1 उत्तर
1
answers
बाबर ने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केलेले आहे?
3
Answer link
बाबरने त्याच्या आत्मचरित्रात त्याला कराव्या लागलेल्या युद्धांचे वर्णन, त्याने केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था व रितीरिवाज व वनस्पती सृष्टी यांचे निरीक्षण यांचे वर्णन
केले
if want to write it in points n maka it
'मुघल सम्राट बाबर' याने केलेले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनातील सर्व घडामोडींची नोंद त्यांच्या आत्मचरित्रात केलेली आहे. 'तुजुक-ए-बाबरी' हे त्याच्या आत्मचरित्राचे नाव आहे. बाबर यांचे पुर्ण नाव 'जहीरुद्दीन मोहम्मद बाबर' असे आहे. तसेच त्याच्या वडिलांचे नाव 'उमर शेख मिरजा' होते आणि आईचे नाव 'कुतलग गिनार खानम असे होते....बाबर हा त्याच्या आईकडून चंगेज खानचा तसेच वडिलांकडून तैमुर-ऐ-लंग चा वंशज होता.
बाबर यांनी त्याच्या आत्मचरित्राचे संपुर्ण लिखाण त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच 'चगताई' भाषेत केलेले आहे 'चगताई' भाषा ही बाबरची मातृभाषा 'तुर्की' भाषेचे जुने स्वरुप आहे.
'तुजुक-ऐ-बाबरी' चे भाषांतर नंतरच्या काळात 'मुघल सम्राट अकबर' यांनी केले. अकबरने त्याच्या पदरी असलेल्या 'अब्दुल रहीम खान-ऐ-खाना' यांच्या मदतीने तुजक- ऐ - बाबरीचे भाषांतर चगताई मधून फारशी भाषेत केले. सुरवातीला 'बाबरनामा' मध्ये चित्रांचा समावेश नव्हता....बाबने त्यामध्ये कोणतेही चित्र रेखाटले नव्हते, परंतु नंतरच्या काळात अकबरने परदेशातील तसेच स्थानिक चित्रकारांच्या मदतीने सुंदर चित्रे रेखाटली, या सुंदर चित्रांमुळे 'बाबरनामा' ला अद्वितीय असे स्वरुप प्राप्त झाले. ही चित्रे बाबरनामा मधील घटना-प्रसंग अधिक सुस्पष्ट करतात.
बाबरनामामध्ये बाबरने त्यांच्या बालपणीच्या तसेच फरगणा मधील त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या जीवनातील अनेक खडतर प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. फरगणा हे सध्या उझबेकिस्थान मध्ये आहे, अफगाणिस्थान काबुल मधील मोहिम व भारतीय उपखंडातील मोहिमा यांची सुद्धा माहिती यामध्ये आढळते. बाबरने त्यांच्या एकूण प्रवासातील जवळपास प्रत्येक प्रदेशातील अर्थसत्ता, राजकारण,वातावरण, शहरे, इमारती, फळे, फुले तसेच प्राण्यांचे वर्णन केलेले आहे. भारतामध्ये सत्ता स्थापन करताना आलेले अडथळे व संघर्ष यांची यथायोग्य माहिती बाबरनामामध्ये वर्णन केलेली आहे.
त्यामुळे बाबरनामाची प्रसंशा अनेक विद्वानांनी केलेली आहे. अनेकांनी बाबरच्या बाबरनामाची तुलना गिबन आणि न्युटनच्या आत्मचरित्राशी केलेली आहे. एखाद्या प्रतिभावंत लेखकाने लिहावी तशी बाबरने त्याच्या आत्मचरित्राची रचना केलेली आहे. तसेच बाबरनामा हा इतिहासाचा अभ्यास करताना प्राथमिक साधन म्हणून महत्वाचे ठरते कारण बाबरनामा हा बाबरने स्वतः लिहलेला आहे त्यामुळे त्याला प्राथमिक साधनाचा दर्जा प्राप्त होतो. बाबरनामा मधून आपल्याला बाबरविषयी तसेच बाबरच्या समकालीन घटनांचे तसेच बाबरकालीन लोकजीवनांची माहिती मिळते, त्यामुळे बाबरनामा हे प्राथमिक साधन म्हणून फार महत्वाचे आहे. इतिहासकारांना इतिहास अभ्यासताना प्राथमिक साधनांची खुप मदत होते तसेच प्राथमिक साधने ही अधिक विश्वसनीय असतात.
आज या लेखात आपण 'बाबरनामा' या आत्मचरित्राबद्दल जाणून घेऊयात तसेच बाबरनामामधील राजकीय, सामाजिक,आर्थिक परिस्थिती समजून घेऊयात आणि बाबरनामा या ग्रंथाची लेखनशैली जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात, यामधून आपल्याला बाबरच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात माहिती मिळण्यास मदत होईल.
