1 उत्तर
1
answers
काळानुसार बाजाराचे फरक कोणते?
1
Answer link
बाजाराचे प्रकार
सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय. जिथे वस्तू व सेवांची खरेदी –विक्री केली जाते. पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ठ ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात.
व्याख्याः-
ऑगस्टीन कुर्नोः- “ यांच्यामते ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश, की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते.”
खालील गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो.
१) ग्राहक आणि विक्रेते
२) वस्तू / सेवांची खरेदी आणि विक्री
३) वस्तूची किंमत
४) ग्राहक आणि विक्रेते जवळचा संबंध
५) बाजारविषयक ज्ञान
बाजाराचे वर्गीकरणः-
अ) स्थळानुसारः-
१) स्थानिक बाजारः- “स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार, की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहूक खरेदी करतात.”
२) राष्ट्रीय बाजारः- “राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदानप्रदान होते.”
३) आंतरराष्ट्रीय बाजारपेठः- “आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदानप्रदान होते.”
ब) काळानुसारः-
१) अत्यल्पकाळः- “अत्यल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही.” हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा असतो. यामुळे या बाजारात वस्तूचा पुरवठा मागणी प्रमाणे वाढवता येत नाही. परीणामी वस्तुंची किंमत मागणी निर्धारीत करते.
२) अल्पकाळः- “अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे.” या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात वाढवता येतो.
३) दीर्घकाळः- “दीर्घकाळ हा असा कालावधी होय की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते.” हा कालावधी काही वर्षाचा साधारणपणे ५ वर्षापर्यंतचा असतो. त्यामुळे उद्योगसंस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते.
४) अतिदीर्घकाळः- “अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने बदलता येणे शक्य असते.” हा कालावधी ५ वर्षापेक्षा अधिक असतो.
क) स्पर्धेनुसारः-
अर्थशास्त्रात विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्वाचा निकष आहे. या निकषावर आधारीत बाजाराचे वर्गिकरण पुढील प्रमाणे.
१) पूर्ण स्पर्धाः- “जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचीक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते.” या बाजारात असंख्य ग्राहक व विक्रेते असतात, वस्तू एकजिनसी, मुक्त प्रवेश- निर्गमन, बाजाराचे पुर्ण ज्ञान अशी वैशिष्टेय दिसून येतात.
२) अपूर्ण स्पर्धाः- हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत. या बाजारात मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त बाजार आणि अल्पाधिकार अशा बाजारांचा समावेश होतो.
पूर्ण स्पर्धाः-
ज्या बाजारात एकजिनसी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात.
वैशिष्ट्येः-
१) असंख्य ग्राहक व विक्रेतेः-
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची संख्या असंख्य असते. त्यामुळे एका ग्राहकाचा मागणीवर व एका विक्रेत्याचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होत नाही.
२) एकजिनसी वस्तूः-
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एकजिनसी असतात. म्हणजेच ते रंग, रुप, आकार, चव, दर्जा, व वेस्टम इ. बाबतीत एकसारखे असतात.
३) एकच किंमतः-
पूर्ण स्पर्धेत एका वस्तूचे सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते.व ती मागणी पुरवठ्यावरुन निश्चित झालेली असते.
४) बाजाराचे पूर्ण ज्ञानः-
ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेचे पुर्ण ज्ञान असते. त्यामुळे ते वस्तूला प्रचलित किंमतीपेक्षा जास्त किंमत ग्राहक देत नाहीत.तसेच विक्रेतेही जास्त किमतीला विक्री करु शकत नाही.
५) मुक्त प्रवेश व निर्गमनः-
कोणत्याही नवीन उद्योग संस्थांना पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश करण्याचे आणि बाजारातुन बाहेर पडण्याचे पुर्ण स्वातंत्र असते.
६) वाहतूक खर्चाचा अभावः-
पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते. कारण या भाजारात वाहतूक खर्च स्थिर गृहितक धरला जातो. यामुळे किंमत सर्वत्र सारखी राहते.
