हिमालय

हिमालयातील वनांचे प्रकार किती व कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

हिमालयातील वनांचे प्रकार किती व कोणते आहेत?

0
हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या भागातील हवामानामधील भिन्नता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, प्रदेशाची उंची, मृदा प्रकार इत्यादी घटकांमधील तफावतीनुसार वनस्पती वप्राणिजीवनात विविधता आढळते. येथे उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि टंड्रा प्रकारचे हवामान आढळत असल्यामुळे त्या त्या हवामानाला अनुसरून वनस्पतींचे प्रकार आढळतात. उंचीनुसार त्यांमध्ये तफावत दिसते. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशातील वनस्पती प्रकारांतही फरक दिसतो. पूर्व भागात वनांचे प्रमाण अधिक आहे. ओक, पाइन, फर, र्‍होडोडेंड्रॉन, बर्च (भूर्ज), बीच, जूनिपर व देवदार हे हिमालयात आढळणारे सर्वसामान्य वृक्ष आहेत. दक्षिणेकडील तीव्र उतारांवर सस.पासून ९१० मी. उंचीपर्यंत अंजीर व ताडासारखे उष्ण कटिबंधीय वृक्ष, सुमारे २,१०० मी. उंचीपर्यंत ओक, चेस्टनट व लॉरेल वृक्ष आणि ३,६६० मी. पेक्षा अधिक उंचीवर सीडार व इतर सूचिपर्णी वृक्ष आढळतात. साल, टून, सिसू, देवदार या वनस्पती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. पर्वताच्या उतारांवर र्‍होडोडेंड्रॉन जातीची फुलझाडे दिसतात. जंगलांमध्ये अनेक झुडुपे आणि वेली वाढलेल्या दिसतात. समुद्रसपाटीपासून सुमारे १,५०० मी. उंचीच्या प्रदेशात चहाच्या मळ्यांची लागवड केली जाते. पर्वताच्या दक्षिण उतारांवर सुमारे १,८०० मी. उंचीपर्यंत तांदूळ, मका आणि ज्वारवर्गीय धान्यपिके, तर अधिक उंच भागात गहू व बार्लीचे उत्पादन घेतले जाते.