बाबरने लिहलेला बाबरनामा हा खुप प्रसिद्ध तसेच कौतुकास्पद ग्रंथ आहे ,अनेक विचारवंतांनी व विद्वानांनी बाबरच्या आत्मचरित्राची तुलना न्युटन व गिबन यांच्या आत्मचरित्राशी केलेली आहे तसेच बाबरने त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक खडतर प्रसंगांना अगदी मुत्सद्देगिरीने तोंड दिले तसेच तो मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. या सर्वांमुळे बाबरच्या एकूणचं जीवनप्रवासाबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते, म्हणून आजच्या या लेखात आपण बाबरनामा विषयी जाणून घेऊयात
'बाबरनामा'चे प्राथमिक साधन म्हणून महत्व
इतिहास अभ्यासताना सर्वप्रथम गरज असते ती साधनांची. साधनांशिवाय आपण इतिहासाची कल्पनाच करु शकत नाही. इतिहासामध्ये साधनांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. साधने ही तीन प्रकारची असतात. प्राथमिक साधने, दुय्यम साधने आणि तृतीय साधने...या साधनांचा आधार घेऊनचं इतिहासकार इतिहास रचतात. तिन्ही प्रकारच्या साधनांमधून सर्वात महत्वाचे साधन म्हणजे प्राथमिक साधन होय. बहुतांश इतिहास हा प्राथमिक साधनांच्या आधारेच लिहला जातो कारण प्राथमिक साधने ही अधिक विश्वसनीय असतात. याचे कारण असे की प्राथमिक साधने ही समकालीन असतात, त्यामुळे ते तत्कालीन यथायोग्य माहिती पुरवतात. दुय्यम साधने ही प्राथमिक साधनांचा वापर करुन निर्माण करण्यात आलेली असतात,त्यामुळे त्यांचा दर्जा कमी होतो परंतु दुय्यम साधनांचे महत्व आपण नाकारुन चालत नाही. बखरी, शकावली ही दुय्यम साधनांची ऊदाहरणे आहेत.
बाबरनामा हा ग्रंथ स्वतः बाबरने लिहला आहे त्यामुळे ते प्राथमिक साधन ठरते. बाबरनामा या ग्रंथाचे प्राथमिक साधन म्हणून खुप महत्व आहे कारण बाबरनामामुळे आपल्याला बाबरच्या समकालीन इतिहासाची माहिती मिळते जसे की बाबरचे बालपण, बाबरच्या लहानपणीच्या त्याच्या आठवणी बाबर हा कमी वयामध्ये राजा झाल्यावर बाबरचे अनुभव यांची माहिती मिळते यामुळे 'बाबरनामा' ग्रंथाला प्राथमिक साधन म्हणून महत्व प्राप्त होते, तसेच बाबरनामामध्ये बाबरच्या वैयक्तिक जीवनाविषयी माहिती प्राप्त होते. बाबरच्या राजकीय,सामाजिक आणि आर्थिक विचारांची माहिती सुद्धा आपल्याला यातुन मिळते. बाबरच्या लष्करी मोहिमा फार प्रसिद्ध आहेत. या सर्व मोहिमांबद्दलचे वर्णन बाबरनामा मध्ये आलेले आहे. जसे की बाबरने भारतात सत्ता स्थापन करण्यापुर्वी पानिपतची महत्वपुर्ण लढाई केली. त्या लढाईचे वर्णन 'बाबरनामा' मध्ये बाबरने केले आहे. तसेच बाबरने त्याच्या प्रवासात जे जे नवनविन प्रदेश पाहिले,त्या प्रदेशाची रचना निसर्ग, तेथील भौगोलिक परिस्थिती, वातावरण यांची सुद्धा यथायोग्य माहिती बाबरने त्याच्या आत्मचरित्रात दिलेली आहे.
बाबर हा सर्वप्रथम फरगणाचा राजा बनला तेथुनच त्याचा राजकिय प्रवास सुरु झाला. फरगणानंतर समरकंद जिंकण्याचे बाबरचे स्वप्न होते. समरकंद जिंकल्यानंतर बाबने अफगाणिस्थान मधील काबुल वर स्वारी केली आणि तिथला भुप्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला व तेथे स्वतःची सत्ता स्थापन केली, तेथून नंतर बाबरची दुरदृष्टी भारतावर पडली, भारतातील अमाप संपत्तीचे वर्णन बाबर ऐकून होता त्यामुळे भारतातील भुप्रदेश जिंकण्याची त्याची इच्छा झाली. त्यामुळे बाबर हिंदकुश मधून भारतात आला आणि त्याने भारतातील इब्राहीम लोधीचा पराभव करुन सुल्तानशाहीचा अंत केला व भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. या सर्व प्रवासाचे वर्णन बाबरने त्याच्या आत्मचरित्रात केलेले आहे व या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक गोष्टीचे वर्णन बाबरने यथायोग्य केले आहे. बाबरने प्रत्येक प्रदेशातील प्राण्यांचे, फळांचे,फुलांचे आणि पक्ष्यांचे वर्णन केले आहे. या सर्व वर्णनांमुळे आपल्याला तत्कालीन जैविक व भौगोलिक घटकांची माहिती मिळते. यामुळे सुद्धा बाबरनामा हा प्राथमिक साधन म्हणून महत्वाचा ठरतो.
बाबरने ज्या-ज्या ठिकाणी मुक्काम केला किंवा त्याला ज्या प्रदेशातील वस्तु विलोभनीय वाटल्या त्या-त्या वस्तुंचे वर्णन बाबरने आत्मचरित्रात केले आहे. त्यामुळे आपल्याला तत्कालुन घरे,राजवाडे यांची रचना तसेच मंदीर, मस्जिद यांची रचना कळण्यास मदत होते तसेच या सर्व वास्तुंवरील नक्षीकाम, कोरीवकाम यांची सुद्धा माहिती मिळते. थोडक्यात आपल्याला बाबरनामामुळे तत्कालीन वास्तुकलेची माहिती मिळते.
