मराठी भाषा
मराठी भाषेत मुख्य काव्यांचे किती प्रकार आहेत? आणि एकूण किती काव्य प्रकार आहेत? कोणकोणते आहेत?
2 उत्तरे
2
answers
मराठी भाषेत मुख्य काव्यांचे किती प्रकार आहेत? आणि एकूण किती काव्य प्रकार आहेत? कोणकोणते आहेत?
1
Answer link
मराठी साहित्यात कविता या साहित्य प्रकारचे स्थान अबाधित आहे . साधारण ज्याला गेयता असते , चाल असते , यमक असते ती कविता असा जरी समज असला तरी कवितेचे स्वरूप तितकेच मर्यादित नाही . हा समज खोटा ठरवणारे ‘मुक्तछंद कविता ‘ यासारखे नवे काव्य प्रकार उदयाला आले .
काल खंडावर आधारित कवितांचे साधारण पुढील प्रकार पाहायला मिळतात :
यातील काही काव्य प्रकारांची उदाहरणे आणि माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . भाषिक वैशिष्ट्ये देणे मुद्दाम टाळले आहे कारण त्यामुळे उत्तर बोजड वाटू शकते , त्यावर स्वतंत्र उत्तर लिहिण्याचा प्रयत्न नक्की करेल.
ओवी: पसायदान एक पारंपारिक ओवी आहे.
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
आधुनिक ओवी चे उदाहरण द्यायचे झाले तर बहिणाबाईंची ‘ मन वढाय वढाय ‘ हीसुद्धा एक ओवी आहे .
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्यानं चालल्या
पान्यावर्हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
वरील दोन उदाहरणांतून साधारण आपण असे म्हणू शकतो कि ‘ ओवी म्हणजे साधारण चार ओळींची रचना , ज्यात पहिल्या तीन ओळीत यमक असते आणि चौथी ओळ लहान असते .
अभंग:
अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे.
छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।। [1] तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही; उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात.
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला
आरती: आरती हा शब्द ‘ आर्त’ पासून आला आहे. परमेश्वराबद्दल येणारे आर्ततापूर्ण भाव पोहोचवणारी रचना म्हणजे आरती.
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
स्तोत्र : देवाची स्तुती करणारे मंत्र . बहुतांशी संस्कृत असले , तरी त्यावर आधारित इतर भाषांमध्ये सुद्धा स्तोत्र रचली जातात. उदा. श्री रामरक्षा स्तोत्र.
गौळण:
मराठी लोकसाहित्यातील हा एक गीतप्रकार. कृष्णाच्या बालक्रिडा, त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गौळणींनी यशोदेकडे आणलेल्या तक्रारी, त्यांतूनच गौळणींनी मांडलेले कृष्णदेवाचे प्रच्छन्न ‘कवतिक’, गौळणींना वेडावून टाकणारी कृष्णाची मुरली, कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या गौळणींचा विरहभाव ह्यांचा भावोत्कट आविष्कार गौळणींत आढळतो. ह्या विशिष्ट गीतप्रकारास ह्यामुळेच ‘गौळण’ असे नाव पडले आहे. श्रीज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांनी गौळणी लिहिलेल्या आहेत.
घनु वाजे घुण घुणा । वारा वाजे रुण रुणा ।
भवतारक हा कान्हा । वेगी भेटवा का ।।
ही श्रीज्ञानदेवांची विराणी ‘गौळण’ ह्या गीतप्रकारातच मोडते. [2]
भारुड: भारुड हा केवळ फक्त गायचा किंवा वाचून दाखवण्याचा प्रकार नाही . त्यात नाट्य आहे , उपदेश आहे . सादरीकरण हे या प्रकारचे मुख्य वैशिष्ट्य.
स्त्रोत [3]
संत एकनाथ महाराजांची भारुडे प्रसिद्ध आहेत . त्यात रूपक अलंकाराचा प्रामुख्याने वापर झालेला दिसतो.
भूपाळी: प्रातःकाळी जगाला झोपेतून उठवण्यासाठी गायले जाणारे सुंदर गाणे.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।
उठीं लवकरि वनमाळी । उदयाचळीं मित्र आला ॥ ध्रु ॥
सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं ।
अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी ।
अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी ।
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं ।
यमुनाजळासी जाती मुकुंदा । दध्योदन भक्षीं ॥
मुक्तता होऊं पाहे । कमळिणीपासुनियां भ्रमरा ॥
पूर्वदिशे मुख धुतलें । होतसे नाश तिमिरा ॥
उठिं लवकरि गोविंदा । सांवळ्या नंदकुमारा ।
मुखप्रक्षालन करीं अंगिकारी भाकर-काला ॥ १ ॥
पंडिती काव्य अर्थात श्लोक, आख्यान , स्तोत्र यातील संस्कृत प्रचुर भाषेमुळे हे साहित्य सामान्य जणांमध्ये फ्फारसे रुळले नाही , जितके लोकसाहित्य रुळले गेले . यामध्ये वृत्त , चंद , अलंकार , इत्यादी भाषिक वैशिष्ट्ये प्रामुख्याने आढळतात.