७) सरकारी हस्तक्षेप नाहीः-
निर्हस्तक्षेप धोरण हे पुर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ किंमत व इतर निर्णय शासन घेत नाही.
८) बाजाराचे पुर्ण ज्ञानः-
ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचे पुर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहकाला आणि विक्रेत्याला वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा यांविषयी पुर्ण ज्ञान असते.
पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती
पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. याला समतोल किंमत असे म्हणतात.डॉ. मार्शल यांनी किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात. त्याच प्रमाणे समतोल किंमत निश्चितीसाठी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात.
तक्त्याद्वारे स्पष्टीकरणः
वरील तक्त्यावरुन असे दिसुन येते की, जेव्हा किंमत १०० रुपयांवरुन २००रु पर्यंत वाढते तेव्हा मागणी ५०००किलोवरुन ४००० किलोपर्यंत कमी होते तर पुरवठा १००० किलोवरुन २००० किलो पर्येंत वाढतो. कारण या स्थितीत पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे. याला अतिरिक्त मागणी म्हणतात. परंतू जेंव्हा किंमत ३०० रु होते तेव्हा मागणी आणि पुरवठा दोन्ही ३००० किलो समान होतात. या स्थितीत ३००रु हि समतोल किंमत निश्चित होते. परंतू जेव्हा किंमत वाढून ४०० रु किंवा ५००रु होईल तेव्हा मागणी कमी होउन २०००किलो, १०००किलो होईल आणि पुरवठा वाढून ४०००किलो, ५०००किलो होईल त्यामुळे या स्थितीत पुरवठा जास्त आहे. याला अतिरिक्त पुरवठा म्हणतात.
आकृतीद्वारे स्पष्टीकरणः
वरील आकृतीत य अक्षावर किंमत(रु) आणि क्ष- अक्षावर मागणी व पुरवठा (कि.ग्रॅ.) दर्शवला आहे. तर किंमत आणि मागणीतील व्यस्त संबंधामुळे वरुन खाली जाणारा मम हा मागणी वक्र व किंमत आणि पुरवठ्यातील सम संबंधामुळे खालुन वर जाणारा पप हा पुरवठा वक्र आहे. हे दोन्ही वक्र एकमेकांना स बिंदुत छेदतात. स बिंदूला समतोल बिंदू म्हणतात. येथे ३०० रु किंमतीला मागणी व पुरवठा ३०००किलो समान होऊन समतोल समतोल किंमत निश्चित होते. यावरुन हे स्पष्ट होते की समतोल किंमत बाजार मागणी आणि बाजार पुरवठा यांनी निश्चित होते.
२) मक्तेदारी
मक्तेदारीस इंग्रजीमध्ये Monopoly असे म्हणतात. Mono या शब्दाचा अर्थ एक आणि poly या शब्दाचा अर्थ विक्रेता असा होतो.
व्याख्याः-
“मक्तेदारी म्हणजे असा बाजार, ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपुर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो.”
मक्तेदारी स्पर्धेची वैशिष्ट्येः-
१) एकच विक्रेताः-
मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते. परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते.
२) पर्यायी वस्तूंचा अभावः-
मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो. त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तु विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे मक्तेदारीत मगाणीची छेदक लवचिकता शुन्य किंवा नकारात्मक असते.
३) प्रवेशावर निर्बधः-
कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने येतात.
४) बाजार पुरवठ्यावर पुर्ण नियंत्रणः
मक्तेदाराचे बाजारपुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो.
५) किंमतकर्ताः-
मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदारी उद्योगसंस्था स्वतःच्या मालाची/उत्पादनाची किंमत निश्चित करते. त्यामुळे मक्तेदार हा किंमत कर्ता असतो.
६) मूल्यभेदः-
मक्तेदार जेंव्हा एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे वेगवेगळ्या किंमती आकारतो तेव्हा त्यास मूल्यभेद असे म्हणतात. मूल्यभेद हे एक बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे.
७) उद्योगसंस्था हाच उद्योगः-
मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारीत उद्योगसंस्था हाच उद्योग असतो.
