितल्यावर तिच्याचसारखी दुसरी वस्तू किंवा व्यक्ती दृष्टीस पडली तर ही दुसरी वेळा बघितलेली वस्तू किंवा व्यक्ती अगोदर बघितलेली आहे असा भ्रम होतो तेव्हा त्यास 'भ्रांतीमान अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) गगनाकडे पाहता आली बहुताजनासी अभ्रमती , जेव्हा पक्षी बाणव्याप्ताशोदरात न भ्रमती.

वरील उदाहरणामध्ये कर्णाला मारण्यासाठी अर्जुनाने एकदम भरपूर बाण आकाशात सोडले. परिणामी सर्व आभाळ झाकून गेले संपूर्ण आकाश झाकल्याने संपूर्ण संध्याकाळ झाल्याचा लोकांना भ्रम झाला. पक्षीदेखील संध्याकाळ झाली या भ्रमात घरट्याकडे परतले याची जाणीव झालेली दिसते.


(xxi) विशेषोक्ती अलंकार
जेव्हा एखादे कार्य घडण्यासाठी आवश्यक ते कारण उपस्थित असूनही कार्य घडत नाही असे वर्णन जेथे होते तेव्हा त्यास 'विशेषोक्ती अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) अहो नयन चांगले असूनही दिसे ना मला मुका नसूनही तोतरा सहज बोलवेना मला.
 

वरील उदाहरणामध्ये डोळे चांगले असूनही गोष्टी पाहिण्याच्या राहिलेल्या आहेत मुका नसतांना तोतरा झाल्याचे जाणवते. म्हणजेच आवश्यक ती साधनसामग्री असूनही त्याचा योग्य वापर करता येत नाही याच दुख: या वाक्यात रेखाटले आहे. 


(xxii) पर्यायोक्ती अलंकार
जेव्हा एखादी गोष्ट सरळ सरळ शब्दात न सांगता ती गोष्ट अप्रत्यक्ष किंवा गोल गोल फिरवून सांगितली जाते तेव्हा त्यास 'पर्यायोक्ती अलंकार' असे म्हणतात.

उदा. (१) काळाने त्याला आमच्यापासून हिरावून घेतले, त्याचे मामा सासरचा पाहुणचार घेत आहे.

वरील उदाहरण बघितले असता असे लक्षात येत आहे की तो मेला आहे आणि त्याचे मामा हे तुरुंगात आहे. या वाक्यात सरळ सरळ न सांगता अप्रत्यक्ष पणे ते दुखद गोष्ट या वाक्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हे वाक्य पर्यायोक्ती अलंकारात मोडले जाते.






उत्तर लिहिले · 24/6/2022
कर्म · 48465

Related Questions

अलंकार म्हणजे काय ते सांगुन अलंकाराचे प्रकार लिहा?
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अलंकार कोणता?
अलंकाराचे प्रकार कोणते आहे?
आईचा‌ दागिना कोणता?
मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याची वरील काव्यपंक्तीतील अलंकार कोणता येईल?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
अमृताहुनी गोड नाम तुझे अलंकाराची वैशिष्ट्ये कोणती?