उदा. समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक.
लावणी :
लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.[१] लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते.भक्ती रसयुक्त लावणी मागे पडली .'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम.
चैत्र पुनवेची रात आज आलीया भरात थड थड काळजात माझ्या मायेना
कधी कवा कुठ कस जीव झाल येड पीस त्याचा नाही भरवस तोल राहीना
राखिली कि मर्जी तुमच्या जोडीन मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू केंव्हातरी साजणा …
मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
हे कशापायी छळता माग माग फिरता अस काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी
हे सहाची भी गाडी गेली नवाची भी गेली आता बाराची गाडी निघाली
ऐन्यावानी रूप माझ उभी ज्वानीच्या मी उंबर्यात
नादवल खुलपिस कबुतरही माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट हि चांदण्याची…
उगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची …
नारी ग राणी ग हाये नजर उभ्या गावाची…
हे शेत आल राखणीला राखू चारा गोळा
शीळ घाली कुठून कोणी करून तिरपा डोळा
आता कस किती झाकू सांगा कुठवर राखू राया भान माझ मला राहीना….
मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
आल पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळिंब फुट व्हटात
गार वार झोंबणार द्वाड पदर जागी ठरना
आडोशाच्या खोडीचं मी कस गुपित राखू कळना
हे .. नारी ग रानी ग कस गुपित राखू कळना
मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औन्धाच्या बा वर्सला मी गाठल वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी घडी आताची हि तुम्ही राहू द्या …
पोवाडा: मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणाऱ्या आणि गाणाऱ्या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.
गझल : मराठीत ‘ सुरेश भट ‘ यांच्या गझला प्रसिद्ध आहे .
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
मुक्तछंद : या प्रकारात कवि कोणतेही भाषिक वैशिष्ट्याचे बंधन न स्वीकारता भावना व्यक्त करतो.
( व्हॉट्सॲप साभार )
विडंबन : ही उपहासात्मक टीका करणारी कविता असते. आचार्य अत्रे यांच्या विडंबनात्मक कविता प्रसिद्ध आहेत.
विडंबन म्हणजे गंभीर वर्ण्य विषयाची, तसेच आदरणीय साहित्यिक अगर साहित्यकृती यांची टवाळी असा सर्वसाधारण समज आहे. पण टवाळी अगर निरागस विनोद म्हटला तरी या गोष्टी साधणे हा विडंबनाचा एकमेव हेतू नाही. हास्य हा पुष्कळशा यशस्वी विडंबनांत प्रारंभबिंदू असतो. पण याद्वारे विडंबनकाराला साध्य करावयाची असते ती जीवनाची समीक्षा.[4]
भावकविता: वेगवेगळ्या भावनांचे वर्णन करणारी कविता . या आशयघन कविता कदाचित इतर प्रकारांचे मिश्रणही असू शकतात. उदा.गझल , मुक्तछंद इत्यादी.
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला?
वदलिस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न परि मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला
स्वरगंगेच्या काठावरती ...
अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठुन मिलन
जीव भुकेला हा तुजवाचुन
जन्मांमधुनी पिसाट फिरता, भेट घडे आजला
स्वरगंगेच्या काठावरती ...
गूढकाव्य:
अशा प्रकारच्या कवितांचे व्यक्तिनुरुप वेगवेगळे संदर्भ , अर्थ शोधले जाऊ शकतात .
ग्रेस यांच्या कविता खास गूढ कविता म्हणून ओळखल्या जातात.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
0
Answer link
मराठी भाषेत मुख्य काव्यांचे दोन प्रकार आहेत:
- आख्यान काव्य: यात कथात्मक (narrative) स्वरूपात काव्य रचना असते.
- स्फुट काव्य: हे स्वतंत्र (independent) असते आणि यात एक विशिष्ट विचार किंवा भावना व्यक्त केली जाते.
- अभंग: हे विठ्ठलाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी अनेक अभंग लिहिले.
- ओवी: हे स्त्रियांच्या लोकगीतांचा एक प्रकार आहे, विशेषतः जात्यावरच्या गाण्यांमध्ये ह्यांचा उपयोग होतो.
- लावणी: हे शृंगारिक आणि वीररसात्मक (romantic and heroic) प्रकारचे काव्य आहे.
- पोवाडा: यात वीर पुरुषांच्या शौर्याचे वर्णन असते.
- खंडकाव्य: हे लहान आकारातले (small sized) काव्य आहे.
- महाकाव्य: हे विस्तृत (extensive) आणि मोठे काव्य आहे, ज्यात एखाद्या मोठ्या कथेचे वर्णन असते.
- गजल: ही उर्दू मूळ असलेली (urdu origin) काव्य रचना आहे, जी मराठीमध्ये देखील वापरली जाते.
- नव कविता: हे आधुनिक (modern) काव्य प्रकार आहे, ज्यात पारंपरिक नियम (traditional rules) पाळले जात नाहीत.
- मुक्त छंद: ह्या प्रकारात कवितेला विशिष्ट छंद आणि लय (rhythm) नसते.