बाबर आणि सुलतान मिर्झा भेट
बाबरनामामध्ये बाबरने आपल्या पदरी असलेल्या तसेच त्याच्या वडिलांच्या पदरी असलेल्या अनेक अमीर उमरावांचा उल्लेख व वर्णन केलेले आहे. आमीरांचे वर्णन करताना बाबर त्या आमीरांचे स्वभावगुण , आवडते छंद, केशभुषा-वेशभुषा या सर्वांचे अगदी प्रामाणिकपणे वर्णन करतो. यावरुन आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेता येतो. तसेच बाबरने गुलामांच्या खरेदीचा देखील उल्लेख केला आहे. तो म्हणतो की, गुलाम बाळगणे हे प्रतिष्ठेचे प्रतिक मानले जात असे आणि प्रत्येक अमीर आपल्या जवळ अनेक गुलाम बाळगत असत. या सर्व वर्णनांवरुन आपल्याला तत्कालीन सामाजिक स्थिती तसेच गुलामांची स्थिती यांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे बाबरनामा हा महत्वाचा ठरतो व प्राथमिक साधन म्हणून त्याला अधिक महत्व प्राप्त होते.
बाबरनामाची लेखनशैली
बाबरने त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच तुर्की भाषेचे जुने स्वरुप चगताई भाषेत लिहलेले आहे. त्यामुळे सर्व बाबींचे वर्णन करणे शक्य झाले. बाबरने सर्व परिस्थितीचे वर्णन यथायोग्य व प्रामाणिकपणे केले असे दिसते. सामाजिक, राजकिय, आर्थिक तसेच भौगोलिक अशा सर्वच बाबतीत वर्णन बाबरने केले आहे...
सामाजिक बाबी लिहताना बाबरने अनेक व्यक्तींची त्यांच्या स्वभावगुणांची, त्यांच्या छंदांची, त्यांच्या वेषभुषेची, केशभुषेची, दागदागिण्यांची माहिती दिली आहे. तसेच समाजामध्ये गुलाम बाळगण्याची प्रथा होती व गुलाम बाळगणे प्रतिष्ठतेचे प्रतिक मानले जात असे यामुळे सर्व आमीर गुलाम बाळगत असत. अशाप्रकारे सामाजिक बाबतींचे वर्णन करताना बाबरने सर्व घटकांना सामावून घेतलेले दिसुन येते.
राजकीय बाबतीत सुद्धा बाबरने प्रामाणिकपणे वर्णन केलेले दिसते. त्याने त्याच्या वडिलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांची सुद्धा माहिती दिलेली आहे, तसेच समरकंद, आंदिजान, बुखारा , फरगणा व नंतर आफगाणिस्थान आणि भारतात येईपर्यंत व भारतात आल्यानंतर सर्व राजकिय घडामोडींची यथायोग्य माहिती व स्वतःची भुमिका मांडली आहे व या सर्वांचे सत्ता स्थापन करण्यात झालेली मदत यांचे वर्णन बाबरने केले आहे. यावरुन असे दिसते की, बाबरने अनेक राजकीय बाबींचे वर्णन अगदी तटस्थपणे केलेले आहे.
भौगोलिक, जैविक व निसर्ग या सर्व बाबींकडे बाबरने खास लक्ष केले होते असे दिसते. कारण बाबरने त्याच्या जीवनात ज्या -ज्या वास्तु , भौगोलिक रचना, नैसर्गिक रचना बघितल्या त्या त्या सर्व रचना बाबरने वर्णिले आहे. जसे बाबरने भारतात आल्यावर भारतातील निसर्गाचे वर्णन केले आहे तसेच यथायोग्य वर्णन बाबरने त्याच्या मायदेशी असलेल्या पर्वतांचे, नद्यांचे,भौगोलिक विविधतेचे केले आहे, तसेच जैविक घटकाचे वर्णन बाबरने केले आहे. जैविक घटकांचे वर्णन करताना बाबर म्हणतो की, फरगणामध्ये फळे,धान्य खुप मोठ्या प्रमाणात आहे, आंदिजान मध्ये अंगुर आणि कलिंगड विपुल प्रमाणात आहे आणि खुपच चविष्ट आहे असे नमूद करायला बाबर विसरत नाही. मरगेनान मधील डाळिंब खुप स्वादिष्ट आहे असे बाबर म्हणतो.
तसेच या वातावरणाबद्दल लिहताना बाबर म्हणतो की, फरगण्यामध्ये खुप नद्या आहेत, त्यामुळे या प्रदेशात मुबलक प्रमाणात पाणी आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे हा प्रदेश राहण्या योग्य आहे तसेच या प्रदेशातील वसंत ऋतू खुपचं सुखदायक आहे असे तो म्हणतो. तसेच येथील आंदिजान नदीच्या किनारी खुप बागा आहेत आणि या बागा गुलाबाच्या फुलांनी बहरलेल्या आहेत असे बाबर म्हणतो. यावरून आपल्या लक्षात येते की, बाबरला फळे, फुले, नद्या, निसर्ग यांचे आकर्षण आणि कुतूहल होते, त्यामुळे बाबरने निसर्गाचे, वातावरणाचे वर्णन इतक्या सुंदरपणे केले आहे.
