मराठी कविता
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवितेचा अर्थ व आशय काय आहे?
4 उत्तरे
4
answers
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवितेचा अर्थ व आशय काय आहे?
2
Answer link
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे
देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
– बालकवी
कवितेचा अर्थ
श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते. क्षणात पाऊस पडतो, तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते. ऊनपावसाच हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपेडी गोफ विणलेला दिसतो. इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की, कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे.
ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला नि संध्याकाळ झाली असे वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन, उंच घरांवर नि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात- जणू ते ढग संध्याराग गात आहेत ! सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणी (चित्रकाराने) रेखाटले आहे असे वाटते.
आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की, जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीव बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत, असे वाटते. नुकत्याच पडून गेलेल्य पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत. हिरवळीवर आपल्या पाडसांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत.
हिरव्या माळरानावर गाईगुरेवासरे मजेत चरत आहेत आणि गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. गराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत. सोनचाफा फुलला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला, तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते.
फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून-धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले-पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी (सुवासिनी) स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही. त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. ते गाणे त्यांच्या मुखावर वाचता येते.
0
Answer link
अर्थ:
'श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे', या प्रसिद्ध कवितेत कवी म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये मन आनंदाने भरून जाते आणि चोहीकडे हिरवळ पसरते.
श्रावण महिन्यात निसर्गाची हिरवाई खूप सुंदर आणि आनंददायी असते. या महिन्यात सर्वत्र उत्साह असतो आणि लोकांच्या मनात आनंद भरलेला असतो.
आशय:
- निसर्गाची रम्यता: श्रावण महिन्यात निसर्गातील हिरवळ आणि ताजेपणा मनाला आनंदित करतो.
- मनातील आनंद: श्रावण महिना हा सणासुदीचा महिना असल्यामुळे लोकांच्या मनात उत्साह आणि आनंद असतो.
- परिसरातील सौंदर्य: श्रावणात सर्वत्र हिरवळ असल्याने परिसर सुंदर आणि आकर्षक दिसतो.
या कवितेतून श्रावण महिन्यातील निसर्गाची सुंदरता आणि मानवी मनावर होणारा आनंददायी परिणाम व्यक्त केला आहे.