मनोरंजन आकाशवाणी

रेडिओ वर आठवण सांगा?

1 उत्तर
1 answers

रेडिओ वर आठवण सांगा?

2
http://bit.ly/2ZcjUgj

🔹 आज जागतिक रेडिओ दिवस यानिमित्त एक आठवण 🔹

_____________________________



📻 एक आठवण.रेडिआोची, जी मला खास बनवते.📻
_______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________________
आज खूप दिवसांनी मला आमच्या फिलिप्स रेडीओची मला आठवण झाली. आठवण एवढ्याच साठी म्हटलं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं ....कारण त्या रेडिओच्या जमान्यात आपण लहान होतो. आणि रेडिओ आपल्या घराचा कुटुंबाचा एक सदस्य होता..
माझ्या लहानपणी आम्ही धाब्याच्या म्हणजे मातीच्या भिंती अन त्यावर लाकडी फळ्या टाकून त्यावर टाकलेलं मातीचच छप्पर, अशा घरात रहायचो. मला नक्की आठवत नाही मी तिसरीला होतो तेव्हापासून आमच्या घरात रेडीओ होता.....फिलिप्स कंपनीचा तो रेडिओ त्याला चामड्याच एक भक्कम कव्हर होतं..आणि गळ्यात अडकावायला त्याला चामड्याचा एक पातळ पट्टा होता
त्या काळी रेडिओला वर्षाला सहा रुपये लायसन्स असायचे .... आणि घरात आमचा मुलांचा हात पोहोचणार नाही अश्या ठिकाणी लाकडी खुंटीला त्याचे स्थान असायचे..!!
आमचा हा रेडिओ शेलावर चालायचा.... एकाचवेळी तीन शेल टाकावे लागायचे... तेव्हा एव्हरेडी आणि निप्पो कंपनीचे शेल मिळायचे.....एव्हरेडी च्या त्यावरच काळं मांजर ९ च्या आकड्यातून उडी मारताना अजुनही डोळ्यासमोर आहे...!!काही दिवसांनी हे शेल उतरायचे म्हणजे त्यांची पावर संपायची मग हे शेल आम्हाला गाडी गाडी खेळायला मिळायचे....
आमच्या रेडिओला खालच्या बाजुला एक चालु-बंद करण्याचे चे व आवाजाचे असे एकच बटन होते.....त्याच्या वरती केंद्र बदलवण्याचे एक बटण असायचे.... वरच्या बटनाच्या फिरवण्यानुसार एक काचेच्या आत असणारी लाल पांढरी काडी मागे पुढे व्हायची.....व त्यानुसार कार्यक्रम बदलायचे...!!
रेडिओला पाठीमागून एक छोटा खटका होता त्याला आम्ही बँड बटन म्हणायचो....तो खटका मागे-पुढे केला कि आम्हाला न समजणाऱ्या भाषा ऐकू यायच्या...मग, त्यामुळे आम्ही त्या खटक्याला सहसा हात लावत नसायचो...
पहिले दोन तीन वर्ष मला कुणी रेडिओला हात लावून दिल्याचे आठवत नाही, पण मला कळायला लागलं आणि माझा हात खुंटीला पोहचला तसा घरातला रेडीओ माझा दोस्त बनला....मी सहावीला गेल्यानंतर मग मी घरात असताना कुणाला रेडिओला हात लावून देत नव्हतो...
सकाळी सहा वाजता एका विशिष्ट धुन ने घरातील रेडिओ चालू व्हायचा.....एक मिनिटाची ती धून बंद होताच –आपोआप ‘’वंदे मातरम्’’ सुरु व्हायचा अन मग दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित होणार्‍या व पुणे केंद्राहुन सहक्षेपित हिंदी बातम्या प्रसारित व्हायच्या... --- "”ये (थोडा श्वास घ्यायचा,मग ) आकाशवाणी है" अब देवकी नंदन पांडे से समाचार सुनिये””...हा आवाज तेव्हा देशाचा आवाज झाला होता...!!
मग प्रभात वंदन व लगेच भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरु व्हायचा----
पंडित भीमसेन जोशी यांची ‘’भेटी लागी जीवा लागलेसी आस,...पाहे रात्रंदिवस वाट तुझी---’भेटी लागी जीवा लागलेसी आस’’’ ---किंवा---मोठी ताण आवळत '”जे का रंजले गांजले' त्यासी म्हणे जो आपुले...” अशी भक्ती गीते ऐकू येऊ लागताच शेतातली ,रानावनातली,गावातली माणसं जागी होवू लागायची...
घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला....उठी लौकरी वनमाळी उदयाचळीं मित्र आला....आनंदकंदा प्रभात झाली..उठी सरली राती...काढी धार क्षीरपात्र घेऊनी..धेनू हंबरती... लक्षीताती वांसुरेंहरी धेनुस्तनपानाला.....या भूपाळी बरोबर आमचा शेतकरी चरवी आणि बदली घेवून गोठ्ठ्याकडे निघायचा....गाईची धार काढता काढता या भक्तिरसात न्हावून जायचा...
लता मंगेशकर यांची “'रंगा येई वो रे...विठाई विठाई माझी कृष्णाई---कान्हाई $$”' किंवा “पैल तोहे कावू कोकताहे, शकून गे माहे सांगताहे... पैल तोहे कावू कोकताहे.”” ..अशी अनेक गाणी ऐकत आमची माय घरातील सडा-सारवन करायला सुरुवात करायची..... आम्ही गोधडीत असतानाच हे सारं ऐकायचो...गोधडीत असतानाच हि गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठ्ठं झालो....अन नकळत अध्यात्माचे संस्कार आमच्यावर घडून गेले...!!
http://bit.ly/2ZcjUgj
सकाळी चहा पीत असताना ६:५५ ला संस्कृत बातम्या चालू व्हायच्या ते आम्हाला काही कळत नव्हतं पण दररोज ते सुरुवातीच पठण ऐकून--- "इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |..." हे आमचं पाठ झाल होतं.....पुढे आम्ही कॉलेजला जाईपर्यंत किती तरी वर्षे तोच आवाज होता..!!. संस्कुत कुणाला काही समजत नसल्याने जनावरांचा चारापाणी तेव्ह्ढया वेळेत होवून जायचा..
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,सकाळी सात वाजता पाच मिनिटाच्या हिंदी बातम्यांच्या सुरुवातीला बातमीदार एक आवंढा गिळून--- "”ये (थोडा श्वास घ्यायचा, मग) आकाशवाणी है" अब सुब्रम्हन्यन स्वामी से समाचार सुनिये””...अन घराघरातून चला शाळेत निघा अशी आकाशवाणी निघायची...
बरोब्बर सात वाजून पाच मिनिटांनी घोषणा ऐकू यायची...
आकाशवाणी पुणे! भालचंद्र कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत!!"—ठळक बातम्या--:
असं त्यांनी म्हंटली की बरोबर आमचा शाळेत जायचा टाईम व्हायचा.....!!
कधी कधी सकाळी शाळेला उशीर होतोय असं वाटल्यानं आई म्हणायची---“”आवर मेल्या ”” –तर मी तिला म्हणायचो अजून बातम्या नाही लागल्या.....असं रेडिओ वर आमच्या वेळा चालू व्हायच्या..... घड्याळ कुणाच्या घरी होतं.????
सकाळी सव्वा सातला आम्ही पोरं शाळेत जायचो ते पुन्हा अकरा वाजता घरी यायचो.
संध्याराळी साडेसहा वाजता “कामगारांसाठी” असा पुन्हा एक विरुगंळ्याचा कार्यक्रम लागायचा...त्यात लोकसंगीत, लोकगीतं, कोळीगीत,भारुडे,अशा गाण्यांचा भरणा असायचा..थकून भागून घरी आल्यावर जमिनीला पाठ टेकवून ..शाहीर विठ्ठल उमप, अनंत फंदी यांची कितीतरी गाणी त्यावेळी ऐकलीय --- “”बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको---संसारामधी असा आपला, उगाच भटकत फिरु नको”” हे गाणं आजही कानात गुणगुणतय..!!
संध्याकाळी साडेसहाला शेतकऱ्यांच्या साठी दररोज एक आपली शेती नावाचा अर्ध्या तासाचा प्रायोजित कार्यक्रम लागायचा.....लहान असल्यानं शेतीतील कार्यक्रमाचा काहीच कळायचं नाही पण-------“”झुळझुळ पाणी आणायचं कुणी??---सांगतो राणी---फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी.... फिनोलेक्स””...हि मध्येच वाजणारी जाहिरात बरोबर म्हणायचो...
रात्री घरात अंगणात/घरात गाद्या, गिरद्या, गोधड्या, वाकळ असं काही बाही टाकून झोपण्याची तयारी केलेली असायची अन नेमकं त्याच वेळी जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा....मग मोकळ्या हवेत अंथरुणावर लोळत पडत हि सुमधुर श्रवणीय गाणी ऐकत कधी झोपी जायचो ते कळत पण नसायचं....!!
रेडिओच्या खुप आठवणी आपण साऱ्यांनीच जपल्या आहेत.....निर्जीव असला तरी, घराघरातील तो एक हक्काचा आपलेपणाचा सदस्य होता.....एकवेळ आपण चुकू पण तो कधीच चुकत नव्हता......अचूकता तर इतकी की,-----
"तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्‍या आकाशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे सात वाजून पंचावन्न मिनिटं आणि अठरा सेकंदं झाली आहेत" हा सकाळच्या आवाजाचा तपशील आजही कानात अन मनात घट्ट बसलाय....
समोर रेडिअो असायचा--:”स्वये श्रीरामप्रभु ऐकती..कुश लव रामायण गाती....कुश लव रामायण गाती...” ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला आणि वर्षभर चाललेल्या गीतरामायणाची धून घराघरातून ऐकू यायची....... ते सादरीकरण इतकं प्रभावी असायचं कि प्रत्यक्षात काही जण ते ऐकत असताना भावुक व्हायचे....काही डोळ्यांच्या कडा पुसायचे....!!!
दर बुधवारी रात्री रेडिओ सिलोनवर लागणारी बिनाका गीत माला हा कोणतं गाणं या आठवड्यात किती नंबरला आहे..???. याबाबतचा एक तासाचा कार्यक्रम लागायचा.... त्यात ते अमिन सयानीचे निवेदन----“”भाईयो और बहेंनो, तो चलो देखते है, इस हप्ते में पायदान नंबर चार पे कौनसा गाना है..????””
हे असं त्यांनी म्हंटल कि, आमच्या मुलांच्या त्या गाण्यावरुन पैजा लागायच्या.....कोण जिंकतंय कोण हरतयं यापेक्षा आपला अंदाज बरोब्बर आल्याचा आनंद अधिक असायचा.....तो अमीन सयानी म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस वाटायचा--- इतकं जिवंत ते सादरीकरण कानाला अन मनाला भावायचं..!!
असाच रात्री ९ वाजता प्रसारीत होणारा आणखी एक साप्ताहिक लोकप्रिय कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम “आपली आवड” ---- ज्यात पत्राने लोक मराठी गाणी आकाशवाणी केंद्राला कळवायचे आणि मग ज्या गाण्यासाठी जास्त पत्रं आलीत ती गाणी मग आपल नावं घेवून त्या कार्यक्रमात लावली जायची....!!
सूर्य मावळतीला गेल्यावर संध्याकाळी सांजधारा म्हणून एक भावगीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा—“”अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती----”” किंवा ‘’”संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही..... संथ वाहते कृष्णामाई’’’’ ही आणि अशी अनेक अरुण दाते आणि सुधीर फडके यांनी गायलेली भावगीते आजही मनात घर करून उभी आहेत..!!
दुपारी बारा वाजता नाट्यगीतांचा कार्यक्रम असायचा तो सुरु झाला कि आमच्या डोळ्याला तार यायची....घरातील मोठी माणसं ते ऐकतच दुपारची वामकुक्षी घ्यायचे.....
रविवारी सकाळी नऊ वाजता मुंबई केंद्रावर “बालदरबार” हा एक तासाचा आमच्या आवडीचा कार्यक्रम लागायचा.....आम्ही गल्लीतील आणि गावातील मित्र मैत्रिणी रेडिओच्या भोवती गोल बसून तर काही तोंडाची हनुवटी दोन्ही हाताच्या पंज्यावर ठेवून पोटावर पसरुन हा कार्यक्रम ऐकायचे.....हा कार्यक्रम आवडला म्हणून मुंबई केंद्राला सर्वात जास्त पत्रं पाठवणारा माझ्या गावातून मीच असायचो....!
असाच एक साडेनऊ वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा....”'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐका हो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण'” अशी त्या कार्यक्रमाची सुरुवात सुरु व्हायची.... त्यातलं शेवटचे 'गम्मSSSSत जम्मSSSSत' हे शब्द कानावर आले कि आम्ही मुलं हात वर करून ते शब्द त्या रेडिओ सोबत म्हणायचो---!!
पुढे कॉलेजला गेल्यावर कार्यक्रमाची आवड बदलली.....पण रेडिओची आवड तशीच राहिली, मग त्याकाळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती गाणी लागली कि ती ऐकावी वाटायची मग आमची आई म्हणायची—“”मेल्या मुडद्या,झोप आता... काईम रेडव बोकांडी लागतो----.”” ती असं म्हणाली कि, मी गोधडीत रेडिओ घेवून ती गाणी ऐकायचो...व तसाच रेडिओ सोबत झोपी जायचो...!
सकाळी उठून पाहिलं कि रेडिओ खुंटीला अडकवलेला दिसायचा....
क्रिकेट समजायला लागल्यावर जेव्हा कधी भारताचा सामना पाकिस्तान बरोबर असेल त्यावेळी रेडिओ ची क्रेझ वाढायची....ज्यांच्याकडे रेडिओ नाही ते सर्व मित्र एकत्र गोळा होवून माझ्याकडे यायचे किंवा ज्यांच्याकडे रेडिओ आहे तिथे सामना सुरु होण्यापूर्वीच जमायचे....
मग आम्ही ते सामन्याचं ‘धावतं वर्णन’ ‘आँखो देखा हाल’ अर्थात कॉमेंट्री रेडिओवर ऐकायचो.... धावतं वर्णन करणारा अगदी रसभरीत वर्णन करीत असल्यामुळे डोळ्यांसमोर संपूर्ण चित्र उभं राहायचं......
बीस या बाईस कदमोंका लंबा रनअप’ असं म्हटलं रे म्हंटल की डोळ्यांसमोर हातात चेंडून घेऊन धावणारा तो वासीम अक्रम डोळ्यापुढे उभा रहायचा......और गेंद को सिधी दिशा से खेल दिया है मिडॉन कि तरफ एक रन के लिये.......””फिर अगली गेंद गावसकर के लिये .........और बहोत हि शानदार ढंग से खेला है इस गेंद को----‘बंदूक से निकली गोली की तरह गेंद बाऊंड्री लाईन के बाहर”” असं म्हटलं की अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जाणारा चेंडू दिसायचा.....आणि आम्ही सारे चक्क मैदानात असल्यासारखे ओरडायचो.....”फोर्र्रर्र्रर्र रन...”
षटक संपायचं--- कपिलदेव बँटिंग ला आलेला असायचा...
ओव्हर कि पहली गेंद,--इम्रान कि गेंद का सामना कर रहे है, कपिलदेव -------“‘और ये......?????…’”
????????????????????
असं म्हणून थबकणारा धावत वर्णन करणाऱ्याचा आवाज हृदयाची धडधड वाढवायचा.......नक्की काय होतंय ते कळायला मार्ग नसायचा कारण प्रत्यक्षात स्टेडीयम वर असलेल्या लोकांचा आवाज पार आमच्या रेडिओ मधून बाहेर यायचा......गलका थांबेपर्यंत मध्ये घेतलेली हि क्षणभर विश्रांती आम्हांला पोटात गोळा आणायची......
बहुतेक ‘आऊट’ असंच आमच्या सर्वांच्या मनात यायचंच... आणि त्याचवेळी ‘”ये लगा सिक्सर’’ ...बॉल सिधी बॉन्ङी लाईन के उपर से दर्शको में “”....असे काहीतरी शब्द यायचे आणि जीव भांड्यात पडायचा....!!....अशा वेळी नेमका माझा बाप मला तंबाकू ची पुडी आणायला सांगायचा....
तुमच्या हि रेडिओच्या काही आठवणी नक्की असतील..... या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत......
खूप काही लिहावं वाटतं,पण शब्दाला खरंच मर्यादा पडल्या आहेत म्हणून आता पुन्हा थांबतो -----:
खरं सांगायचं तर रेडीओ एकेकाळचा सखा आज अडगळीत गेलाय.... आणि मनाचा तो रसिक कोपरा सुना झालाय..... रेडीओची जागा टिव्हीने घेतली पण टिव्ही वरची गाणी श्रवणीय होण्यापेक्षा प्रेक्षणीय होत गेली डोळे सुखावले पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटुन राहिले
अनिल पाटील पेठवडगाव
_____________________________
फेसबुक लिंक
http://bit.ly/2ZbbiGT

कोरा लिंक http://bit.ly/2LQa8NU

Related Questions

आकाशवाणीचा शोध कोणी लावला?
भारतात आकाशवाणीची पहिली सुरुवात कोणत्या साली झाली?
चंद्र आकाशात झाकला जातो त्या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात?
आकाशवाणी तर्फे प्रसारित केलेल्या एखाद्या प्रबोधनपर कार्यक्रमाविषयी माहिती लिहा?
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा?
आकाशात वीज चमकते तेव्हा अगोदर प्रकाश दिसतो का आवाज येतो?
ढग आकाशात कसे तरंगतात?