बाबरचे हे निसर्गप्रेम त्याच्या अनेक वर्णनांवरुन दिसून येते. बाबरने त्याच्या आत्मचरित्रात प्राण्यांची देखील विशेष दखल घेत त्यांचे सुद्धा महत्व अधोरेखित केल्याचे दिसून येते. बाबर बाबरनामा मध्ये प्राण्यांविषयी लिहताना म्हणतो की, आंदिजान मध्ये शिकार करण्यायोग्य प्राणी भरपुर आहेत, बाबर म्हणतो की, आंदिजान मध्ये हरेल हा पक्षी शिकारीसाठी खुप प्रसिद्ध आहे आणि हरेल हा पक्षी अंगाने सुदृढ असल्यामुळे त्याच्या शिकारीनंतर ३-४ माणसांचे पोट नक्की भरेल, असे बाबर नमुद करतो. तसेच आंदिजान मधील जंगली हरिण व चिमण्यांमध्ये सुद्धा भरपुर मांस असल्याचे बाबर म्हणतो.
वरिल सर्व वर्णनांवरुन आपणाला असे म्हणता येईल की, बाबरचे निरिक्षण कौशल्ये ही अप्रतिम होती. तसेच बाबरच्या लिखाणामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, भौगोलिक असे सर्व अंग दिसतात. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेऊन बाबरने त्याचे लिखाण केल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणाला असे म्हणता येईल की, बाबरचे लिखाण हे सर्वसमावेशक अशा पद्धतीचे होते , त्यामुळेच तर अनेक विद्वानांनी व विचारवंतांनी बाबरच्या आतामचरित्राची तुलना गिबेन व न्युटनच्या आत्मचरित्राची केलेली दिसुन येते, वरिल सर्व बाबींवरुन आपल्याला बाबरच्या लेखनशैलीचे परिक्षण करता येते.
भारताविषयी बाबर लिहतो की, "भारतातील नगरे अत्यंत घाणेरडी आहेत,जमीन व नगरे सर्वत्र सारखी व सपाट आहेत, हिंदुस्थानात आल्हाददायक असे फार थोडे आहे. येथील लोक सुंदर नाहीत, त्यांना मित्रांच्या गोड सहवासाचे आकर्षण नाही, येथील लोकांत विद्वत्ता, दया, मित्रत्व, तंत्रकौशल्य, शोधकवृत्ती माणूसकी नाही. कोणत्याही कामासाठी मजूर मुबलक प्रमाणात मिळतात. पावसाळ्यात येथील हवा आल्हाददायक असते. हिंदुस्थानचे वैशिष्ट म्हणजे सोने,चांदी असलेला विशाल प्रदेश होय."
बाबरने भारताचे केलेले वर्णन दोषदर्शक आहे, भारतातील बाबरचे वास्तव देखील फार कमी आहे. बाबरचा भारतात जास्त संबंध हा अफगाण्यांशीच आला, त्यामुळे त्याला भारताविषयी जास्त माहिती नसावी. परंतू बाबरने केलेले वर्णन हे पुर्णपणे खोटे देखील नाही, कारण अशी परिस्थिती भारतात काही प्रमाणात होती असे मत लेनपुल यांनी मांडले आहे. या सर्व माहितीवरुन बाबरच्या लेखनशैलीचे अनेक पैलू आपल्याहमोर येतात व बाबरची लेखनशैली ही त्याने केलेल्या वर्णनावरून तटस्थ वाटते, कारण अनेक बाबतीत बाबरने गुणांचे आणि दोषांचे देखील वर्णन केलेले आहे.
'बाबरनामा'ची वैशिष्ट्ये
'बाबरनामा' या ग्रंथाची वैशिष्ट्ये सांगायची म्हंटल्यावर ती आपल्याला अनेक बाबींच्या माध्यमातुन करता येतात, बाबरनामामध्ये समाजातील तसेच निसर्गातील प्रत्येक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, हे बाबरनामाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक महत्वाच्या व्यक्तींची माहिती म्हणजेच त्या व्यक्तीचे स्वभावगुण, व्यक्तीचे धंद, केशभुषा तसेच वेषभुषा अशा अशेक बाबींचे वर्णन आहे, तसेच बाबरने भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, निसर्ग, वातावरण, ऋतूमान तसेच त्या प्रदेशातील हवामान, तेथे येणारी फळे, फुले, झाडे यांचे सुद्धा वर्णन बाबरने केलेले आहे.
बाबरने स्थापत्यकलेविषयी खुप लिहले यावरुन बाबरच्या स्थापत्याविषयी आवड असावी असे म्हणता येईल. जेव्हा बाबर हा समरकंद मध्ये होता , तेव्हा तेथे अमीर तैमुर यांच्या अनेक इमारती होत्या , बाबरला या इमारतींविषयी विशेष कुतूहल वाटे. त्या इमारतींबाबत बाबर लिहतो की, या शहरामध्ये अनेक इमारती आहेत तसेच खुप सा-या बागा आहेत. या बागांमुळे इमारती अधिक शोभून दिसतात. तसेच येथे एक चार मजली महल आहे व तो महाल 'गोकसराय' नावाने प्रसिद्ध आहे. तसेच एक जामा मस्जिद देखील आहे जी पुर्णपणे दगडांनी बनलेली आहे आणि ही मस्जिद बनवणारे कारागीर हे भारतातील आहे असे बाबर म्हणतो. बाबरने स्नानकुंडाचा देखील उल्लेख केलेला आहे, 'उलूगबेग मिरजा' म्हणजेच बाबरचे काका यांच्या इमारती मध्ये मठ व मदरसा होता व जवळच एक मोठे स्नानकुंड होते, असे बाबर म्हणतो. स्नानकुंडामध्ये शोभेसाठी अनेक प्रकारची दगड व रत्ने लावलेली आहेत. असा कुठलाही दगड नाही, जो स्नानकुंडामध्ये लावलेला नाही व अशाप्रकारचे स्नानकुंड संपुर्ण समरकंद मध्ये पाहायला मिळणार नाही. अशाप्रकारे बाबर आपल्या काकांच्या स्नानकुंडाचे वर्णन करतो.
बाबरनामाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे या मधील सर्व दिनांक या हिजरी वर्ष कालगणनेनुसार देण्यात आलेल्या आहेत. हिजरी वर्ष कालगणनेनुसार बाबरचा जन्म हा ६ मोहरम ८८८ हिजरी म्हणजेच १४ फेब्रुवारी १४८६ रोजी झाला. हिजरी वर्ष गणना ही मुहम्मद पैगंबर यांच्या 'हिजरत' म्हणजे मदिना प्रवासाच्या प्रस्थानापासुन सुरु होते म्हणजे १६ जूलै ६२२ ई. पासुन हिजरी वर्षगणना चालू झाली. हिजरी वर्षगणनेमध्ये वर्ष हे ३५४ दिवसांचे तर महिना ३० दिवसाचा असतो. हिजरी वर्षगणनेनुसार तारखा हे देखील बाबरनामाचे एक वैशिष्ट्य आहे.
बाबरनामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाबरनामामध्ये ऊल्लेख केलेल्या ब-यापैकी व्यक्तींच्या आवडी-निवडी , त्यांचे स्वभावगुण, त्यांचे सदगुण, त्यांचे दुर्गुणांचे यथायोग्य वर्णन बाबरने 'बाबरनामा' मध्ये केले आहे. जसे की बाबर स्वतःच्या वडिलांचे 'उमर शेख मिर्झा' यांचे वर्णन करताना म्हणतो की, ते फार महत्वकांक्षी व शुरवीर होते. तसेच ते दयावान, दाणी व उदार मनाचे होते. त्यांच्या बोलण्यात मृदूपणा होता तसेच बाबर म्हणतो की, त्यांच्या वडिलांची उंची लहान होती. दाढी अगदी दाट असायची, शरीर खुप भारी होते, चेहरा चापट होता व कपडे नेहमी चांगल्या प्रतीचे असायचे असे बाबर म्हणतो. तसेच तो त्यांच्या वडिलांच्या पदरी असलेल्या अनेक अमीरांचे वर्णन करतो, त्यातील एक ऊदाहरण म्हणजे 'अलीमजिद बेग कुचिन' हा बाबर यांच्या वडिलांच्या पदरी असलेला अमीर होता. त्याचे वर्णन करताना बाबर म्हणतो की, हा खुप द्वेषी, लालची, नालायक, फितुर आणि ढोंगी होता. अशाप्रकारे बाबर हा व्यक्तींचे वर्णन खुप बारकाईने करतो. या सर्व वर्णनावरून आपल्याला बाबरची व्यक्तीविशेष स्पष्ट करण्यातील हातोटी दिसुन येते.
बाबरचा राजकीय प्रवास
बाबरचा जन्म हा फरगणामधील आंदिजान मध्ये झाला, बाबरचे बालपण हे आंदिजान मध्येच गेले. सध्या आंदिजान हे उझबेकिस्थान मध्ये स्थित आहे. बाबर हा 'बारसाल' जमातीचा होता. या जमातीचे मुळ 'मंगोल' आहे , त्यामुळे बाबर व त्याचे सहकारी स्वतःला 'चंगेज खान'ने वंशज समजत असे.
बाबरचे वडील 'उमर शेख मिरजा' यांना कबुतरांची फार आवड होती. एके दिवशी ते कबुतरांना दाणा टाकत असताना अचानक कबुतरखाना त्यांच्या अंगावर कोसळला व ते ते दरीत कोसळले, या अपघातात १४९४ साली त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर फरगणाची गादी रिकामी झाली होती त्यामुळे बाबर हा फरगणाचा राजा झाला. कारण बाबर हा त्याच्या भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. बाबर यांच्या वडिलांना पाच मुले होती, त्यापैकी ३ मुले आणि २ मुली होत्या. बाबर जेव्हा फरगण्याच्या गादीवर बसला होता तेव्हा त्याचे वय हे अवघे अकरा वर्षे होते.त्यामुळे त्याला राजकारणाचा तितकासा अनुभव नव्हता. अशा वेळेस बाबरच्या राजपदाला धोका निर्माण झाला होता. कारण बाबर हा वयाने लहान असल्याकारणाने त्याच्या काकांकडून बाबरला राजपदावरुन काढण्याचा कट आखण्यात येत असे, अशा कटकारस्थानामुळे बाबरचे राजपद धोक्यात आले. परंतु बाबर यांची आज्जी 'दौलत बेगम' यांच्या प्रयत्नांमुळे बाबर राजपद स्थिर झाले.
आपण एक महत्वकांक्षी राजा आहे, असे बाबरला सिद्ध करायचे होते. त्यामुळे त्याने समरकंद वर स्वारी करायचे ठरविले. या स्वारीसाठी बाबरने खुप तयारी केली व पुर्ण तयारीनिशी १४९७ साली समरकंद वर स्वारी करुन बाबरने समरकंद जिंकले. जेव्हा बाबरने समरकंद वर विजय मिळवला तेव्हा बाबरचे वय अवघे १५ वर्ष होतो. यावरुन आपल्याला बाबरची कमी वयातील प्रगती दिसुन येते. नंतरच्या काळात समरकंद मध्ये वारंवार बंड होत असे, यामुळे बाबरचे समरकंद वरील नियंत्रण सुटले व या नंतर अवघ्या १०० दिवसांतच फरगणा सुद्धा बाबरच्या हातातुन गेले यामुळे बाबर खुप निराश झाला परंतू त्याने हार मानली नाही. बाबरने पुन्हा १५०१ साली पुन्हा नव्या उमेदीने समरकंद वर स्वारी केली , परंतु बाबरच्या या प्रयत्नांना यश आले नाही. यावेळी 'मुहम्मद शैबानी' कडून बाबरचा पराभव झाला. यानंतर बाबरने फरगणा जिंकण्याचे ठरविले पण बाबरचा हा प्रयत्न देखील फसला. अशा पाठोपाठ होणा-या पराभवाने त्रस्त होऊन बाबरने एक निर्णय घेतला, तो निर्णय असा की काही काळ अशा जीवनापासुन संन्यास घ्यावा. त्यामुळे बाबर डोंगर, द-यांमध्ये जमाती बरोबर राहु लागला. येथे बाबरने काही काळ विश्रांती घेतली व पुन्हा लष्कर बांधनीस सुरवात केली. लष्कर बांधणीनंतर बाबरने पुन्हा समरकंद आणि फरगणावर स्वारी केली या वेळी बाबरला यश आले.
१५०४ मध्ये बाबरने लष्कर बांधणी करुन बर्फाच्छदित हिंदकुश पर्वातामधून अफगाणिस्थान मध्ये प्रवेश केला आणि नंतर काबुल जिंकले. हा विजय बाबरच्या सत्तास्थापनेमधील महत्वाचा विजय होता. काबुल पाठोपाठ बाबरने हिरात, कंदाहार जिंकून घेतले. या सर्वांमुळे बाबरला सत्तास्थापनेत मोठी मदत झाली. १५०५ मध्ये बाबरने भारतातील प्रदेशावर स्वारी करण्याचा मनसुबा आखला. त्याने भारतावर स्वारी करण्यासाठी सक्षम लष्कराची निर्मिती केली व त्यासाठी त्याला अनेक वर्षे लागली. अखेरीस त्याने दिल्लीच्या सुल्तानशाहीवर हल्ला चढविला.
पानिपतचे पहिले युद्ध: बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी
१५२६ मध्ये बाबरने सरहिंदमार्गे त्याचे लष्कर एप्रिल महिन्यात पानिपतला पोहचले. पानिपतावर बाबरचे लष्कर आणि इब्राहिम लोधीच्या लष्करासमोर उभे ठाकले. या युद्धामध्ये बाबरने तुलुगामा युद्ध तंत्राचा वापर केला. पानिपत व यमुना यांमध्ये बाबरच्या लष्कराचा तळ होता, या तळाचे तोंड दक्षिणेकडे होते. पानिपत व यमुना यांच्यामुळे बाबरच्या लष्कराचे अनुक्रमे पश्चिम व पुर्वेकडून रक्षण झाले. समोरून म्हणजेच दक्षिणेकडून होणारा हल्ला थोपावण्यासाठी बाबरने बैलगाड्यांचे कुंपन केले होते. बाबरने सुमारे ७०० मालवाहू बैलगाड्या रांगेत ठेवून गटागटाने त्यांची चाके एकमेकांना झाडाच्या सालीने व चर्मदोराने बांधली, बैलगाड्यांचे असे अनेक गट पाडले होते. या गटांमध्ये आघाडीच्या घोडस्वारंसाडी थोडी मोकळी जागा सोडली होती. बैलगाड्यांच्या कुंपनामुळे शत्रुचा अचानक होणारा हल्ला थोपावण्यास मदत होत होती. बैलगाड्यांच्या कुंपनामागे उजव्या बाजूला बंदूक प्रमुख 'उस्ताद अली' व डाव्या बाजूला तोपची मुस्तफा असुन त्यांच्यासमोर संरक्षण कवच होते. तोफ बंदुकांच्या मागे आघाडीची सैन्य तुकडी असुन ती 'खुसरो कोकलताश' व महंमद अली गंज यांच्या आधिपत्याखाली होती. त्यामागे सैन्याचा केंद्रभाग असुन त्याचे उजवे केंद्र व डावे केंद्र असे भाग पाडले होते. या दोहोंच्या मधोमध बाबरचा घोडा होता. उजव्या व डाव्या केंद्राच्या बाजूला रांगेत अनुक्रमे उजवी व डावी बाजू होती. युवराज हुमायुन व ख्वाजा किलन हे उजव्या बाजूचे सेनापती होते. तर मुहम्मद सुल्तान मिर्झा आणि मेहदी ख्वाजा हे डाव्या बाजूचे सेनापती होते. उजव्या व डाव्या बाजूच्या काही अंतरावर म्हणजेच दोन्ही टोकांवर अनुक्रमे उजवी संरक्षण तुकडी (उजवी तुलुगामा) आणि डावी संरक्षण तुकडी (डावी तुलुगामा) होती. या तुकड्यांमध्ये अत्यंत चपळ असे घोडेस्वार होते. केंद्रभागाच्या मागे राखीव सेना असुन अब्दूल अजीझ हा त्याचा सेनापती होता. अशाप्रकारे तुलुगामा युद्धतंत्राचा वापर करुन बाबरने इब्राहीम लोधीच्या सैन्यास धुळ चारली. इब्राहीम लोधीने युद्धात पराक्रम दाखवला पण त्याला यश आले नाही. त्याला युद्धामध्येच वीरगती प्राप्त झाली. अशाप्रकारे दिल्लीच्या सुल्तानशाहीचा अंत बाबरने घडवून आणला.
पानिपतचे युद्ध जिंकल्यानंतर बाबरने उत्तरेकडील दिल्ली, आग्रा हे प्रदेश आपल्या ताब्यात घेतले व मुघल साम्राज्याचा पाया भक्कम केला. परंतु बाबरचा दिल्ली विजय राजपुत राजा 'राणा संगा' यांच्या मनात सलत होता कारण दिल्ली जिंकण्याची बाबरची महत्वकांक्षा होती आणि तो बाबर परकीय समजत असे. या सर्व बाबींमुळे राणा संगाने बाबरच्या सत्तास्थापनेला आव्हान केले. याचाच परिणाम म्हणून बाबर आणि राणा संगा यांच्यात 'खानुवा' येथे युद्ध झाले. या युद्धामध्ये राणा संगाच्या सैनिकांनी अतुलनीय असा पराक्रम दाखविला आणि बाबरच्या सैन्याला तोडीस तोड उत्तर दिले. परंतु बाबरच्या युद्ध कौशल्यामुळे व नेतृत्वगुणामुळे बाबरने हे युद्ध सुद्धा जिंकले. खानुवाचे युद्ध १५२७ साली झाले व या युद्धामुळे भारतात बाबरच्या सत्तेचा पाया भक्कम झाला.
अशा प्रकारे बाबरचा राजकीय प्रवास आपल्याला बघता येईल. या एकदंर वर्णनावरुन आपल्याला बाबरचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, जिद्द, चिकाटी, मुत्सद्देगिरी, पराक्रम इत्यादी गुण दिसतात.
महत्वकांक्षी सम्राट म्हणून बाबरची वैशिष्ट्ये
बाबरच्या आयुष्यातील घटनाच त्याला सम्राट बनण्यास भाग पाडतात. बाबरच्या वडिलांचे १४९४ साली एका अपघातात निधन होते, ही घटना बाबरच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. कारण या घटनेनंतर बाबर अवघ्या १२ व्या वर्षी राजा बनतो व त्यावर खुप जबाबदा-या पडतात. येथूनच त्याची सम्राट बनण्याची परीक्षा सुरु होते. बाबर गादी बसल्यानंतर त्याला राजपदावरुन दुर करण्यासाठी खुप प्रयत्न होतात. हे प्रयत्न त्यांच्या काकांकडून केले जातात परंतू बाबरच्या आजी दौलत बेगम यांच्या प्रयत्नांमुळे राजेपद हे स्थिर होते व बाबरची पुढील वाटचाल सुरु होते.
बाबर हा महत्वकांक्षी राजा आहे, हे त्याने अनेक प्रसंगावरुन सिद्ध केले होते. त्यातील एक प्रसंग म्हणजे फरगण्याच्या गादीवर बसल्यानंतर बाबरने लगेचच समरकंद वर स्वारी केली आणि १४९७ साली समरकंद देखील जिंकून घेतले. या वेळेस बाबरचे वय अवघे पंधरा वर्ष होते, एवढ्या लहान वयात बाबरने खुप महत्वाची कामगिरी केली होती. परंतु नंतरच्या काळात समरकंद मध्ये फुटीरतावादी गट निर्माण होऊन तेथे बंड पुकारले जाऊ लागले. अशा परिस्थितीत समरकंद वर नियंत्रण ठेवणे बाबर शक्य झाले नाही त्यामुळे समरकंद बाबरच्या हातातून गेले पुढे अवघ्या १०० दिवसांमध्ये फरगणा सुद्धा हातातून सुटते. परंतु अशा वेळी बाबरने हार मानली नाही, स्वतःचे मनोबल कमी होऊ दिले नाही. बाबरने पुन्हा समरकंद वर स्वारी केली परंतु शैबानी खान कडून बाबरचा पराभव झाला व बाबरचा हा प्रयत्न देखील फसला. बाबरने समरकंद जिंकण्याचे दोनदा प्रयत्न केले पण त्याला अपयश आले. तरीसुद्धा बाबरने हार मानली नाही. त्याने काही वर्ष आराम करायचे ठरविले, तो डोंगर द-यांमध्ये जमातीबरोबर राहू लागला आणि तेथेच त्याने आपल्या लष्कराची बांधनी केली. पुन्हा नव्या आशेने, नव्या उमेदीने त्याने परत समरकंदवर स्वारी केली व या वेळी त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले नाहीत, या वेळी त्याला यश आले अन् त्याचा विजय निश्चित झाला. या ठिकाणी आपण असे म्हणू शकतो की, बाबरने दोन वेळा अपयश पचवून पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न केले व त्यात त्याला यश आले. या प्रसंगावरुन आपणाला बाबरच्या अंगी असलेली चिकाटी, जिद्द, महत्वकांक्षी वृत्ती दिसून येते. हेच बाबरचे महत्वकांक्षी सम्राट म्हणून वैशिष्ट्य सांगता येईल.