मक्तेदारीचे प्रकारः-
१) खाजगी मक्तेदारी :
जेव्हा एखादी व्यक्ती/खाजगी संस्था मक्तेदारी उद्योगसंस्थेचे नियंत्रण करतेतेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरितझालेली असते. उदा., टाटा समूह.
२) सार्वजनिक मक्तेदारी :
जेव्हा एखादी उत्पादनसंस्था पूर्णत: सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालविलेली असते, तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. उदा. भारतीय रेल्वे.
३) कायदेशीर मक्तेदारी :
पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यांसारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात.नोंदणीकृत झालेल्या चिन्हाचे किंवा आकाराचे इतरांना वापरण्यास मनाई केली जाते. उदा., अमूलची उत्पादने.
४) नैसर्गिक मक्तेदारी :
विशिष्ट स्थल, हवामान, पर्जन्यमान इ. नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असेम्हणतात. उदा., पंजाबचा गहू.
५) साधी मक्तेदारी :
साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योगसंस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते.
६) मूल्यभेदात्मक मक्तेदारी :
मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योगसंस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदा., डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी आकारतात.
७) ऐच्छिक मक्तेदारी :
गळेकापू स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळविणे यामुळे सोयीचे होते. उदा., ओपेक (OPEC)
२) अल्पाधिकार बाजार
अल्पाधिकार (Oligopoly) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द Oligoi म्हणजे अल्पसंख्य आणि polis म्हणजे विक्रेता या शब्दांपासून झाली आहे.
व्याख्याः-
अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेतेएकजिनसी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचेउत्पादन करतात. उदा. मोबईल सेवा पुरविणारे, सिमेंट कंपनी इत्यादी.
अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
१) काही विक्रेते :
अल्पाधिकार बाजारात काही उद्योगसंस्था किंवा विक्रेतेअसतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते.
२) परस्परावलबन :
प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेनें वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योगसंस्थानांही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते.
३) जाहिरात :
अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योगसंस्था जास्तीतजास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते.
४) प्रवेशावर निर्बंध :
कंपन्या जेव्हा पाहिजेतेव्हा सहजपणेउद्योगातून बाहेर पडू शकतात. परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावेलागते.जसेकी सरकारी परवाना, पेटंट इ.
५) समानतेचा अभाव :
उद्योगसंस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकारानेलहान तर काही मोठ्या असतात.
६) अनिश्चितता :
प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात.
३) मक्तेदारीयुक्त स्पर्धा
प्रा. चेंबरलिन यांनी 1933 साली मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना मांडली. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार म्हणजे असा बाजार ज्यात मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये आणि पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येणारा बाजार होय. मक्तेदारीयुक्त बाजार हा प्रत्यक्ष बाजारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार आहे.
व्याख्याः-
चेंबरलीन यांच्या मते, ‘‘मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजेअशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेतेअगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतुपूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचेउत्पादन करतात.’’
मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणेः-
१) विक्रेत्यांची संख्याः-
मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते. परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. या कारणामुळे विक्रेत्याचे वर्तन मक्तेदारी प्रमाणे असते.
२) असंख्य ग्राहक :
मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी, कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही.
३) वस्तुभेद :
वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात. परंतुप्रत्येक उद्योगसंस्थेचे उत्पादन हे बाजारा तील दुसऱ्या उद्योगसंस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तूभेद असे म्हणतात. हा वस्तुभेद ब्रॅण्ड (छाप), व्यापारी चिन्ह (ट्रेडमार्क) इ. बाबतींत आढळतो.
४) मुक्त प्रवेश व निर्गमन :
पूर्ण स्पर्धेप्रमाणेयाही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याच प्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योगसंस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते.
५) विक्री खर्च :
विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. जाहिरात,दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, मोफत भेट वस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो.
६) जवळचे पर्याय :
मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचेपर्याय उपलब्ध असतात. उदा., विविध कंपन्यांचे साबण, शीतपेय इ.
७) गटसंकल्पना :
मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलीन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिनसी वस्तूंचेउत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय, तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. उदा., औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह.