अल्गोरिदम (Algorithm) म्हणजे एखादी समस्या सोडविण्यासाठी, कठीण आकडेमोड किंवा काम करण्यासाठी एका पाठोपाठ एक सुचनांची क्रमबद्ध मांडणी किंवा एक निर्धारित कृती (Procedure). अगदी सरळ सरळ भाषांतर करायचे झाले किंवा योग्य तर शब्द निवडायचा झाल्यास 'सुचनावली' (Set of Instructions) किंवा 'प्रक्रियात्मक सुचनावली' (Procedural set of Instructions) असे म्हणावे लागेल. गणित आणि संगणक क्षेत्रात अल्गोरिदम म्हणजे एखादी वारंवार उद्भवणारी समस्या सोडविण्यासाठी ठरवलेली कृती.
संगणकीय सुचनावली (Computer Algorithm) ठरविण्याच्या पद्धतीमध्ये एक प्रवाह-तक्ता (Flow Chart) बनविणे जास्त प्रचलित आणि सामान्य आहे ज्यात एकाद्या कामाच्या वेगवेगळ्या टप्पांसोबतच अमुक एखादी स्थिती किंवा अवस्था आली तर ती कशी हाताळायची किंवा पुढे काय करायचे हे देखील स्पष्टपणे निर्धारित केलेले असते जेणेकरून कुठेच अडून न राहता त्या कामाचा, समस्येचा किंवा आकडेमोडीचा शेवट गाठता येईल. एका प्रवाह-तक्त्यात जर…तर…नाहीतर (If…Then…Else) अशा बऱ्याच शाखा असू शकतात.
दैनंदिन जीवनातील अल्गोरिदमचे एक सोप्पे उदाहरण म्हणजे पाककृती (Recipe) ज्यात सुचनांची एक छोटी यादी असते की जेणेकरून पदार्थ जसा अपेक्षित किंवा नियोजित आहे तसाच बनवताना काही ठराविक गोष्टी/कृती ठराविक वेळी, ठराविक पद्धतीने, ठराविक प्रमाणात आणि ठराविक क्रमात केल्या जाव्यात. जर त्यात काही बदल, चुका किंवा फेरफार झाल्यास तर चुकीचा, अनपेक्षित किंवा वेगळाच परिणाम होईल. आपण असे बरेच अल्गोरिदम (सुचनावल्या) आपल्या जीवनात पाळत असतो.
अल्गोरिदम हा शब्द मुळ इंग्रजी वाटत असला तरी तो एका अवलिया व्यक्तीच्या नावावरून आलेला आहे ज्याला अल्गोरिदम ह्या शब्दाचा जनक मानले जाते. तो व्यक्ती मध्ययुगीन महान फारसी गणितज्ञ मुहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिझमी (Muḥammad ibn Mūsā al-Khwārizmī) हा आहे. युरोपातील गणित, विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या विकासात अशा बऱ्याच मध्ययुगीन अरब/मुस्लिम अभ्यासकांचे, शास्त्रज्ञांचे आणि संशोधकांचे बहुमोल योगदान आहे.
त्याच्या हिंदी-अरबी दशांश संख्या प्रणालीवरच्या (Indo-Arabic Decimal Number System) पुस्तकाचे लॅटिनमध्ये भाषांतर (Algoritmi de numero Indorum) झाल्यानंतर त्याच्या आडनावाचा म्हणजे 'अल-ख्वारिझमी' ह्या शब्दाचा झालेला अपभ्रंश म्हणजेच 'अल्गोरिदम'. नंतर हाच शब्द सगळीकडे वापरायला सुरवात झाली आणि त्याचे (आड)नाव अजरामर झाले. बाबिलोनियन सभ्यतेच्या (इराक) गणितज्ञांनी सर्वात पहिली सुचनावली इसवी सन पुर्व २५०० मध्ये लिहिल्याचे समजले जाते.
तसेच 'अल्जेब्रा' (Algebra) किंवा 'अल-जब्र' (ٱلْجَبْر) हा शब्द (म्हणजेच बीजगणित) अल-ख्वारिझमीने लिहिलेल्या "अल-किताब अल-मुख़्तसर फि अल-जब्र व अल-मुक़ाबला" (The Compendious Book on Calculation by Completion and Balancing) ह्या प्रसिद्ध अरबी पुस्तकाच्या शीर्षकाचा भाग आहे. अंकगणितामध्ये (Arithmetic) देखील त्याने एक दुसऱ्या पुस्तकाद्वारे खुप मोठे कार्य केले.
सरतेशेवटी, माझ्या मते 'सॉफ्टवेअर' (Software) ह्या शब्दासाठी 'आज्ञावली' हा मराठी शब्द आहे तसे 'अल्गोरिदम' (Algorithm) ह्या शब्दासाठी 'सुचनावली' शब्द वापरायला हरकत नाही. शब्द मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरु झाल्यावर आपोआपच प्रचलित होत जाईल.