नंतरच्या काळात बाबरची नजर अफगाणिस्थानवर पडली आणि त्याने हिंदकूश मधून अफगाणिस्थान मध्ये प्रवेश केला व काबुल जिंकून घेतले. या विजयामुळे बाबरचा अफगाणिस्थानमध्ये पाया रोवला गेला व पुढे बाबरने कंधार, हिरात असे अनेक प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणले. या सर्व विजयामुळे बाबरचा आत्मविश्वास वाढला व त्याने भारतातील प्रदेश जिंकण्याचा मनसुबा आखला. बाबरने भारतावर स्वारी करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने लष्कराची पुन्हा नव्याने बांधनी करण्यास सुरवात केली आणि एक लष्कर तयार केले. बाबरने १५२६ साली आपले लष्कर सरहिंद मार्गे भारतात आणले व हे लष्कर एप्रिल महिन्यात पानिपत वर येऊन ठेपले आणि इब्राहिम लोधीच्या सैन्यापुढे उभे ठाकले. या वेळी दोन्ही बाजूंनी घमासान युद्ध झाले, या युद्धात बाबरने अतिशय प्रभावी पणे तुलुगामा युद्धपद्धतीचा वापर केला. या युद्धतंत्राचा वापर करुन बाबरने आपली योग्यता सिद्ध केली व स्वतःच्या अंगी असलेले नेतृत्वगुण आणि मुत्सद्देपणा दाखवून दिला. या युद्धात बाबरने इब्राहिम लोधीच्या एक लक्ष सैन्याला धूळ चारली व दिल्लीच्या सुल्तानशाहीचा अंत केला. तसेच नंतरच्या काळात उत्तरेकडील अनेक प्रदेश काबीज करुन मुघल सत्तेचा पाया भक्कम केला आणि एका वैभवशाली साम्राज्याचा संस्थापक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
राणा संगा
भारतात सत्ता स्थापन केल्यावर बलाढ्य राजपुत राजा राणा संगा याने बाबरला आवाहन केले. राणा संगा हा खुप शुर आणि पराक्रमी होता, चित्तोड ही त्याची राजधानी होती आणि त्याचे सैन्यबळ ही प्रचंड होते. सर्व राजपुत राणा संगाला आपला पुढारी समजत असे. राणा संगा हा फार पराक्रमी होता, त्याच्या शरीरावर युद्धातील जखमांच्या ८० खुणा होत्या. इब्राहिम सोबतच्या युद्धात त्याचा हात कापला गेला होता तसेच पाय देखील युद्धात कापला गेला होता. तो एका डोळ्याने आंधळा होता कारण एका युद्धात त्यांचा डोळा जखमी झाला होता. मावळ व गुजरातच्या सुल्तानांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य वाढविले होते. अशा पराक्रमी लढवय्या राजासोबत बाबरचा सामना झाला. या युद्धात राणा संगाचेच पारडे जड होते, कारण बाबर सुद्धा राणा संगाची ताकद ओळखुन होता. बाबर व राणा संगा यांच्यात १५२७ साली 'खानुवा' येथे युद्ध झाले. या युद्धात राजपुत सैनिकांनी पराक्रम गाजवत बाबरच्या सैन्याला जेरीस आणले. राणा संगाच्या सैन्याचा विजय निश्चित होत असताना अचानक युद्धाचे झुकते माप बाबरच्या सैन्याकडे गेले. राणा संगा आणि त्याच्या सैनिकांनी पराक्रमाची शर्त केली पण त्यांना या युद्धात यश आले नाही. या युद्धात बाबरचा विजय झाला. अशाप्रकारे बाबरने हे युद्ध जिंकून भारतात आपल्या सत्तेचा पाया मजबुत केला.
अशाप्रकारे 'जहिरुद्दीन मोहम्मद बाबर' याचे आत्मचरित्र 'बाबरनामा' हे अभ्यासताना आपल्याला तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीची माहिती मिळते. तसेच तत्कालीन व्यक्तींची वेशभुषा, केशभुषा तसेच स्वभावगुणांची माहिती मिळते. बाबरच्या अंगी असलेल्या गुणांची ओळख होते. बाबरनामा मध्ये वर्णन केलेल्या, नद्या पर्वत, झाडे, फुले, फळे तसेच विविध प्रदेशातील प्राण्यांची माहिती मिळते. तत्कालीन सामाजिक-राजकीय समीकरणांची ओळख होते, बाबरच्या लष्करी मोहिमा मधील नेतृत्व कौशल्य आणि तुलुगामा सारख्या युद्धतंत्राची माहिती समोर येते.
बाबरनामा हा एकप्रकारे त्या वेळेच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेचा आरसा आहे. त्यामुळेच बाबरनामाचे प्राथमिक साधन म्हणून असलेले महत्व अनन्यसाधारण असे आहे.