नावाचा अर्थ

आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?

1 उत्तर
1 answers

आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?

1
आडनाव म्हणजे आद्यनाम.

नामसाधर्म्य असता होणारा गोंधळ टाळायला आणि वांशिकतेचे अस्तित्व अबाधित राखायला म्हणून ही संकल्पना भारतीय समाजात अगदी पूर्वापार दिसते, केवळ कालपरत्वे हिचे स्वरूप सकृद्दर्दशनी जाणवावे इतके बदलत गेले आहे.

प्राचीन भारतीय इतिहासात आपल्याला गोत्र[1][2], वंश इत्यादि गोष्टी दिसतात तेच आजच्या आडनाव पद्धतीचे तत्कालीन रूप आहे म्हणता येईल[3]. भारतीय इतिहास आणि पुराणं बऱ्यापैकी पुरोहित आणि राजकीय वर्गाच्या इतिहासाचे ज्ञान देतात परंतु जनसामान्यांचा इतिहास दाखवणारी संसाधने आपल्याकडे दुर्मिळच असल्याने गोत्र, वंशादि व्यतिरिक्त भिन्न पद्धतीची आडनावं होती का ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

कालानुरूप आडनावांचे निकष बऱ्याच ठिकाणी बदलल्याने काही जातींमध्ये गोत्रांचे महत्व धार्मिक विधींपुरते सीमित झाले. अद्याप उत्तर भारतात ज्यांना आडनावं नसतात असे ब्राह्मण, राजपूत, अग्रवाल इत्यादि लोक आपली गोत्रच आडनावं म्हणून अवलंबतात. क्षत्रियांमध्ये वंश संकल्पनेला आडनावासारखे वापरताना बघता येते. उत्तरेत राजपूत लोकांमध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर जी राजवंशांची नावं दिसतात ती अजूनही बघायला मिळतात ज्याचा अर्थ आजच्यासारखी आडनावं या समाजात किमान सहस्र वर्षांपासून तरी आहेत. पंजाबात खत्री आणि तत्सम जातींमध्येही आज बघायला मिळणारी आडनावं शिखांच्या उदयापूर्वी रूढ झालेली जाणवतात. दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याच्या पूर्वीच्या सामाजिक जीवनाचे उल्लेख नगण्य आढळतात परंतु विजयनगर काळी मात्र आपल्याला आद्याक्षर म्हणून गावाचे नाव आणि नावाच्या शेवटी जातिसूचक आडनावं बघायला मिळतात जी अजूनही बव्हंशी तेलुगू समाजात आणि काही अंशी कन्नड, तमिळ लोकांमध्येही आढळतात[4].

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास आजमितीला आपल्याकडे यादव राजवटीच्या कारकिर्दीपूर्वीच्या सामाजिक जीवनाविषयी समाधानकारक माहिती देणारी साधने उपलब्ध नाहीत म्हणणे असंयुक्तिक नसावे. त्यामुळे तत्पूर्वी मराठी समाजात आडनावाचे स्वरूप कसे होते हे सांगता येत नाही पण यादव काळात मात्र पडनावं (पदांवरून पडलेली नावं), ज्ञातीनाम (जातीचे नावच आडनाव म्हणून वापरणे), गावांवरून आलेली नावं आपल्याला बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात. बहमनी आणि नंतरच्या मराठेशाहीतील राज्यात काही समाजांमध्ये आडनावं असूनही त्यांस विशेष महत्व होते असे दिसत नाही आणि त्यामुळेच त्याकाळच्या आडनावांची खात्रीपूर्वक माहिती देण्यास मर्यादा येतात. आडनावांची अनिवार्यता व्यावहारिक जीवनात वाढली ती आंग्लाईत ज्याची परिणती आजचे आपले नावांचे स्वरूप आहे.


विविध आडनावं[5]

तस्मात असे म्हणणे तर्कसुसंगत आहे की आडनाव प्रकार भारतीय समाजात जुनाच असून त्याची रूपरेखा काळाप्रमाणे परिवर्तित होत गेली आहे.

तळटीपा

[1] गोत्र म्हणजे काय? गोत्राची वैशिष्ट्ये कोणती? चे शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik)ने दिलेले उत्तर
[2] एकूण किती गोत्र आहेत? त्यांची नावे काय? गोत्र कसे ओळखतात? चे शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik)ने दिलेले उत्तर
[3] उपनामव्युत्पत्तिकोश
[4] नाव-वडिलांचे नाव-आडनाव ह्या नेहमीच्या पद्धती व्यतिरिक्त नावे तुम्ही बघितली आहेत का? आपले त्याबद्दल मत काय? 
[5] आडनावांची सुरस कहाणी
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121725

Related Questions

पाच अक्षरी उलट सुलट नाव कसे सुचवाल?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?
माझ्या बाळाचा जन्म 22/07/2022 आहे जन्म नाव कोणते ठेवावे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?
शिवरायाच्या आईचे नाव काय होते?