प्रदेशाची उंची आणि पर्जन्यमानावर आधारित हिमालयातील अरण्यांचे उष्ण कटिबंधीय, उपोष्ण कटिबंधीय, शीत कटिबंधीय, अल्पाइन व स्टेपी वने असे वेगवेगळे प्रकार पाडता येतात. हिमालयाच्या पायथ्याशी उष्ण कटिबंधीय पानझडी वने आढळतात. ती प्रामुख्याने तराई नावाने परिचित आहेत. साल हा यांतील सर्वत्र आढळणारा महत्त्वाचा वृक्ष आहे. काश्मीर खोऱ्यात रुंदपर्णी पानझडी वने आहेत. यांमध्ये वॉलनट, चेस्टनट, चिनार, विलो, तुती, बांबू, देवदार, र्‍होडोडेंड्रॉन इत्यादी वृक्ष आढळतात. पूर्वेकडे ओक, पाइन व र्‍होडोडेंड्रॉन अशी मिश्र वने आहेत. वायव्य काश्मीरमधील उघड्या खडकाळ व कंकर प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय वने आहेत. यांमध्ये शुष्क काटेरी तसेच इतरप्रकारची झुडुपे व वृक्ष आढळतात.नंगा पर्वतात सुमारे २,०००मी. उंचीपर्यंत आणि सॉल्ट रेंजच्या पायथ्यालगत तसेच जम्मू व काश्मीरमधील शिवालिक टेकड्यांच्या दोन्ही उतारांवर असे वनस्पती प्रकार आहेत. झेलम, चिनाब व सतलज या नद्यांच्या खोऱ्यांतील सस.पासून सुमारे ५०० – १,५०० मी. उंचीच्या आणि सुमारे ८० सेंमी. पर्जन्य असलेल्या प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आहेत. यांमध्ये कमी उंचीचे वृक्ष, लहान व सदाहरित पाने असलेली व काटेरी झुडुपे आढळतात. दार्जिलिंग, सिक्कीम व भूतान प्रदेशांत १,८०० – २,५०० मी. उंचीच्या प्रदेशात सदाहरित पर्वतीय वने आढळतात. ही अरण्ये घनदाट असून तेथे मंडपी (कॅनॉपी) रचना दिसते. वृक्षांची उंची ३० मी.पर्यंत आढळते. येथे विविध प्रकारचे ओक, मॅग्नोलिया, र्‍होडोडेंड्रॉन इत्यादी वृक्षांची विस्तृत वने आहेत. जंगलात हरिता, आर्किड व दगडफूल यांची रेलचेल दिसते. पश्चिम भागात अधिक उंचीवर उप-अल्पाइन वने आहेत. त्यांत बर्च, जूनिपर व र्‍होडोडेंड्रॉन वनस्पती अधिक आहेत. हिमरेषेच्या खालच्या भागात क्रमाने अल्पाइन खुरट्या वनस्पती व गवत आढळते. तसेच काही औषधी वनस्पती सापडतात. गवताळ प्रदेशाच्या वरच्या सीमाभागात गुग्गुळ ही सुवासिक झुडुपे आढळतात. अल्पाइन गवताळ प्रदेशात विविध प्रकारची पुष्कळ फुलझाडे वाढत असून त्यांमध्ये किराईत (जेन्शन), प्रिमरोझ (प्रिन्यूला), आयरिश, पाषाणभेद, जरेनियम, ॲस्टर, थायमस ही प्रमुख फुलझाडे व पल्सॅटिलम, बचनाग (अकोनीटम) इत्यादी औषधी वनस्पती आढळतात. स्टेपी प्रदेश आणि मुख्य अरण्ये यांदरम्यानच्या संक्रमणावस्थेच्या प्रदेशात स्टेपी वने असून विशेषतः जूनिपर पाइन व ओक वृक्ष अधिक आहेत. सिंधू, सतलज, काली गंडक व घागरा या नद्यांच्या घळयांच्या व तशाच प्रकारच्या भागांत, त्याचप्रमाणे सिमला टेकड्या, यमुना, भागीरथी व अलकनंदा नद्यांची खोरी व नेपाळमध्ये ही वने आहेत. नंगा पर्वताच्या उत्तर उतारावर २,००० – ३,००० मी. उंचीच्या प्रदेशात आणि दक्षिण उतारावर ४,००० – ४,२०० मी. उंचीच्या प्रदेशात स्टेपी वने पाहायला मिळतात. पूर्वेकडे झूम प्रकारची भटकी शेती केली जाणाऱ्या प्रदेशात स्टेपी वने आहेत.
उत्तर लिहिले · 22/2/2023
कर्म · 9415
0

हिमालयातील वनांचे प्रकार:

हिमालयीन प्रदेशात उंचीनुसार विविध प्रकारचे वन आढळतात. ते खालीलप्रमाणे:

  1. उष्णकटिबंधीय आर्द्र वने (Tropical Moist Forests):

    ही वने हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात.

  2. उप-उष्णकटिबंधीय वने (Sub-Tropical Forests):

    या वनांमध्ये रुंद पानांचे वृक्ष आढळतात.

  3. पर्वतीय रुंद-पानांची वने (Montane Broadleaved Forests):

    या वनांमध्ये ओक (Oak) आणि चेस्टनट (Chestnut) सारख्या वृक्षांचा समावेश असतो.

  4. पर्वतीय शंकूधारी वने (Montane Coniferous Forests):

    या वनांमध्ये पाइन (Pine), देवदार (Deodar) आणि स्प्रूस (Spruce) सारख्या वृक्षांचे प्रमाण जास्त असते.

  5. अल्पाइन वने (Alpine Forests):

    ही वने वृक्ष रेषेच्या (Tree line) वर आढळतात. यात प्रामुख्याने झुडपे आणि गवताळ प्रदेश यांचा समावेश असतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 230

Related Questions

हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ का असतो?
हिमालय पर्वताच्या शिखरांवर सतत बर्फ साठलेले असते, त्याचे कारण काय?
हिमालय पर्वताच्या शिखरावर बर्फ का साठलेले असते?
हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरुपाच्या असण्याचे कारण काय आहे?
हिमालया पर्वताची उंची किती आहे?
हिमालयातील झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान कोणते आहे?
हिमालयातील सर्वात मोठी पर्वत रांग कोणती आहे?